5G-जुही व न्यायालय
5G तंत्रज्ञान आरोग्याला घातक आहे का? अमेरिकेने 5 G तंत्रज्ञानास अजुनही का परवानगी दिली नाही? न्यायालयाने प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला हिची 5G संदर्भातील याचिका का फेटाळली? वाचा Adv. असिम सरोदे यांची महत्त्वपूर्ण माहिती... 'Defective, Vexatious' : Delhi High Court Dismisses Juhi Chawla's Civil Suit Against 5G Roll Out With Rs 20 Lakhs Cost
X
5G तंत्रज्ञानाला विरोध करणारी जुही चावला हिची याचिका फेटाळतांना दिल्ली उच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले ते अत्यंत चुकीचे आहेत. याचिका फेटाळणे सुद्धा अविचारीपणा.
एक तर जुही चावलाने मुळीच प्रसिद्धीसाठी ही याचिका केलेली नाही. ती मागील 5 वर्षांपासून या विषयावर बोलते आहे हे मला नक्की माहिती आहे. मुंबईचे प्रकाश मुन्शी यांनी माझा जुही चावलाशी संपर्क करून दिला. त्यावेळी जुही चावला, प्रकाश मुन्शी व इतर अनेक जण मुंबईत कुठेही मोबाईल टॉवर उभारण्याबद्दल व त्यातील मोबाईल रेडिएशन च्या दुष्परिणामांबद्दल बोलले होते. घाईघाईने त्यांनी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली व ती फेटाळण्यात आली होती.
जुही चावला ला प्रसिद्धीची गरज आहे, तिची याचिका त्रासदायक व अनावश्यक आहे, त्यामुळे कोर्टाचा वेळ वाया गेला आहे. ही कारणे न्यायालयाने लोकांप्रती व पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी झटकण्यासाठी वापरलेली आहेत. असे माझे मत आहे. मुळात 5G मागे असलेले प्रचंड आर्थिक फायद्याचे गणित व राजकारण समजून घेण्याची गरज आहे.
Ericson, नोकिया, Qualcomm अशा महाकाय जागतिक कंपन्या 5G साठी आग्रही आहेत. भारतात 5G चे मोठे नेटवर्क तयार असलेल्या,आर्थिकदृष्ट्या ताकदवान व प्रचंड राजकीय बॅकिंग असलेल्या रिलायन्स, जिओ, भारती एअरटेल, Vi व्होडाफोन-आयडिया यांना डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम ने 5G ट्रायल करायला मागच्याच आठवड्यात परवानगी दिली आहे. 5G स्पेक्ट्रम मधून $30 बिलियन म्हणजे कदाचित 21 खरब (अब्ज नंतर येणारा आकडा) रुपयांच्या सोन्याच्या खाणीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे, आयटी सेक्टरचे लक्ष याकडे नवीन काम देणारी योजना म्हणून आहे आणि अश्यावेळी यांच्यासमोर एक जुही चावला कोण आहे?
मोबाईल टॉवर विकिरणांमुळे (रेडिएशनमुळे) मानवी आरोग्य आणि पर्यावरण यांना धोका आहे याची जाणीव झाल्याने अमेरिकेसह 8 देशांनी 5G स्पेक्ट्रम नेटवर्कला स्थगिती दिली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर Huawei या चायनीज कंपनीची 5G मधील मक्तेदारी व चीनचा या तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढता दबदबा याची सुद्धा एक किनार या विषयाला आहे. आता सांगा जुही चावला या पार्श्वभूमीवर किस झाड की पत्ती आहे व म्हणतात तिला प्रसिद्धी पाहिजे आहे?
मला हे सांगायला पाहिजे की बेकायदेशीर मोबाईल टॉवर आणि रेडिएशन परिणाम याबाबतची आमची एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात मागील 4 वर्षांपासून पेंडींग आहे. पिंपरीचे डॉ सुरेश बेरी यांच्या मार्फत केलेल्या याचिकेत मी वकील असल्याने मला माहिती आहे की ही केस सुनावणीसाठीच येऊ नये यासाठी कसे व कोणते प्रयत्न होत आहेत, किती दबाव येत आहेत. जुही चावला ने मांडलेला विषय बरोबर आहे पण तिने न्यायालयातील सुनावणीची लिंक जाहीर करून चूक केली इतकेच. तिची याचिका जनहिताचा व्यापक प्रश्न मांडणारी आहे. 20 लाखांचा दंड तिच्यावर थोपणे अतार्किक व अन्याय्य आहे. 5G ने मानवी आरोग्याची व पर्यावरणाची हानी होणार नाही हे कंपन्यांनी पटवून द्यावे आणि मग काम सुरू करावे माझा तंत्रज्ञानाला विरोध नाही यात जुही चावलाने काय चुकीचे म्हटले होते??
पुण्यातील जेष्ठ अभ्यासक सुरेश कर्वे यांनी हे वाढत जाणारे 2G, 3G, 4G मागचे राजकारण व शास्त्रीय माहिती असलेले एक पुस्तक लिहिले आहे तर अभ्यासक मिलिंद बेंबळकर 5G स्पेक्ट्रम व मोबाईल रेडिएशन आणि परदेशात वॉशिंग्टन, इंग्लंड येथील कोर्टात याबाबत सुरू असलेल्या केसेस व त्या देशांनी 5G ला दिलेली स्थगिती याबाबत पुस्तक लिहून जवळपास पूर्ण केले आहे. मी उच्च न्यायालयातील केस दाखल करतांना या सगळ्या लोकांचे मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान रोबोट 2.0 नावाचा मोबाईल रेडिएशन विषयावरील रजनीकांत व अक्षयकुमार चा एक सिनेमा येऊन गेला. पशू, पक्षी व निसर्गावर मोबाईल रेडिएशन चा परिणाम दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
जापान, इंग्लंड, स्वीझर्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये, ब्रुसेल्स व कॅलिफोर्निया मध्ये 5G स्पेक्ट्रम थांबविण्यात आले व स्थगिती देऊन ते मोबाइल रेडिएशन चा विचार करीत आहेत. आपल्या भारतात ज्या विषयांवर चर्चा सुरू असतात त्यावरून आपण मागासलेले का आहोत याचे उत्तर मिळते?
@अॅड.असीम सरोदे
लेखक संविधानतज्ञ व मानवीहक्क विश्लेषक वकील आहेत