Home > मॅक्स ब्लॉग्ज > गोमुत्र पाजले असते तर गायी वाचल्या असत्या, व्हेटरनरी डॉक्टरची गरज काय ?

गोमुत्र पाजले असते तर गायी वाचल्या असत्या, व्हेटरनरी डॉक्टरची गरज काय ?

कणेरी मठातील गायींच्या मृत्यूनंतर येथील गायींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अध्यात्मिक उपचारांचा पुरस्कार करणाऱ्या विज्ञानापेक्षा अध्यात्माला मोठे मानणाऱ्यांना विज्ञानाच्या साधनांची गरज का पडते असा सवाल उपस्थित केला आहे डॉ. प्रदीप पाटील यांनी...

गोमुत्र पाजले असते तर गायी वाचल्या असत्या, व्हेटरनरी डॉक्टरची गरज काय ?
X

कणेरी मठातील अदृष्य काढसिद्धेश्वर महाराजांनी गायींना गोमुत्र पाजले असते तर गायी वाचल्या असत्या. उगाचच विज्ञानाच्या व्हेटरनरी डॉक्टरांना बोलावले. किंवा विज्ञान संपविणार्या इस्त्रोचे वैज्ञानिक शर्मांना आध्यात्मिक उपचार करायला लावले असते तरी गायी वाचल्या असत्या. पंचमहाभूतातले एक भूत वापरून आयुर्वेदिक औषध दिले असते तरी गोमाता वाचली असती.

गोमातेच्या पोटातल्या देवांसाठी होमहवन केले असते तर जगातल्या सर्व गायी अमर होतील. प्रत्येक गोमातेच्या पोटातल्या देवांना ताजे अन्न दिले असते तर देवही मेले नसते. गायीही गेल्या, देवही गेले! देव देवाघरी गेले. काढसिद्धेश्वर महाराजांनी कोव्हीडसाठी काढलेला "काढा" गायींसाठी तयार केला असता तर गोमाता स्वर्गगृही पाठविण्याचे पाप झाले नसते.

गोरक्षकांना गायींशेजारी स्वधर्मरक्षणासाठी दिवसरात्र उभे केले असते तर गायींबरोबर धर्म वाचला असता. केंद्रीय संस्कृती मंत्र्यांचे संस्कृती रक्षणाचे आदेश नजरेआड केले नसते तर धर्मप्रतिक गोमाता कैलासवासी झाल्या नसत्या. गोरक्षक आणि संस्कृती रक्षक मंत्र्यांना गायींनी व पोटातल्या देवांनी धन्यवाद दिले असते. काढसिद्धेश्वर मठाचे प्रॉडक्ट पंचगव्य साबण वापरले असते तर गायीच्या पोटातील बॅक्टेरिया मेले असते आणि पोटातले देव बॅक्टेरियामुळे कैलासवासी झाले नसते.

गायी गेल्याने ३३ करोड देवही गेले. ८ वसू, ११ रूद्र, १२ आदित्य, १ इंद्र, १ प्रजापती यांचे काय झाले असेल ही कल्पनाही करवत नाही. हे देव सृष्टीचे व्यवस्थापन करतात पण मठाच्या व्यवस्थापनाने घात केला! कृषी विज्ञान केंद्र महाराज-बुवांनी काढले तर शासनमान्य गोमृत्यू होतात हा संदेश समाजात जाणे योग्य नाही एवढे तरी अदृष्य काढसिद्धेश्वर महाराजांनी मठातून सांगत रहावे. सुमंगल पंचमहाभूत महोत्सवात अन्न शिळे होऊ नये म्हणून आध्यात्मिक उपाय केले असते तर विज्ञानाचे पाय धरायची वेळ आली नसती.

एवढे थोर ज्ञान वेद आणि संस्कृतीत साठविलेले असताना शिळे व मानवी अन्न गोमातेला पचणार नाही हे अज्ञान का बरे? शिळ्या कढीला ऊत आणून गोमातेला यमसदनी पाठविणे संस्कृती रक्षणार्थ हिताचे नाही. उरलेल्या गायींना आयुर्वेद आणि पंचमहाभूते नव्हे तर विज्ञान वाचवणार याचे शल्य सर्व भक्तांच्या आध्यात्मिक मनात वर्षानुवर्षे राहिल यात काहीच शंका नाही.

- डॉ.प्रदीप पाटील

Updated : 25 Feb 2023 11:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top