सेवाकुंड धगधगत राहावे
केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजातील तळातील घटकाला मदत करण्याची वेळ असल्याचे खडेबोल राज्यातील भाजप नेत्यांना सुनावले. कोविड संकटाच्या काळात अनेक समाजसेवी आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मदत करत आहेत. परंतु 'काही' पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते बोलकी संकट करत असल्याची खंत चपराकचे संपादक घनश्याम पाटील यांनी व्यक्त केली आहे..
X
भारतातल्या लोकांनाच नव्हे तर विदेशातले जे दुतावास आहेत त्यांनाही ऑक्सिजन पुरवण्याचं काम भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांनी केलं. सरकार नसतानाही कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार करून लोकांना त्यांनी मदत केली. काम करणारे असे जे लोक जिथं कुठं आहेत ते आजच्या काळात अत्यंत कष्टानं काम करत आहेत. नाव, मोठेपणा या गोष्टी बाजूला सारून, झोकून देऊन काम करावं लागतं. ते श्रीनिवास आणि त्यांची टीम करतेय. दुर्दैवानं सध्या असे काही अपवाद वगळता सवर्र्च राजकीय पक्षात बोलके शंखच अधिक दिसतात.
सत्ता मिळवणं, सत्ता राबवणं ही गोष्ट वेगळी आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावत जाणं ही गोष्ट वेगळी. पूर्वी राष्ट्रसेवा दल होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या काही संघटना आहेत ज्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत सेवाधर्म म्हणून पुढे येतात. ज्यांच्या हृदयात सेवेच्या, त्यागाच्या संस्काराचे झरे पाझरताहेत त्यातले अनेकजण आजही रस्त्यावर उतरून काम करत आहेत तर काहीजण फक्त फोटो काढून घेऊन चमकोगिरी करण्यात मग्न आहेत. डिबेट करणं, समोरच्याला त्यात हरवणं, भाषणं देणं, सोशल मीडियावरून मतं मांडणं, नेत्यांच्या समर्थनार्थ हिरीरीनं उतरणं, एकमेकांची उणीदुणी काढणं हेच अनेकांना सध्या मोठं सामाजिक काम वाटतंय. एखाद्याचा जीव वाचवण्यापेक्षा 'हा आमचा', 'हा परिवारातला' अशी भावना अनेक ठिकाणी दिसतेय.
राजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे असे सर्वच राजकीय पक्ष सांगतात. मात्र या जागतिक महामारीच्या काळात समाजकारण महत्त्वाचे म्हणणारे पक्ष पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसतात. युवा काँग्रेस आणि महाराष्ट्रात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत आहेत. इतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षात तसं दिसत नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर खूप मोठा त्रागा आणि चीड दिसतेय. आम्ही काम करतोय तरी आम्हाला मतं मिळत नाहीत हे ते सातत्यानं बोलून दाखवत आहेत. ज्यांच्याकडं काहीच नाही आणि आता आपण काम केलं तरच लोक भविष्यात आपल्याला विचारतील असं ज्यांना वाटतं तेच काम करताना दिसत आहेत.
खरंतर काम करणार्या माणसाला पक्ष, बॅनर, पोस्टर हवे अशा सगळ्या अंधश्रद्धा आहेत हेही दिसून आले. ज्यांचा राजकीय विचार नाही असे असंख्य लोक करोनाच्या काळात सेवाकार्यात आघाडीवर दिसत आहेत. ते आपापल्या पद्धतीनं जनसेवा करताना दिसतात. राजकीय कार्यकर्त्यांपेक्षाही हे प्रमाण सध्याच्या काळात मोठे आहे ही सकारात्मक बाब आहे. कुणाचं तरी चांगलं व्हावं, दुसर्याला मदत व्हावी ही भावना अंतःकरणात ठेऊन असे अनेक दीप प्रज्वलीत झालेले दिसत आहेत. घरकोंडीच्या काळात घरोघरी जाऊन किराणा सामानाचे वाटप करणे, जे गरीब उपाशी राहत आहेत त्यांना खायला घालणे, वर्गच्या वर्ग अस्थिर होत असताना त्यांच्यासाठी काही नियोजन करणे असे अनेक ठिकाणी दिसून आले. महाराष्ट्रात राजकीय कार्यकर्ता ही संज्ञा मात्र नामशेष होताना दिसतेय. सामाजिक कार्यात सक्रिय झाल्यावर बहुतेकांना नेता व्हायची आस लागलेली दियतेय. मंदिरं उघडा म्हणून आपल्याकडं राजकारण्यांनी आंदोलनं केली. पांडुरंगाचं मंदिर उघडा ही मागणी करण्यात डॉ. प्रकाश आंबेडकरांनीही पुढाकार घेतला. ही सामोपचाराची भूमिका घ्यायची वेळ असतानाही राजकारण्यांनी आपापसातील संघर्ष सुरूच ठेवला. या बिकट परिस्थितीत राष्ट्रवादीने किंवा भाजपने पंढरपूरची जागा सोडून दिली असती तर असा काय फरक पडला असता? पण तिथंही कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे वेठीस धरलं गेलं. त्याचे परिणाम आता वाढत्या कोरोना रूग्णाच्या माध्यमातून दिसून येत आहेत. पश्चिम बंगाल असेल किंवा आपले पंढरपूर... निवडणुका घेतल्या गेल्या, प्रचंड गर्दी केली गेली आणि कोरोना वाढतोय म्हणून नंतर डांगोराही पिटला गेला.
