Home > मॅक्स ब्लॉग्ज > फडणवीस स्वतःचा पक्ष काढून दिल्लीला चॅलेंज करू शकतात का?

फडणवीस स्वतःचा पक्ष काढून दिल्लीला चॅलेंज करू शकतात का?

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री झाले. भाजप नेतृत्वाने त्यांना काय संदेश दिला? नेतृत्वाचा आदेश आल्यानंतर फडणवीस खरंच रडले का? पवार-फडणवीस तुलना करणारा भक्तांना काय नेमका संदेश आहे याचं विश्लेषण केलं आहे लेखक श्रेणिक नरदे यांनी..

फडणवीस स्वतःचा पक्ष काढून दिल्लीला चॅलेंज करू शकतात का?
X

गेल्या काही वर्षांत म्हणजे विशेषतः २०१४ नंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर भाजपमधल्या लोकांना आनंद झाला. आनंद होणं स्वाभाविक आहे. मात्र काही अपवाद वगळले तर या आनंदाचं, अभिमानाचं रूपांतर कधी माजात झालं हे कळालं नाही. निश्चितच फडणवीस भारी आहेत ,त्याबद्दल आम्हाला शंका नाही. मात्र त्यांच्या भक्तांनी माज सुरू केला. तो एवढा माज होता कि, अतिशय खालच्या पातळीवर येऊन पवारसाहेब असतील किंवा अन्य विरोधी नेते यांच्यावर काहीबाही टीका करायचे. अत्यंत खालची भाषा असायची.

या साऱ्या भक्त लोकांच्या जीवावरही फडणवीस किती लक्ष देत होते माहित नाही मात्र त्यांनाही या वागण्याने बहुतेक प्रोत्साहनच मिळालं असावं, त्याच गुर्मीत थेट पवारांचं राजकारण संपल्याचा निकाल लावला फडणवीसांनी !

पवारांच्या पंक्तीत फडणवीसांना बसवायचा चंगच काही घटकांनी बांधला होता. त्यापुढे जाऊन फडणवीस म्हणजे मोठे नेते पण पवार म्हणजे साडेतीन जिल्ह्याचे नेते अशा फुगड्या खेळत होते भक्त लोक.

परवाच्या नाट्याने या सर्वांना जमिनीवर आणलं असावं. भाजपने सत्तांतर केलं मात्र शिंदेंची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर भक्तांच्या गल्लीबोळात शुकशुकाट पसरलाता, काहीजणांनी गोडधोड जेवणाचा बेतही रद्द केला. एवढी शोककळा सत्ता येऊनही पसरावी हि म्हणजे मोठी गंमतच.

काही वृत्तपत्रात बातम्या आल्या की, दिल्लीहून फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायचा आदेश आला आणि फडणविसांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. म्हणजे फडणवीस रडले. अश्रु तरळणे म्हणजे रडणे असंच असतं पण पेपरवाल्यांना भिती असते. त्यामूळे अश्रुचे दवबिंदू करतात ते.

निश्चितपणे फडणवीसांचा अपमान झालाय का ? तर झालाय. ते मुख्यमंत्री मटरेल होते पण त्यांना डावललं गेलं. डावलल्यापेक्षा त्यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून त्यांना जाणीव करून देण्यात आली की तुम्ही काय स्वयंभू नेतृत्व नाही तर आम्ही जे सांगतो तेच तुम्ही ऐकायला हवं !

हा संदेश कुणाला होता ? फडणवीस आणि टीमला ? तर नाही. तो संदेश तमाम महाराष्ट्र भाजपाला होता. जो तो नेता म्हणजे राणेंपासून ते विखेपर्यंत तसेच तो प्रवक्ता उपाध्ये पासून भंडारी पर्यंत यांना मेसेज होता. तुम्ही फडणवीसांच्या आरत्या ओवाळणे बंद करा. यात एक अपवाद आहेत ते म्हणजे गडकरी !

भाजपने हा संदेश एवढा लाऊड एँड क्लिअर दिला कि, भाजपा मध्ये विशेषतः फडणवीस ग्रुपमध्ये स्मशानशांतता पसरली. हे लोक विधानपरिषद, राज्यसभेवेळी एवढे ढोल, डांगोरे पिटायचे, उतमात करायचे मात्र अख्या महाराष्ट्रात सत्ताबदल झालेला असताना हि गल्ली शांत होती, शोकात होती.

फडणवीसांनी पत्रकारपरिषदेत घोषणा केली आणि सांगितलं कि मी या सरकारात नसणार आहे. मी बाहेर असेन. फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, पदाचा त्याग केला अशा नद्या वाहत होत्या तेवढ्यात जे.पी नड्डांनी हे क्रायसिस मॅनेजमेन्ट हातघाईनं केलं आणि मिडीयासमोर येऊन आग्रह नाही तर पक्षाचा निर्देश म्हणजेच आदेश असल्याच सांगितलं आणि फडणवीसांच्या त्यागातली हवाच काढून घेतली.

उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर फडणवीसांचे अभिनंदन कमी आणि त्यांच्यावर टीकाटिप्पण्या सुरू झाल्या. त्या एवढ्या जोरात होत्या कि, फडणवीस कंपू त्याला प्रत्युत्तर द्यायच्या भानगडीत पडला नाही त्यांनी शांत राहण्यात समाधान मानलं.

आता परत त्याच गोष्टीकडे, फडणवीस - पवार !

ज्या पवारांना साडेतीन जिल्ह्याचे नेते म्हणून फडणवीस कंपू हिणवतो, त्यांच्या माहितीसाठी पवारांचा स्वतःचा राष्ट्रीय पक्ष आहे. देशाच्या विरोधी पक्षांची बैठक ते घेतात, कश्मीर ते कन्याकुमारी काही महत्वाचे विषय असले तर त्यांचं मत विचारात घेतलं जातं, वाजपेयींसारखा माणूस गुजरात भूकंपाच्या पुनर्वसनाचं काम शरद पवारांकडे देतो. चारच खासदारांवर महत्वाची मंत्रीपदं केंद्रात मिळतात. तुमचे जे विश्वगुरू आहेत त्यांचे गुरू पवार आहेत हे ते जाहीररित्या सांगतात.

हे सगळं जाऊदे, मात्र पवारांवर एवढ्या वाईट वेळा आल्या त्यावेळी ते खंबीरपणे उभे राहिले. मात्र कधी रडले नाहीत किंवा अश्रु तरळले नाहीत.

फडणवीस स्वतःचा पक्ष स्थापन करून दिल्लीला चॅलेंज करू शकतात का ?

Updated : 2 July 2022 11:09 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top