Home > Top News > वाट चुकलेले अर्थतज्ज्ञ!

वाट चुकलेले अर्थतज्ज्ञ!

जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंह यांनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं पंतप्रधान पद सांभाळलं. मात्र, विरोधी पक्षाच्या एका खासदाराचं मत ते किती विचारपुर्वक ऐकत, त्यांच्याशी कशापद्धतीने चर्चा करत या संदर्भात माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी शेअर केलेला अनुभव नक्की वाचा...

वाट चुकलेले अर्थतज्ज्ञ!
X

मी राज्यसभेचा सदस्य असताना पहिल्याच सत्रात मला केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलायचे संधी मिळाली. समोर पंतप्रधान मनमोहन सिंह बसलेले. मनांत धाकधूक होतीच. कारण मी अर्थसंकल्प व कॉंग्रेसच्या विरुद्ध बोलत होतो. बोलताना माझी नजर समोरच्या बाकांवर होतीच. मनमोहन सिंह समोरच्या डायरीत काही तरी लिहिताना दिसत होते.

भाषण संपवून मी बसत असताना समोर पाहिले तर मनमोहन सिंहांच्या चेहऱ्यावर त्यांचे ते मंद स्मित होते. काही मिनिटांतच ते सभागृहाच्या बाहेर पडले व त्याच वेळी संसदेतील सहाय्यकाने माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. 'मला तुमच्या सवडीनुसार केबिनमध्ये भेटा' असे त्यात लिहिले होते. मी घाईघाईत कागद आवरले व त्यांच्या केबिनमध्ये गेलो.

त्यांच्यासमोर गर्दी होती पण एका बाँकाने मला थांबण्याची विनंती करत त्यांनी दोन मिनिटांत खासदारांची गर्दी पांगवली. मग त्यांनी माझे अभिनंदन करत मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे का? अशी विचारणा केली. मी नकारार्थी मान डोलावत माझा राज्यशास्त्र व गीतेचे तत्वज्ञान हे माझे आवड व अभ्यासाचे विषय असल्याचे सांगितले. ते पुन्हा मंद हसले व त्यांनी हातातली डायरी उघडली. नंतर पुढील अर्धा तास ते मी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्दयांवर बोलत होते. मी आश्चर्याने स्तीमितच झालो होतो. बोलणे संपले आणि भेटत जा, असा त्यांचा निरोप ऐकून मी बाहेर पडलो. माझ्यामागून तेही बाहेर पडले..!

असे डॉ. मनमोहन सिंग!

जागतिक पातळीवर अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले पण पंतप्रधान म्हणून निष्प्रभ ठरलेले अशा मनमोहन सिंह यांचा आज ८७ वा वाढदिवस.

अत्यंत सौम्य प्रकृती व स्वभावाच्या मनमोहन सिंह यांना खरे तर भारतीय राजकारणातील दगदग मानवणारी नाही. तरीही केवळ सोनिया गांधींच्या आग्रहाखातर त्यांनी ही जबाबदारी २००४मध्ये स्वीकारली व तब्बल दहा वर्षे सांभाळली.

या काळात काँग्रेसची देशात व अनेक राज्यांत पडझड झाली. या पराभवाला मनमोहन सिंह जबाबदार नव्हते, कारण सरकारच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या सीटवर ते असले तरी गाड़ी चालवणारे हात वेगळेच होते. पराभवाचे खापर मात्र, त्यांच्या माथी मारले गेले.

पण मनमोहन सिंह यांचे मनाचे मोठेपण असे की इतकी कडवट टीका व जाहीर अपमान होऊनही त्यांनी कधी या पापाचे धनी कोण याची वाच्यता केली नाही.

आर्थिक विषयांत शिक्षण घेतल्यावर त्यांनी सरकारी क्षेत्रात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. प्रणब मुखर्जी केंद्रीय अर्थमंत्री असताना मनमोहन सिंह रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. नंतर ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष व पुढे केंद्रीय आर्थिक सल्लागार बनले.

१९९१ पासून आजपर्यंत ते राज्यसभेचे सदस्य आहेत. १९९६ मध्ये त्यांनी दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले.

पी. व्ही. नरसिंह राव १९९१ साली पंतप्रधान झाले. तेव्हा त्यांनी मनमोहन सिंह यांना केंद्रीय अर्थमंत्री केले. या काळात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे देशाच्या अर्थनीतीने जणु यू टर्न घेतला. त्यांनी उद्योगांवरील जाचक बंधने दूर करून उदारतावाद आणला.

मनमोहन सिंह पंतप्रधान असताना राज्यसभेत काम करण्याची संधी मला लाभली. त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे, हे सारखे जाणवत राहिले.

योग्य व्यक्ती अयोग्य लोकांच्या संगतीत आली की काय? होऊ शकते याचे दर्शन सतत घडत राहिले.

डाॅ. मनमोहन सिंह शतायुषी होवोत, ही सदिच्छा!

- भारतकुमार राऊत

Updated : 26 Sept 2020 2:12 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top