डिस्कवर कोयना टीमची पर्यावरण बांधिलकी
आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी कमवून ठेवलेली आर्थिक संपत्ती, बंगला, शेती वाडी आपण सांभाळून ठेवतो. त्या प्रमाणे आपल्या आजुबाजूला असलेल्या नद्या, डोंगर, झाडं यांचं आपण रक्षण करतो का? ही आपल्या वाडवडिलांनी सांभाळून ठेवलेली वडिलोपार्जित संपत्ती नाही का? याच विचारातून 'डिस्कवर कोयना' टीमने निसर्गाच्या रक्षणासाठी केलेले कार्य वाचून तुम्ही देखील थक्क व्हाल...
X
आपल्या वाडवडिलांनी टिकवून ठेवलेले हे जंगल जतन झालं पाहिजे. असे म्हणत तरुणांचा एक समूह पुढे आला. पर्यावरणातील घटक कसे महत्त्वाचे आहेत. याचा अभ्यास करायला त्यांनी सुरवात केली. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लोकांपर्यंत घेऊन जाऊ लागले.
हे करत असताना त्यांच्या लक्षात आले की, जंगल भागात राहणाऱ्या लोकांच्या मध्ये पर्यावरणाविषयी आंतरिक जाणीव असते. त्याची ओढ असते. ते जंगल ओरबाडत नाहीत. लोकांच्या अशा जाणिवेला एकत्र करून पर्यावरणावर काम उभे करावे या उद्देशाने त्यांनी 'डिस्कवर कोयना' आणि 'सह्याद्री सोशल फाउंडेशन' ची स्थापना केली.
या संस्थांच्या माध्यमातून हे तरुण आठ वर्षापासून वृक्षारोपण, वणवा निर्मूलन, सापांच्या विषयी जनजागृती, जंगली गवताच्या प्रजातींचे संवर्धन या विषयावर काम करत आहेत.
सह्याद्रीच्या या परिसरात असणाऱ्या वन्यजीवांच्या नोंदी ठेवण्याचे महत्त्वाचे काम या टीमने सुरू केले. या टीमने आजपर्यंत कित्येक जीवजंतू ची नोंद केली आहे. यामध्ये पक्षी, साप, बेडूक, पाली, गोम, विंचू, कोळी, फुलपाखरे, वनस्पती, फुले, किडे आणि इतर सरपटणारे तसेच उभयचर जीवांचा समावेश आहे. यातील अनेक जीवांच्या आकारातील खाद्यातील रंगातील तसेच इतर काही गोष्टीतील बदलांचा शोध ही टीम घेत आहे.
या परिसरात अनेक पर्यटक येतात काहींच्या कडून जंगलात उपद्रव होतो. यावर देखील हे तरुण सातत्याने काम करतात. त्यांना स्थानिक नागरिक तसेच वनविभागाचे सहकार्य लाभत आहे.
पाटण तालुका तसा दुर्गम आणि डोंगर दऱ्याने, जंगलांनी वेढलेला तालुका… आमचा जन्मच या मातीतला असल्यामुळे साहजिकच येथील प्रत्येक घटक आणि परिस्थिती जाणून होतो. त्यामुळे पर्यावरण निगडीत कामे करताना कोणतीच अडचण वाटत न्हवती. त्यामुळे अशी आवड असलेली वेगवेगळ्या वयातील तरुण एकत्र येऊन ती कामे करू लागलो.
1985 ला कोयना अभयारण्य ची घोषणा झाल्यानंतर 2010 ला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाची घोषणा झाली. परंतु स्थानिक आणि वन विभागाचे वाद टोकाला जावू लागले आणि त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागल्याचे जाणवत होते. त्यामुळं दुखःही वाटत होते आणि आपल्या वाडवडिलांनी राखलेले जंगल, पर्यावरण संतुलन चा असा होणारा ऱ्हास होऊ द्यायचा नाही. म्हणून पर्यावरणातील प्रत्येक घटकाचे महत्त्व किती आहे?
