Home > मॅक्स ब्लॉग्ज > डाॅ.दाभोलकर स्मृतिदिन, निखिल वागळे आणि मानधनाचे पाकीट...

डाॅ.दाभोलकर स्मृतिदिन, निखिल वागळे आणि मानधनाचे पाकीट...

डाॅ.दाभोलकर स्मृतिदिन, निखिल वागळे आणि मानधनाचे पाकीट...
X

दि. २० ऑगस्ट २०१८ रोजी डाॅ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अंनिसच्या इस्लामपूर शाखेच्यावतीने धडाडीचे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसे गेली दोन वर्षे यानिमित्ताने त्यांना इस्लामपूरात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. पण त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते शक्य होत नव्हते. तो योग आमच्या आग्रहामुळे यावर्षी जुळून आला.

पूर्वनियोजनानुसार वागळे सर पहाटे मुंबईहून सांगली आणि सांगलीहून इस्लामपूरात आले. एक म्हणता म्हणता सकाळी माझ्या कर्मवीर भाऊराव पाटील काॅलेजमध्ये दुपारी आर. आय. टी. काॅलेजमध्ये आणि संध्याकाळी मुख्य कार्यक्रमात अशी दिवसभरात वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तीन अभ्यासपूर्ण व्याख्याने त्याच उत्साहात दिली. त्यांच्या तीनही व्याख्यानांना श्रोत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. समकाळातील ज्वलंत प्रश्नांवर विशेषतः असहिष्णुता आणि वाढत्त्या सांप्रदायिकतेवर अत्यंत परखडपणे त्यांनी आपली मते व्यक्त केली.संध्याकाळच्या मुख्य कार्यक्रमात ' दाभोलकर- पानसरे... आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न ' या विषयावरच्या त्यांच्या भाषणावर संपूर्ण सभागृह मनापासून दाद देत होते. अंतर्मुख होऊन विचार करीत होते. तरुण वर्ग तर बेहद्द खूष होता. मुख्य कार्यक्रमानंतर तरुणांचा अक्षरशः त्यांना गराडा पडला होता. अनेकजण त्यांना प्रश्न विचारीत होते. कुणी त्यांच्यासोबत फोटो काढून घ्यायला इच्छुक होते. कुणालाही नाराज न करता, कसलाही अभिनिवेष न बाळगता सर्वांना त्यांनी स्वतःसोबत फोटो काढू दिले. खरेतर कार्यक्रमाच्या आधीपासूनच संयोजक म्हणून संयोजनाचा मोठा ताण आमच्यावर होता. पण वागळे सरांच्या अत्यंत मोकळ्या ढाकळ्या वावरण्याने आमच्यावरचा हा ताण केव्हाच नाहीसा झाला होता.

रात्री जेवणानंतर त्यांना निरोप देण्याआधी त्यांच्या परस्पर आम्ही प्रा.एल.डी पाटील सर, संजय बनसोडे, डाॅ.नितीन शिंदे, विष्णू होनमोरे असे काही मोजके कार्यकर्ते एकत्र बसलो आणि पाकीटात मानधनाची रक्कम किती घालायची, यावर चर्चा सुरु झाली. खरेतर, पाहुणा ठरवतानाच मानधनाची रक्कम ठरवण्याची आजकाल पद्धत रुढ झाली आहे. स्वतःला तथाकथित विद्वान समजणारे अनेक नामांकित वक्ते मानधनासाठी मोठमोठ्या ,रक्कमांवर अडून राहील्याचे आम्हाला अनुभवाने माहीत होते.अशा संस्कृतीमुळेच आज व्याख्यानांच्या मानधनाचे आकडे आभाळाला टेकलेले आहेत आणि आमची तर मानधनाबाबत वागळे यांच्याशी एका अक्षरानेही चर्चा झाली नव्हती. डाॅ.दाभोलकरांशी असलेले त्यांचे चळवळीच्या पातळीवरील नाते आणि बांधिलकी मानून आमच्या एका फोनवर ते स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला आले. मग आता आमच्यातला प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे मानधनासाठी आकडा सुचवू लागला. त्यातही मोठी तफावत राहू लागली.लवकर एकमत होईना. आपण दिलेल्या रकमेवर वागळेंची काय प्रतिक्रिया असेल? असा संभ्रम आम्हा सर्वांच्याच मनात होता .एकूण कार्यक्रमासाठीही खूपच खर्च झाला होता.लोकांचे बळ आणी पदरमोड याशिवाय चळवळीला उत्पन्नाचा दुसरा मार्गही नाही त्यामुळे शेवटी सर्वसहमतीने आम्ही बर्यापैकी रक्कम ठरवली. पाकीटात घातली आणि पाकीट त्यांच्या हाती दिले. तरीही नंतर पाकीट उघडून बघितल्यावर त्यांना काय वाटेल? हा संभ्रम आम्हा सर्वांच्याच चेहर्यावर कायम होता.पण अत्यंत नम्रपणे त्यांनी पाकीट परत केले आणि म्हणाले, ' तुम्ही चळवळीसाठी जे करता तेच खूप महत्त्वाचे काम आहे. दाभोलकर- पानसरेंची चळवळ वाढली पाहिजे. काम वाढवा. तरुणांना जोडून घ्या. तुमच्यासारख्या धडपडणार्या लोकांची समाजाला गरज आहे.' आम्ही सगळेच एकदम चकीत झालो. क्षणभरापूर्वी आम्ही मानधनाच्या रक्कमेवर ज्या पद्धतीने विचार करीत होतो, त्यापेक्षा हा माणूस कितीतरी अंगाने खूपच वेगळा आहे, हे आमच्या लक्षात आले. मिडीयात स्पष्ट, सडेतोड, परखड, आक्रमक मांडणी करणारे करारी बाण्याचे पत्रकार म्हणून आजवर आम्ही त्यांना ओळखत होतो. कथनी आणि करणी यामध्ये प्रचंड तफावत असणारी मोठी माणसंही आम्ही या आधी अनुभवली होती.मात्र वागळे यांच्या व्यक्तिमत्वाचा खूपच वेगळा पैलू आम्हाला अनुभवायला मिळाला.

एव्हाना रात्रीचे पावणे अकरा वाजायला आले होते. ताकारी रेल्वेस्थानकात महालक्ष्मीचा शीट्टी ऐकायला आली. बघता बघता गाडी स्थानकात लागली. वागळे सर बॅगसह गाडीत चढले.( दिवसभर आपली बॅग त्यांनी कोणालाही घेऊ दिली नव्हती) मिनिटभरात गाडी स्थानकावरून हलली. ' चला मित्रांनो. पुन्हा भेटूच ' असं म्हणून हात हलवून त्यांनी निरोप घेतला. गाडी नजरेआड झाली आणि माझ्या लक्षात आले, अरे दिवसभर आपण या माणसाशी जे बोलायला हवं होतं, ते तर राहूनच गेलं .आता त्यासाठी आपल्याला या आगळ्यावेगळ्या माणसाला पुन्हा भेटावंच लागेल. आजच्या असहिष्णुतेच्या गरगरत्या आणि चोहोबाजुंनी अंधारुन आलेल्या या वर्तमानात अशा भूमिका स्पष्ट असलेल्या माणसांच्या सक्रिय सहभागाची आणि सदिच्छांची सर्वच समविचारी चळवळींना नितांत गरज आहे, हा विचार मनात रेंगाळत होता आणि गडद अंधार कापीत गाडी एका नव्या उजेडाच्या दिशेने धावत होती...

Updated : 23 Aug 2018 6:19 PM IST
Next Story
Share it
Top