Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना संकटातील विकृत नराधम

कोरोना संकटातील विकृत नराधम

कोरोनासारख्या मानवतेवरील संकटामध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न काही महाभाग करत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री रेमडेसीवीर प्रकरणात थेट पोलिस स्टेशनला दाखल होतात. तर एक भाजपचा खासदार जेट विमानाने रेमेडेसिवीर उपलब्ध करून देतो.कोरोन रुग्णांची तडफड नातेवाईकांची उद्विग्नता यादरम्यान औषधासाठी होणारी साठमारी स्वतःच्या शब्दात व्यक्त केली आहे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पोखरकर यांनी...

कोरोना संकटातील विकृत नराधम
X

..एक परिचित करोना पॉझिटिव्ह होऊन पुण्याला रुग्णालयात दाखल होते.त्यांच्या एका नातलगाचा परवा मला फोन आला.'दोन रेमडेसीवीर इंजेक्शन तात्काळ हवीत,इथे कुठेच उपलब्ध नाहीत,काहीतरी करा'असं म्हटले.मी पाहतो म्हणून फोन ठेवला.पुन्हा काही वेळाने त्यांचा फोन आला.म्हटले,'नवी मुंबईच्या एका रुग्णालयातून एक डॉक्टर रेमडेसीवीर बाहेर काढून विकतात.त्याच्याशी संपर्क झालाय.१६ हजाराला एक इंजेक्शन म्हणतोय.आम्हाला काही पुण्याहून तिथपर्यंत येणं शक्य नाही.तुम्हाला पैसे ट्रान्स्फर करतो.तुम्ही ती इंजेक्शन घेऊन अर्ध्या रस्त्यापर्यंत आलात तर बरं होईल.'

रेमडेसीवीरचा काळाबाजार सुरु असल्याचं ऐकून-वाचून माहिती होतं.पण हे प्रत्यक्ष ऐकून मी गांगरूनच गेलो.त्यांना म्हटलं,माझ्याने हे अशा मार्गाने इंजेक्शन उपलब्ध करण्यात तुम्हाला अजिबात मदत होणार नाही.मी रीतसर इथले आमदार,मंत्री यांना विनंती करतो आणि त्यांच्यामार्फत तुम्हाला इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो.

त्या पद्धतीने प्रयत्न केले आणि इंजेक्शन उपलब्ध होऊन समस्या दूर झाली. पण या सगळ्यातून रेमडेसीवीरचा कसा काळाबाजार बिनदिक्कतपणे सुरु आहे आणि त्याची पाळंमुळं राज्यभर किती फोफावली आहेत ते माझ्या प्रत्यक्ष समोर आलं.रुग्ण पुण्याला..त्यांच्या नातेवाईकांनी लिंक शोधली नवी मुंबईत..आणि मी नसतो तर अडीच हजारांच्या इंजेक्शन्सचे तब्बल ३२ हजार रुपये मोजून त्यांनी ती नेलीही असती !

आजच यासंदर्भात आणखी एक बातमी वाचली.पुण्यात अनधिकृत मार्गाने रेमडेसीवीर उपलब्ध करून देणारी एक टोळी पुणे पोलिसांनी गजाआड केलीय.त्यात एक परिचारिका अन्य काही मेडिकल स्टाफचा समावेश आहे ! तब्बल ४० हजार रुपयांना एक याप्रमाणे या टोळीने कालपर्यंत ४० इंजेक्शन विकल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात पुढे आलंय.डॉ.प्रवीण जाधव,डॉ.सचिन कसबे आणि डॉ.शशांक राळे या तीन डॉक्टरांनाही अशाच भ्रष्टाचाराबद्दल पोलिसांनी अटक केलीय.सरकारी करोना केंद्रात रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी हे डॉक्टर एक लाख रुपये उकळत होते !

आमच्या ठाण्याच्या पालिका कोविड रुग्णालयातही असेच प्रकार समोर आले आणि त्यात डॉक्टरांना अटक झालीय ! मी त्या पुण्याच्या माझ्या परिचितांना आज सकाळी खोदून खोदून विचारात होतो कि तुम्हाला नवी मुंबईत कोण डॉक्टर रेमडेसीवीर देणार होतं त्याचे नाव सांगा.पण नाहीच सांगितले त्यांनी.कुठून तरी मिळवावंच लागेल.यांची नावं जगासमोर आणावीच लागतील.लोक कोणत्या परिस्थितीतून जाताहेत..काय दशा झालीय लोकांची..आणि हे विकृत नराधम...शी....माणूस म्हणण्याच्या लायकीची तरी आहेत का हे..? स्वतःचा जीव धोक्यात घालून करोना रुग्णांची अहोरात्र सेवा करीत असलेल्या प्रामाणिक डॉक्टर आणि अन्य मेडिकल स्टाफला लाज आणतात हे नराधम...

गृहमंत्र्यांनीही याबाबतीत पोलीस दलाला अधिक जागरूकतेने,दक्षतेने लक्ष घालण्याचे आदेश द्यायला हवेत.फार मोठ्या प्रमाणात हे गैरव्यवहार सुरु आहेत.ते थांबायलाच हवेत.पोलीस,कायद्याची भीती का वाटत नाहीये हे प्रकार करणाऱ्यांना ?

Updated : 6 May 2021 11:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top