हे आम्ही सगळे अगोदर स्वत: आत्मसात करून घेऊ लागलो आणि लोकांपर्यंत पोहचवू लागलो आणि हे करता करता लोकांच्या मनामध्ये पण पर्यावरण, जंगल, वन्यजीवांबाबत आज पण तितकीच आत्मीयता आहे आणि ती एकत्रित स्वरूपात असेल तर नक्कीच पर्यावरण, जंगल टिकू शकेल असे वाटू लागले म्हणून आम्ही डिस्कवर कोयना आणि सह्याद्री सोशल फौंडेशन ची स्थापना केली. सात ते आठ वर्षे वेगवेगळ्या माध्यमातून पर्यावरण निगडीत कामं करत असताना जसे की, स्थानिक जातींची झाडांची रोप लागवड, वणवा निर्मूलन, सापाबाबत जनजागृती, वनउपजचा वापर, पर्यावरण राखून लोकांच्या उदरनिर्वाहासाठी कसा होईल? गवताळ भाग कसा वाढेल? गवताच्या स्थानिक जाती कशा वाढतील? हे देखील त्या त्या क्षेत्रातील अभ्यासू लोकांमार्फत गावागावात पोहचवू लागलो आणि त्याबरोबरच वन्यजीवानाच्या वेगवेगळ्या नोंदी पण ठेऊ लागलो आणि त्याचे पर्यावरणातील महत्त्व लोकांना पटवून देऊ लागलो.
कोयना म्हणजे जागतिक वारसा स्थळ असलेल्या पश्चिम घाटामधील अभयारण्य त्यामुळे त्याचे महत्व देखील तेवढे जास्त होते आणि अशा ठिकाणी आम्ही कामं करत आहोत. हे आमचे भाग्य समजत आहे.
इथली जैवविविधता खरंच नाविन्यपूर्ण आहे. त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्ती इथं आल्यावर कधीच निराश होत नाही. आणि त्यात पाऊस म्हणलं की सोन्याहून पिवळं. 2019 मध्ये तर भारतातील सर्वात जास्त पावसाची नोंद येथील पाथरपुंज या गावी झाली.
घनदाट जंगल, उंच पर्वत, दऱ्या-खोऱ्या, पठार, अथांग असा शिवसागर जलाशय व येथील हवेतील गारवा सर्वांनाच मोहात पाडतो. त्यामुळे येथे पर्यटकांचे प्रमाण देखील वाढत होते. परंतु ते केवळ कोयना धरण आणि धबधबे येवढ्या पुरते मर्यादित होते. त्यात वनविभागाच्या सहकार्याने बदल करून आम्ही निसर्ग पर्यटन मार्फत लोकांना येथील निसर्गातील घटकांचे देखील महत्व पटवून देऊ लागलो.
डिस्कवर कोयना या आमच्या टीम मार्फत चार वर्षापासून आम्ही कित्येक दुर्मिळ जीवजंतूंची नोंद केली आहे. त्यामध्ये पक्षी, साप, बेडूक, पाली, गोम, विंचू, कोळी, फुलपाखरे, वनस्पती, फुले, किडे, प्राणि इतर सरपटणारे व उभयचर जीवांचा समावेश आहे.
वर्षभरातच अनेक जीवांच्या आकारातील, खाद्यातील, रंगातील तसेच इतर काही गोष्टीतील बदलांचा शोध लावण्यात ही टीम ला यश आले आहे. टीम मध्ये प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असलेले सदस्य आहेत. त्यामुळे ट्रेकिंग असो, पक्षी दर्शन असो, जंगल सफारी असो किंवा दूर्ग भ्रमंती असो येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला इथली योग्य ती माहिती मिळते.
याच बरोबर काही हौशी पर्यटकांकडून होणाऱ्या चुकीच्या गोष्टी रोखणे, समाजामध्ये जनजागृती करणे, माहिती फलक लावणे यासारख्या इतर ही गोष्टी टीम मार्फत केल्या जातात. यासाठी भागातील सर्व स्तरातील नागरिकांची व इथल्या वनविभागाची ही चांगली साथ मिळत आहे. व लोक स्वतःहून यात सहभाग घेत आहेत.
पर्यावरणाच्या वाढी बरोबरच येथील स्थानिक माणूस पण जगला पाहिजे अशी भूमिका घेऊन आमची वाटचाल चालू आहे.
येत्या दोन तीन महिन्यात आपल्यावरती कोसळलेलं हे कोरोनाचे संकट दूर होईल अशी आशा आहे, व असं झालंच तर येत्या पावसाळ्यात कोयनाला पर्यटकांची ओढ ही नेहमीसारखी वाढेल. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणेच सर्व नागरिक व आमची टीम आपल्या स्वागताला व इथली परिपूर्ण माहिती द्यायला सर्व शासकीय नियम अटी संभाळून हजर असेल.