कोरोनाच्या लशीवरून आठवलं..!
राजीव गांधी, व्हीपी सिंग, चंद्रशेखर, पीव्ही नरसिंह राव, देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्या काळात पोलियो लसीकरण झाले... यातील अनेक जण एकमेकांचे राजकीय विरोधक होते... यातील कोणत्या पंतप्रधानांनी पोलियो लसीकरणाचे ढोल वाजवले. वाचा आनंद शितोळे यांचा लेख...
X
एकेकाळी पोलियो ही भारतातली मोठी आरोग्य समस्या, लुळी पांगळी असहाय्य खुरडत चालणारी माणसं, तडजोड करून आयुष्य जगणारी माणसं सगळ्यांच्या डोळ्यासमोर असायची. पोलियोचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १९८५ पासून प्रयत्न सुरु झाले. जन्मलेल्या मुलांना लसीकरण अनिवार्य होतंच पण सतत ठराविक काळाने एकाच वेळी सगळ्या पाच वर्षाखालील बालकांना पोलियो डोस द्यायचा यासाठी नियोजन सुरु झालं. पल्स पोलियो अभियान...
शब्दशः लक्षावधी वेगवेगळ्या स्तरातले सरकारी, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न करून हे अभियान नेटाने राबवलं. "दो बुंद जिंदगी" हे स्लोगन घेऊन देश पोलियो हटाव मोहिमेत सहभागी झाला. रविवारी सकाळी खांद्याला पांढऱ्या रंगाचे कंटेनर लावून घरोघरी जाणारे आरोग्यकर्मचारी नेहमीच दृश्य झालं. २०११ मध्ये पोलीयोचा शेवटचा रुग्ण नोंदवला गेला. २७ मार्च २०१४ ला, जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलियो मुक्त देश म्हणून जाहीर केलं.
१९८५ ते २०११ या कालावधीत राजीव गांधी, व्हीपी सिंग, चंद्रशेखर, पीव्ही नरसिंह राव, देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, वाजपेयी आणि मनमोहनसिंग प्रधानमंत्री होऊन गेले. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या या पैकी एकाही माणसाने पोलियो लसीकरण फुकट करतो. म्हणून राजकीय बाजार मांडला नाही. यापैकी एकाही माणसाने मागच्या सरकारची योजना म्हणून ना लसीकरण बंद केले. ना स्वतःच्या नावाचे ढोल वाजवले.
ही शंभर कोटींच्या प्रचंड देशात राबवलेली मोहीम संपूर्णपणे सरकारने खर्च करून केलेली होती. या तत्कालीन नेत्यांनी, त्यांच्या सोबत असलेल्या आरोग्य मंत्र्यांनी आणि लक्षावधी भारतीय कर्मचाऱ्यांनी आणि कोट्यावधी लेकरांच्या आईबापांनी देशाला पोलियोमुक्त केलं. या बाबीही आपल्याला माहिती असायला हव्यात.
(आनंद शितोळे यांच्या फेसबुक भिंतीवरून)