दाभोलकर मरत नसतात...
नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या बुद्धीवादी, विज्ञानवादी विचारांमुळे अमर झाले आहेत. त्यांची हत्या जरी झाली असली तरी आज त्यांच्या विचारांचे हजारो दाभोलकर तयार झाले आहेत. जे दाभोलकर वाचत आहेत आणि स्वत: जगत आहेत. देशाला नवी दिशा देत आहेत. दाभोलकरांच्या पुण्यतिथी निमित्त आमचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांचा सविस्तर लेख....
X
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली रामराजे कॉलेजमध्ये पत्रकारितेचं पहिलंच वर्ष होतं. कॉलेजची सुरुवात होऊन पाच दिवसच झाले होते. २० ऑगस्ट २०१३ नरेंद्र दाभोलकर सकाळी मॉर्निग वॉक ला गेले असता त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी आमचे शिक्षक माधव गवाणकर यांनी सांगितली. त्यावेळी आम्हालाही दाभोलकर कोण होते माहित नव्हतं ? त्यांचे कार्य काय ? ते काय करतात हे ही माहित नव्हतं माझ्यासोबत अनेक विद्यार्थी होते ज्यांना दाभोलकर कोण होते हे माहित नव्हतं.
माधव गवाणकर यांनी आम्हा सर्वांना नरेंद्र दाभोलकर सांगायला सुरुवात केली. यावेळी देखील माध्यमांनी दाभोलकरांच्या हत्येचा मुद्दा लावून धरला होता. रोजच्या दाभोलकरांच्या बातम्या येत होत्या. पण त्यात अजूनही एक बातमी मिसिंग आहे. ते म्हणजे १० वर्ष पूर्ण झाले तरीही नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी अजूनही मोकाट फिरत आहेत. हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलिसांचं गुन्हेगारांना शोधण्यासाठीचं कसब हे जागतिक पातळीवर नावाजल्या गेलेलं आहे. मग दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांना का अपयश येतयं ? हा प्रश्न इथल्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्हं निर्माण करणारं आहे ?
अंधश्रद्धा निर्मूलन समिती
नरेंद्र दाभोलकर हे खऱ्या अर्थाने बुद्धीवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. अघोरी सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना १९८२ साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र, १९८९ साली नरेंद्र दाभोलकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली. ते स्वत: या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते.
दाभोलकरांची हत्या जरी २० ऑगस्टला केली असली तरी त्यानंतर खऱ्या अर्थानं दाभोलकरांचे विचार आणि त्यांचे कार्य घरोघरी पोहोचले ते निधनाच्या बातम्यानंतर. त्यांच्या हत्येविरोधात लोकं एकवटली, मूकमोर्चे, आंदोलने झाली. परंतु आजही दाभोलकरांना न्याय मिळायचाय. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक देशाला समजावून सांगणारा माणूस म्हणजे नरेंद्र दाभोलकर. दाभोलकरांच्या आयुष्याचं फलित म्हणजे ज्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला तो जादूटोणाविरोधी कायद्यासाठी. अनेक वर्षांच्या संघर्षाचं रूपांतर ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध’ या कायद्यात झालं.
अंधश्रद्धेविरोधात लढा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात करण्यात आले होते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. परंतु सध्या राज्यातील राजकारणाचा स्तर खालावला आहे. जनतेची काम सोडा, आमदार, लोकप्रतिनिधींना थेट दाभोलकर करण्याच्या धमक्या येत आहेत. आणि धमक्या देणारे मोकाट फिरत आहेत. दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेचा धमकी म्हणून वापर करणाऱ्या मेंदूंविरोधातच डॉ. दाभोलकर आयुष्यभर लढले होते. आता अशा मेंदूंविरोधात लढण्याचं काम सद्सदविवेक बुद्धी जागृत असलेल्या प्रत्येकाला करावचं लागणार आहे. ती खऱ्या अर्थानं दाभोलकरांना आदरांजली ठरेल. कारण दाभोलकर मरत नसतात, दाभोलकर मेंदू जागृत असलेल्या प्रत्येकामध्ये जिवंत असतात...