डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ ॲबॅार्शन पिल !
अंदाजे दोन महिने तिची पाळी चुकलेली. प्रेगनंसी टेस्ट देखील पॉझीटिव्ह आली होती. या जोडप्याने असेच कुठूनतरी ॲबॉर्शनच्या गोळीचे पाकीट घेतले होते. अतिरक्तस्त्राव झाल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये तातडीने आणले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिचा पल्स कमी होता. बीपी कमी झाला होता. तातडीने हॉस्पिटलला आणले नसते तर काय झाले असते. वाचा जीवावर बेतू शकणाऱ्या ॲबॅार्शन पिल्स खाण्याचे गंभीर परिणाम डॉ. साधना पवार यांच्या या हादरवून टाकणाऱ्या लेखातून…
X
“मॅडम !
हॉस्पिटलच्या दारात एक पेशंट आलीय, खूप सीरियस आहे ,ॲबॉर्शन झालंय, खूप ब्लीडिंग झालंय ,पल्स पण लागत नाही पण पेशंटचा नवरा पेशंट आत तरी घ्या म्हणून खूप विनवण्या करतोय काय करू ?” धावत येऊन सिस्टरनी सांगितलं
मी धावतच बाहेर गेले. तिला पाहिलं तर ती पांढरी फटक होऊन कारच्या मागच्या सिटवर रक्ताच्या थारोळयात पडलेली. पल्स खूपच वीक होती. बीपी खूपच कमी झाला होता . मी पटकन इमर्जन्सी मॅनेजमेंट केलं. सलाइन आणि ऑक्सीजन लावून रक्त तपासणीला पाठवले. रक्ताची व्यवस्था केली. अर्जंट सोनोग्राफी केली .हे सगळं करत करतच दोन वर्षाच्या बाळाला घेवून एका कंपनीच्या युनिफॉर्ममध्ये आलेल्या तिच्या नवऱ्याकडून तिची हिस्ट्री घेतली.
त्यानंतर कळले की अंदाजे दोन महिने पाळी चुकलेली. प्रेगनंसी टेस्ट पॉझीटिव्ह आली होती. या जोडप्याने असेच कुठूनतरी ॲबॉर्शनच्या गोळीचे पाकीट घेतले होते. अतिरक्तस्त्राव झाल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये तातडीने आणले होते.
मी भूल देवून, तिचे गर्भाशय साफ केले. तिचा जीव वाचवला खरा ,पण त्यांनी हॉस्पिटलमध्ये यायला त्यांनी आणखी काही मिनिटे उशीर केला असता तर काय झाले असते ? तिचा जीव वाचलाच नसता.
ॲबॉर्शन पिल नाम तो सुनाही होगा'
काही वर्षांपुर्वी या गोळ्या उपलब्ध नव्हत्या. तेंव्हा साध्या दिड दोन महिन्याच्या गर्भपातासाठीसुद्धा भूल देवून गर्भाशय साफ करावे लागत असे .त्यामध्ये भुलीचा धोका ,अतिरक्तस्त्रावाची शक्यता ,गर्भाशयाला आणि कधी कधी आतडे किंवा मुत्राशयाला ईजा असे complications होत असत .
infection ,overzealous curettage मुळे कधी कधी नंतर वंध्यत्व सुद्धा येत असे .पण आता या गोळ्यांमुळे नऊ आठवड्यांपर्यन्तचे गर्भपात अगदी अलगद म्हणजे विना complications होऊ लागले आहेत. त्यामुळे अशा गोळ्या फार सर्रास वापरल्या जावु लागल्या आहेत .सुरक्षित गर्भपात हा स्त्रियांचा अधिकार आहेच. योग्य कारणासाठी गर्भपात करुन घेणे हा गुन्हा नाही. पण तो योग्य ठिकाणी आणि योग्यडॉक्टरांकडून करुन घेतला तरच.
गोळीने गर्भपात करायचा असेल तरीही तो करण्याआधी स्त्रीरोगतज्ञ त्या स्त्रीची तपासणी ,सोनोग्राफी आणि आवश्यक वाटल्यास रक्त तपासणी करतात .गोळ्या कश्या घ्यायच्या ?काय काळजी घ्याची ,काय धोके उदभवु शकतात ही सर्व माहिती व्यवस्थित देतात. शंका निरसन करतात. क्वचित प्रसंगी अर्धवट गर्भपात झाला तर भूल देवून गर्भाशय साफ करतात . यात Privacy सुध्दा जपली जाते. तसा कायदाच आहे .
गर्भ आता नकोच आहे ,तर मग सोनोग्राफी कशाला करायची ?असे काही जोडपी विचारतात. सोनोग्राफीमध्ये गर्भाचे नक्की आठवड्यातील वय कळते .खूप साऱ्या स्त्रियांना पाळीची तारीख आठवत नसते. आठ नऊ आठवड्याच्या पुढील गर्भ असेल तर हमखास अर्धवट गर्भपात होतो .जीवावर बेतू शकते . शिवाय गर्भाशयाबाहेर रुजु झालेला गर्भ ,द्राक्षगर्भ , जुळे /तीळे गर्भ आहेत का? हेही बघावे लागते.
ओव्हर दी काउन्टर असे ॲबॅार्शन पीलचे किट विना prescription देण्यास कायद्याने मनाई आहे पण तरीही अनेक जोडपी असे किट स्वतःच घेतात आणि काही इमर्जेन्सी उद्भवली की मग gynecologist कडे जातात. हे योग्य नाही.
विश्वास बसणार नाही पण बंदुकीच्या गोळीने जसा जीव जातो तसाच योग्य मार्गदर्शनाखाली न घेतलेल्या गर्भपाताच्या गोळीनेही जीव गमावण्याचा धोका असतो. त्यामुळे तो शाहरुख कसा 'जवान'पिक्चर मध्ये म्हणाला होता की ,'बेटेको हात लगानेसे पहले बापसे बात कर '..तसे म्हणावेसे वाटते की 'ॲबॉर्शनकी गोलीको हात लगानेसे पहले अपने गायनॅकॅालॉजिस्टसे बात कर !'
शिवाय काही स्त्रिया तर असे किट वारंवार घेवुन स्वतःच्या शरीराचे हाल करुन घेतात. आम्ही doctor मंडळी या बाबतीत सुद्धा त्यांचे counselling करतो .Contracetion should be routine and abortion should be exception . कारण ,असुरक्षित गर्भपातामुळे आपल्या देशात दररोज खूप मृत्यु होतात . हे मृत्यु 'बड़े बड़े देशोमे होनेवाली छोटी छोटी बात' म्हणून सोडून न देता याबाबतीत सातत्यपूर्ण प्रबोधन होत रहायला हवे .असे प्रबोधन आशेचा (क क क )किरण जागृत करू शकतात. हजारो स्त्रियांचा जीव वाचवु शकतात .
लक्षात ठेवा ,
डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ ॲबॅार्शन पिल !