दलित पुरुषप्रधानता - आरोप आणि वस्तुस्थिती
दलित-पुरुषप्रधानतेच्या आरोपाचा वापर आज एकंदर दलित अस्मिताच दडपण्यासाठी केला जात आहे.आपल्या चळवळीचे स्वरुप सर्वहितैषु अशा विश्वव्यापी दृष्टिकोनातून आखलेले असताना आपल्यातल्याच काहींच्या शोषणाकडे आपण मुळीच डोळेझाक करु शकत नाही. समाजाचा एक सामूहिक प्रकल्प म्हणून स्त्रीविरोधी वर्तनाचा प्रश्न आपण हाती घेतला पाहिजे सांगताहेत डॉ. सुरज एंगडे ...
X
उच्चवर्णीय चित्रपटनिर्मात्यांची बौद्धिक घडण दलित अस्मितेचे मूलभूत प्रतीक म्हणून झाडू सोडून अन्य कशाची कल्पना करु शकत नाही हे दुर्दैवाचे असले तरी आश्चर्याचे मुळीच नाही.
समता, परस्परसन्मान आणि समानुभूती या तत्त्वांवर आधारित समाज घडवण्याची इच्छा असलेल्या लोकसमूहाला प्रत्येक व्यक्तीला समानाधिकार असणाऱ्या जगाच्या निर्मितीची जबाबदारी दुय्यम मानून चालणार नाही. याबाबत या वर्गाची जबाबदारी शोषणाधारे समर्थ झालेल्या वर्गापेक्षा निश्चितच अधिक असते. म्हणून जातीभेदविरोधी चळवळ संघटित करत असतानाच दलित चळवळीने तेव्हढ्याच हानिकारक असलेल्या लिंग, लैंगिक कल , धर्म, प्रदेश आणि अन्य भेदांविरुद्धही लढले पाहिजे.
दलित समाजाविरुद्ध अनेक आरोप केले जातात. पुरुषप्रधान वृत्तीचा आणि स्त्रियांना दिल्या जाणाऱ्या हीन वागणुकीचा आरोप त्यात असतोच. हा आरोप खोटा मुळीच नाही पण त्यांत इतरांपेक्षा काही वेगळेपणही नाही. अमेरिकेत ज्याला वोक पॉलिटिक्स म्हणतात त्या प्रथम वंशभेदविरोधी परंतु कालांतराने सर्व प्रकारच्या भेदांविरुद्ध , शोषणाविरुद्ध लढणाऱ्या आंदोलनाने शोषितांच्या वर्गवारीचा आपल्या चळवळीसाठी उपयोग केला. शोषितांना त्यांचे रास्त स्थान लाभावे यासाठीची वाट तयार करण्यासाठी समाजातील विविध अतिशोषित वर्गांची ओळख या आंदोलनाने पटवली. लिंगाधारित ओळख त्यात सर्वप्रथम आली. लैंगिक कल, प्रादेशिकता या बाबी लगेच त्यानंतर आल्या. यातच वर्गीय ओळखही मध्येच कुठेतरी आली. एकेक विषय चर्चेतून पटकन वगळून बेदखल करण्याची खोड लागलेल्या आजच्या जातजागृत समाजमाध्यमांत आर्थिक वर्ग या ओळखीला अगदी शेवटचे किंवा निदान सर्वांत कमी महत्त्वाचे स्थान लाभले ही बाब मोठी गमतीची आहे. एखाद्याचे माणूसपण त्याचे लिंग, लैंगिक कल, आणि धर्म वगैरेंच्या आधारे अजमावण्याच्या आवाहन केले जात आहे. त्याला विशेषतः एकविसाव्या शतकात तारुण्यात आलेल्या माझ्या आवडत्या जनसमूहात विशेष प्रतिसाद लाभत आहे.
यामुळेच दलित या विशेषणाला जोडून इतर नैतिक गुणविशेष लावले जाऊ शकत आहेत. पुरुषप्रधानता हा त्यातीलच एक. दलित-पुरुषप्रधानता. परंतु लिंगभाव (जेंडर) आणि लिंग ( सेक्स ) अशा ज्या ओळखी आहेत त्यांचे जरा स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. या दोन्ही भिन्न बाबी आहेत. लिंग ही एक जीवशास्त्रीय ओळख आहे. ती जन्मतःच आपल्याला लाभते. स्त्री किंवा पुरुष अशी ती ओळख असते. लिंगभाव ही मात्र अशी जन्मजात ओळख नाही. ती आपली निवड असते. दुसरा पुरुष, दुसरी स्त्री यांच्या संदर्भातील आपली निवड. किंवा ही निवड असा भेद न करणारीही असू शकते. वंश, जात किंवा अन्य काही कल्पित सामाजिक विभागणीप्रमाणेच लिंगभाव हीही एक साचेबद्ध सामाजिक संरचना आहे.