निस्वार्थ काम करणारी तरूणाई प्रत्येक पिढीत असते. त्या तरूणाईला दिशा देणारे, त्यांना आदर्श वाटणारे नेते मात्र तयार होताना दिसत नाहीत. जर कोणी आपल्या पक्षातून दुसर्या पक्षात गेला तर तो गद्दार आणि दुसर्या पक्षातून कोणी आपल्या पक्षात आला तर ते त्याचं हृदयपरिवर्तन असं वाटत असताना निष्ठावान कार्यकर्ते मिळणं कठीणच. आजचे राजकारण फक्त जात, धर्म, पैसा, अस्मिता या भोवती फिरताना दिसते. पुढची चार-दोन वर्षे या सगळ्याचे गंभीर परिणाम दिसून येणार आहेत. त्यासाठी यापुढे रस्त्यावर उतरून काम करणार्या लोकांची नितांत गरज आहे. 'आपदा में अवसर' म्हणतात तसं काम करणार्यांसाठी ही मोठी संधी आहे. 'सगळ्यात मोठी स्वयंसेवी संघटना ही संघ आहे आणि सैन्यापेक्षा मोठं काम आम्ही करतोय' अशी मोहनराव भागवतांची समजूत असेल तर ते सिद्ध करण्याची हीच अचूक वेळ आहे. मास्क घालून रस्त्यावर उतरणं, ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देणं, लोकांना योग्य उपचार मिळवून द्यायचे प्रयत्न करणं, अंत्यसंस्कारासाठी मदत करणं, भुकेल्याच्या तोंडात चार घास कसे जातील हे पाहणं असं काम करणार्यांची आता गरज आहे.
प्रत्येक महाविद्यालयाच्या एनएसएस, एनसीसीच्या संघटना आहेत. विद्यार्थी परिषदा आहेत. या काळात प्रत्येक कॉलेजने किमान शंभर मुलं मदतीसाठी रस्त्यावर उतरवणं गरजेचं आहे. घराघरात जाऊन लोकांच्या कोरोना टेस्ट करून घेणं, रूग्णालयांकडून होणारी लूट थांबविण्यास मदत करणं अशी अनेक कामं ही तरूणाई करू शकेल. देश पेटलेला असताना त्यांच्या अडचणीच्या वेळी कोणीही मदतीसाठी नसणं ही सर्वांसाठीच धोक्याची सूचना आहे. ज्या ज्या संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांची फळी तयार आहे त्यांनी यावेळी मदतीसाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. भिडे गुरूजींच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांची फौज तयार आहे पण त्यांनी काम काय केलं? तर कोरोना होणारे जगायच्या लायकीचे नाहीत हे सांगितलं. या आणि अशा गोष्टी अनेकांच्या मनात दीर्घकाळ राहतील. सध्या प्रत्येक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवेत. आम्ही सुरूवात कुठून करावी, कुणापासून करावी, कशापासून करावी असा विचार करण्याइतकीही उसंत नाही. इतर वेळी हवं तेवढं राजकारण करा पण या काळात ज्या कुणाला, जी काही मदत करता येईल ती करा. भविष्यात ती तुमच्याच फायद्याची ठरणारी आहे. संकटाच्या काळात केलेली मदत सहसा कोणीही विसरत नाही.
सध्या एक पिढीच्या पिढी बाद होईल की काय अशी भयावह परिस्थिती आहे. या परिस्थितीत काम करणार्या कार्यकर्त्यांची वाणवा नाही. त्यांना उभं करणं, दिशा देणं हे काम मात्र नेतृत्वाला करावं लागेल. महाराष्ट्र दिनानिमित्त, पक्षाच्या वर्धापनदिनामित्त, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन अशा प्रसंगी फक्त ध्वजारोहण करणं म्हणजेच पक्षकार्य किंवा समाजकार्य आहे हा काही नेत्यांचा गैरसमजही दूर व्हायला हवा. फोटो काढणं आणि माध्यमांपर्यंत ते पोहोचवणं म्हणजेच समाजकार्य नाही.
कुंभमेळ्याची परिस्थिती पाहता इतक्या वषार्र्ंची परंपरा असलेल्या वारकर्यांपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते. त्यांनी वारीचा हट्ट धरला नाही, दुराग्रह केला नाही, आडगेपणा केला नाही की आठशे वर्षांची परंपरा खंडित होतेय म्हणून प्रशासनाला त्रास दिला नाही. प्रत्येक वारकर्याच्या हृदयात अंतस्थपणे पांडुरंग वास करीत असतो हे त्यांच्या समजूतदारपणातून दिसून आले. या वारकर्यांच्या पायाचं तीर्थ कुंभमेळा घेणार्यांनी आणि त्यात सहभागी होणार्यांनी घ्यायला हवं. या वारकर्यांचीही महाराष्ट्रात मोठी ताकद आहे. त्यांचीही मदत यावेळी समाजकार्यात प्रशासनाला घेता येईल.
एकतर प्रत्येकाच्या घरात दुःखद घटना घडताहेत. आप्त, हितचिंतक संकटात आहेत. तरीही न खचता लोक सामाजिक कार्यात पुढाकार घेत आहेत. एकीकडे राजकीय व्यवस्थेचं अपयश अधोरेखित होत असतानाच दुसरीकडे सामान्य माणूस सेवाकार्यासाठी पुढे येतोय आणि हेच निकोप संस्कृतीचे लक्षण आहे.
- घनश्याम पाटील
7057292092
(लेखक अ. भा. मराठी नियतकालिक परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.)