हरवत चाललेले ग्रामीण जीवन...
ग्रामीण भागात असलेली नात्याची वीण आजही कायम आहे का? ग्रामीण भागातील रुढी, परंपरा आणि या परंपराच्या कारणांचा वेध घेणारा सागर गोतपागर यांचा लेख नक्की वाचा
X
सामूहिक जीवन पद्धती ही खेड्यांचा अविभाज्य भाग होती. सन समारंभ सुख दुःखाचे कार्यक्रम हे सामूहिकरित्या साजरे केले जायचे. आज आपण जसजसे अती दुर्गम खेड्यात जाऊ तसतसे जास्त प्रमाणात ही सामूहिक पद्धत अस्तित्वात असल्याचे दिसुन येते.
कुणी मरण पावलं की गाव गोळा होतो. दुःखात असलेल्या व्यक्तीला समजावण्यासाठी पोकते वयस्कर असलेले लोक धीर देतात.
"सर्वानाच एक दिवस जायचे आहे; तो परमेश्वराला प्रिय झाला, समोर दिसतोय तोवर डोळे भरून पाहून घे" असे सांगितले जाते. पाहुणे जमा होतात. ग्रामीण ढंगाची ताटी बनवली जाते. नैसर्गिक रीतीने जन्मलेल्या व्यक्तीला नैसर्गिक रुढीनेच निरोप दिला जातो.
समोर असलेल्या शिक्या मध्ये पैसे टाकले जातात. सुपात धान्य ठेवले जाते. धान्याशी शेतीशी असलेली नाळ ही अशाप्रकारे शेवटपर्यंत जपली जाते. अनुभवी लोक सरण रचतात. अशा रीतीने मृत व्यक्तीस निरोप दिला जातो.
भावकीतील लोक त्या दुःख असलेल्या घरात जेवण घेऊन येतात. त्या घरातील व्यक्तीसोबत जेवण करतात. या दुःखातून सावरेपर्यंत समाज त्यांना धीर देतो. अनुभवाचे बोल सांगितले जातात.
'परमेश्वर तिसऱ्या दिवशी मायेची नस कापतो'
ही समजूत ग्रामीण भागात आढळते.
या सर्व कृतीमध्ये लोक सातत्याने एकत्र यायची. कुणाचे कोणतेही सन समारंभ असेल तर एकत्र येऊन नियोजन केले जायचे. तांदूळ निवडण्यासाठी स्त्रिया जमायाच्या. लग्नाच्या वेळी मुहूर्त मेढ रोवण्याची एक नैसर्गिक परंपरा ग्रामीण भागात दिसून येते. यामध्ये पाच झाडांच्या फांद्या तोडून त्या एकत्रितपणे रोवल्या जातात. आणि त्याची पूजा केली जाते. लोक लग्नघराबाहेर करंजीचा मांडव घालतात.
ही पद्धत आदिवासींमध्ये देखील आढळते. तेथे मोहाची पूजा केली जाते. जांभळाचा मांडव घातला जातो. या दोन संस्कृतीमध्ये ही साधर्म्य असलेली सामूहिक सांस्कृतिक कृती आढळते.
पूर्वी लग्न हे दारातच व्हायचे सर्व काम करायला समाज पुढे असायचा.
ग्रामीण भागात लोकांच्या मध्ये एकमेकांविषयी असलेली ही आपुलकीची भावना जपण्यासाठी एकत्र यायला लावणारे हे सामूहिक कार्यक्रम होत असायचे.
उखाणे घेणे. लग्नामध्ये हळद दळून तीच नवरा नवरीला लावली जायची. हळद दळताना पारंपरिक जात्यावरच्या ओव्या गायल्या जातात. या ओव्या म्हणजे ग्रामीण संस्कृतीचा साहित्यात जतन केलेला ठेवा आहे. लग्न गीते म्हणायची एक वेगळी परंपरा आढळते.