पण दलित पुरुषांमध्ये असलेल्या पुरुषप्रधानतेला दलित-पुरुषप्रधानता म्हणता येईल का? तसे म्हटले तर पुढचे बोलणेच खुंटेल आणि सलोख्याचा मार्ग काढणे कठीण होईल. येथे एक प्रश्न उपस्थित होतो. दलित पुरुषांचे स्त्रीविषयक वर्तन हे 'दलित' म्हणून होते की आपल्या साऱ्या पितृप्रधान समाजात पुरुषाला जे विशेष स्थान दिले जाते त्याचीच ती परिणती आहे?
दलित-पुरुषप्रधानतेच्या आरोपाचा वापर आज एकंदर दलित अस्मिताच दडपण्यासाठी केला जात आहे. दलित स्त्रिया आणि दलित पुरुष यांच्या अस्मिता खुद्द त्यांच्याच अंतरातून फुलण्याऐवजी त्या परस्परांच्या विरोधात उभ्या ठाकल्याचा भास उत्पन्न केला जात आहे.
दलित पुरुषाच्या वर्तनाचे व्यवच्छेदक अस्तित्व सिद्ध करणारा काही विश्वसनीय अभ्यास केला गेला आहे का? दलित पुरुषीपणा आणि दलित मुलावर झालेले पुरुषी संस्कार यांचाच अतिरेकी गवगवा केला जातो. वस्तुतः आया , आज्या, मावश्या, आत्या, बहिणी, सावत्र आया अशा घरातील वडीलधाऱ्या स्त्रियांचा मुलांच्या संगोपनात असलेला महत्त्वाचा वाटा त्यामुळे झाकोळला जातो. वर्चस्वाची विविध रुपे ज्या ज्या प्रकारे आपला प्रभाव पाडतात त्या सर्वांची तपासणी करणे म्हणूनच गरजेचे ठरते.
विशेषत: लेखक प्राध्यापक रोजा सिंग यांच्यासह अनेक दलित विदुषींनी तामिळनाडूच्या ग्रामीण विभागात दलित स्त्रियांना असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या स्थानाचा उहापोह केलेला आहे. खरे तर भूमीशी निकटचे नाते असलेल्या दलित समुदायात दलित मातृसत्ताकता सर्वत्र अनुभवास येते.
पुरुषी प्रभावाविरुद्धचा विद्रोह असे स्वरुप असलेला पाश्चिमात्य स्त्रीवाद हा 'दलित-पुरुषप्रधानता' या कल्पनेमागची प्रेरणा आणि आधार आहे. समाजातील इतर पुरुष असतात त्या प्रमाणात दलित पुरुष आपले प्रभुत्व गाजवण्याच्या परिस्थितीत असतात का? की त्यांची पुरुषप्रधानता दुष्ट ब्राह्मणी पुरुषप्रधानतेत अडकलेल्या जातीय व्यवस्थेला बळी पडल्यामुळे त्यांच्यात आली आहे? दलित पुरुषप्रधानता ही वस्तुतः जात, वर्ग आणि आपले लिंगभावलिप्त अस्तित्व यांची गोळाबेरीज होय.
हीही गोष्ट विसरून चालणार नाही की नागरी दलिताला आज आपले अनुभव मांडण्यासाठी पाश्चिमात्य शब्दप्रणाली उपलब्ध आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या त्याच्या आद्य पूर्वसूरींना तशी ती उपलब्ध नव्हती. तशा प्रकारच्या जाणिवांशी त्या लोकांचा संबंध आलेला नव्हता.
तथापि दलित पुरुषाची पुरुषप्रधानतेच्या आरोपातून सुटका करावी असा याचा अर्थ मुळीच नाही. उलट इतर साऱ्या प्रश्नांच्या बरोबरच याही बाबीचे भान राखून योग्य दिशा शोधण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. सारे प्रश्न मिटल्यावर याकडे पाहू असे म्हणून चालणार नाही. आपल्या चळवळीचे स्वरुप सर्वहितैषु अशा विश्वव्यापी दृष्टिकोनातून आखलेले असताना आपल्यातल्याच काहींच्या शोषणाकडे आपण मुळीच डोळेझाक करु शकत नाही. समाजाचा एक सामूहिक प्रकल्प म्हणून स्त्रीविरोधी वर्तनाचा प्रश्न आपण हाती घेतला पाहिजे.
~ डॉ. सुरज एंगडे
भाषांतर : अनंत घोटगाळकर
मुळ प्रसिद्धी :इंडियन एक्सप्रेस 13 डिसेंबर, 2020
(लेखक जगातील आघाडीचे संशोधक आणि विचारवंत असून, 'कास्ट मॅटर्स' या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. व्याख्याने, सेमिनारच्या निमित्ताने जग अनुभवतात. 'जी क्यु' या मॅगझीनने भारताच्या २५ प्रभावशाली तरुणामध्ये त्यांची निवड केली आहे. लेखकाच्या सहमतीने हे लेख मॅक्स महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहेत)