Home > मॅक्स ब्लॉग्ज > चरखेसे आझादी मिली क्या?

चरखेसे आझादी मिली क्या?

चरखेसे आझादी मिली क्या?
X

आज 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन.

आज पुन्हा 'चरखे से आझादी मिली क्या... कितने झूले थे फांसी पे'... सारखे भंकस लेख सुरू होतील आणि तरुणांची दिशाभूल करतील. सध्या भारतातील काही लोकांचा मैत्री, प्रेम, अहिंसा, लोकशाही या धोरणांवर विश्वास नाही तर गोळ्या घालून समस्यांचे निराकरण करावे, हुकूमशाही आणावी असे त्यांना वाटते. 70 वर्षात भारतात काहीच झाले नाही असं म्हणणारे एक गोष्ट विसरतात की भारत स्वतंत्र झाला तेव्हा व नंतर कितीतरी देश स्वतंत्र झाले पण आज यापैकी किती देशांनी भारताएवढी प्रगती केली? लोकशाही किती देशांत टिकली? अहिंसक आणि सशस्त्र स्वातंत्र्यलढ्यातला फरक माहीत नसल्यामुळे हे होत असावे.

सशस्त्र आंदोलनात (सशस्त्र व गुप्त क्रांतीकारी मार्ग) थोड्या लोकांकडून संपूर्ण त्यागाची अपेक्षा होती आणि त्याचा परिणाम आणि पाठिंबाही मर्यादित होता. याउलट अहिंसक आंदोलनात सर्वांकडून थोड्या त्यागाची अपेक्षा होती त्याचा परिणाम म्हणून तळागाळातील प्रत्येकामध्ये, शेतकऱ्यांपासून सफाई कर्मचाऱ्यापर्यंत, उद्योगपतींपासून कामगारापर्यंत आणि स्त्रियांपासून बालकांपर्यंत सर्व लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि देशाच्या स्वातंत्र्याबद्दल प्रेरणा निर्माण झाली, जी तोपर्यंत नव्हती.

सशस्त्र आंदोलन (सशस्र व गुप्त क्रांतीकारी मार्ग)

  1. मूठभर व्यक्ती परमोच्च त्याग करतात,
  2. सामान्य व्यक्ती उघडपणे सहभागी होऊ शकत नाही
  3. सूडचक्र सुरू होते
  4. खुलेपणाचा अभाव असतो
  5. शस्त्रे व साधन सामुग्रीबाबत टोकाचे परावलंबन. कधी कधी शत्रू राष्ट्राची मदत घ्यावी लागते.
  6. स्वातंत्र्योत्तर भारतात हा मार्ग गैरलागू

अहिंसक आंदोलन

  1. सर्वांकडून थोड्या त्यागाची अपेक्षा.
  2. तुम्ही चरखा चालवला तुम्ही स्वातंत्र्यसैनिक.
  3. तुम्ही हरिजनांसोबत सहभोजन करा तुम्ही स्वातंत्र्यसैनिक.
  4. तुम्ही आंतरजातीय विवाह केला किंवा त्याला प्रोत्साहन दिले तुम्ही स्वातंत्रसैनिक.
  5. तुम्ही ब्रिटीशांविरुध्द बोला प्रभातफेरी काढा तुम्ही स्वातंत्र्यसैनिक.
  6. तुम्ही हरिजन सेवा करा तुम्ही स्वातंत्र्यसैनिक.
  7. तुम्ही स्वच्छता करा तुम्ही स्वातंत्र्यसैनिक.
  8. कुष्ठरोग्यांची गरीबांची सेवा करा(ऊदा-बाबा आमटे) तुम्ही स्वातंत्र्यसैनिक.
  9. स्त्री पुरुष समानता आणि सुधारणा करा तुम्ही स्वातंत्र्यसैनिक.
  10. तुम्ही खेड्याकडे चला तुम्ही स्वातंत्र्यसैनिक.
  11. तुम्ही अंधश्रद्धा निर्मुलन करा तुम्ही स्वातंत्र्यसैनिक.

'कोसबाडच्या टेकडीवरून' या अनुताई वाघ यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकावर पु. ल. देशपांडे यांनी खूप सुंदर प्रतिक्रिया लिहिली आहे. गांधीजींची महानता यावरूनच समजण्यास मदत होते. "अन्यायाविरुद्ध आपण पेटू शकतो, असे तळागाळातल्या लोकांना त्यांनी वाटायला लावले, हे आवश्यकच होते." हिंसक आंदोलनाविषयी ते म्हणतात, "भक्कन पेटणाऱ्या भडक्यासारखे. भडका उडतो तसाच विझतोही चटकन."

समाज बदलायचा असल्यास त्यासाठी विधायक प्रवृत्तीची, शांतपणाने, न कंटाळता शोषितांच्या लहानसहान अडचणी सोडवत त्यांच्यात जाऊन राहणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज लागते. गांधीजींनी अशी फार मोठी फौज निर्माण केली होती. गांधीजींची अहिंसा टोकाची होती असे एक असत्य पसरवले जाते. गांधीजींची अहिंसा टोकाची कधीच नव्हती . पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केल्यावर तेथे भारतीय सैन्य पाठवण्यास सांगणारे गांधीच होते.

क्रांतीसिंह नाना पाटील जेव्हा महात्मा गांधींना भेटले त्यांना आपल्या ‘पत्री सरकार’ बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले होते, की "नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली, साताऱ्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय! नाना, तुम्ही बहादूर आहात. निजामविरुद्ध लढताना बॉम्ब टाकणारेही महात्मा गांधी की जय म्हणणारेच होते हे विसरू नका."

अहिंसा दोन प्रकारची आहे.

एक तत्त्ववेत्यांची. तिला सामाजिक परिमाण नाही. आत्म्याची मुक्ती हे तिचं उद्दिष्ट. समाजातील वाईट बाबी सुधारण्यासाठी, समानतेच्या लढ्यासाठी, परदेशी सत्तेपासून मुक्त होण्यासाठी ती वापरली जात नाही. तत्त्ववेत्यांची अहिंसा ही शुध्द, साधी होती. तो अहिंसक प्रतिकार नव्हता. गांधींचं वैशिष्ट्य हे की त्यांनी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अन्याय दूर करण्यासाठी साधन म्हणून अहिंसेचा वापर केला.

तत्त्ववेत्ते म्हणत असत, 'दुष्ट प्रवृत्तीला तसंच प्रत्युत्तर देऊ नका, तुम्हाला एक मैल चालायला सांगितलं तर दोन मैल चाला'. गांधींनी असं कधीच म्हटलं नसतं. उलट विचारलं असतं, 'का चालू? अगदी पहिला मैलभर चालण्यासाठीही पुरेसं कारण असलं पाहिजे.' जगात न्यायाची स्थापना करण्यासाठी लढण्याचं अहिंसा हे हत्यार आहे. आजही त्यांचे विचार जिवंत आहेत - प्रकाश आमटे, अभय बंग, सत्यार्थी, मंडेला, दलाई लामा, मलाला युसुफजाई...

एकीकडे भगतसिंह-राजगुरु फासावर चढत होते. तर त्याच वेळी कोट्यवधी सर्वसामान्य भारतीय माणसे प्रांत, प्रदेश, संस्थान ह्या सगळ्या सीमा पार करून गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय म्हणून एक होऊन इंग्रजांविरोधात लढा देत होती.

सुभाषबाबू आझाद हिंद सेनेतून सशस्त्र लढा देण्याचा प्रयत्न करत होते. बाबासाहेब आंबेडकर दलित स्वातंत्र्यासाठी झगडत होते. चंद्रशेखर आझाद... किती नावे घ्यायची. फक्त हातात काठ्या घेऊन पाडव्याचे संचलन करणे, हा लढा नव्हे. असे करणारे लोकांना देवा- धर्मावरून जातीपातीवरून भडकवत होते. तेव्हा संघटना म्हणून हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा मुस्लिम लीग अशी नावे लावणाऱ्या आणि स्वतःला सामाजिक संघटना म्हणवणाऱ्या या संघटना, संघटना म्हणून लढ्यात आपलं काय योगदान देत होत्या?

ज्या लढ्यात आपण भाग घेतलाच नाही त्यात आघाडीच्या नेत्यांचे मतभेद (वैचारिक, अमलबजावणीबाबत असतील पण ध्येयाबद्दल कधीच नव्हते) चव्हाट्यावर आणून चघळत बसण्याचा नैतिक हक्क या संघटनांना कसा मिळतो?

संकेत मुनोत, 8087446346

Updated : 15 Aug 2020 1:06 AM IST
Next Story
Share it
Top