लोक कलावंत सरुबाई धडे सांगतात
"आता पूर्वीसारखं राहील नाही. पूर्वी माणूस संस्कृती जपत हुता. आता माणसाचं जीनं पशू पक्षाप्रमाणे झाले आहे"
त्या सांगतात त्यांच्या काळात पोरीचं लग्न ठरलं म्हणजे घरात चोरी झाल्यासारखं वाटायचं. आई बाप अस्वस्थ असायचे. लग्नाचा सोहळा हा आजच्यासारखा काही तासांचा नसायचा. चार चार दिवस लग्न चालायची. मुलगी पाहण्यापासून ते लग्न होइपर्यंतची घालमेल त्यांनी त्यांच्या जात्यावरच्या ओवीत मांडली आहे.
त्या म्हणतात...
लेकीला व मागइन
आलं पुण्याचं पोलिस
नाही देयाची सांगा त्याला
साळु शिकते कालिज
लग्न ठरल्यानंतर बापाची होणारी घालमेल त्या गाण्यातून व्यक्त करतात.
मांडवाच्या बाई दारी
बाप बघतो चोरावानी
आसवं गाळतो मोरावाणी
लेक नांदायला निघाल्यावर अश्रू गाळणाऱ्या बापाची व्यथा त्या या ओळींमधून मांडतात.
या सोहळ्यामध्ये वरमायी (वराची आई) आपल्या माहेरकडून येणाऱ्या आहेराची वाट कशी पाहते आणि भावाची गाडी येताच तिला होणारा आनंद त्या पुढील ओळीत मांडतात.
मांडवाच्या बाई दारी
का ग वरमाय हसली
बाई बंधूच्या आहेराची
समोर टॅक्सी दिसली
या सर्व परंपरा ग्रामीण मौखिक साहित्यात आढळून येतात.
काळाने आपले पाऊल जसजसे पुढे टाकले. तसतसे विकासाच्या नावाखाली ग्रामीण संस्कृतीचा ठेवा असणाऱ्या काही सामूहिक परंपरा नष्ट होऊ लागल्या.
लोक एकत्र येणे. कमी होऊ लागले. दारामध्ये लग्न घेणे बंद झाले. मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्नात या परंपरा दुर्मिळ झालेल्या चिमण्यांप्रमाणे गायब झाल्या. बुफे च्या जेवणावळी मध्ये तांदूळ निवडण्यासाठी येणाऱ्या स्त्रिया जेवण वाढणारी माणसे, पाणी वाढणारे पानखे गायब झाले.
ग्रामीण भागात जेवणावळी मध्ये वडाची पत्रावळी असायची तिची जागा प्लॅस्टिकच्या ताटानी घेतली. विकासाच्या या टप्प्याचे दूरगामी परिणाम ग्रामीण संस्कृतीवर होऊ लागले आहेत. लोक एकत्र जमण्यासाठी कार्यक्रम कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आजपर्यंत टिकून राहिलेली सामूहिकता येत्या काळात दिसेल की नाही हा प्रश्न आहे.
ग्रामीण नातेसंबंधांमध्ये ओलावा असायचा. कुणी पाहुणा आला की तो सर्व घरात त्याचा पाहुणचार व्हायचा. लोक एकमेकांशी भरभरून बोलायचे. त्या बोलण्यात कृत्रिमता नव्हती. आता नात्यांमधील हे वंगण कोरडे पडत चालले आहे.
विकासाच्या दिशेने चाललेल्या देशातील खेड्यांना सुद्धा शहरातील विकासाची स्वप्ने पडू लागली आहेत. शाश्वत विकासाच्या कल्पना ही गावांची शक्तिस्थळे होती. ग्रामीण भागातील या गोष्टी हळू हळू नष्ट होत चालल्या असल्या तरीही काही खेड्यांमध्ये या प्रथा परंपरा सुरू दिसतात. विशेषतः आदिवासी भागात नैसर्गिक प्रथा परंपरा सामूहिक जीवन आजही पाहायला मिळते. या बहुतांश प्रथांवर निसर्गाचा प्रभाव दिसून येतो.