कोरोना लसीचा शोध आणि भ्रम...
X
आपले जीवनमरणाचे प्रश्न राजकीय अर्थव्यवस्थेशी निगडित आहेत. म्हणून त्याची माहिती घेतली पाहिजे. कोरोना लस शोधत असणारे शास्त्रज्ञ आणि आपण यांच्यामध्ये उभ्या असू शकतात. महाकाय मक्तेदार औषध कंपन्या! आपल्याला वाटतंय जगातील सहा सात मोठ्या औषधं कंपन्या कोरोनावर लस शोधून काढत आहेत. ते आज ना उद्या तयार होईल. मग असेल थोडेसे महाग आपण विकत घेऊ आणि आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या शरीराभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होईल ! आणि कोरोना विषाणू आजूबाजूला असला तरी आपल्याला काहीही करू शकणार नाही !
आपण भ्रमात आहोत .......
कारण कोणत्याही औषधाचा शोध डब्ल्यूटीओ च्या बौद्धिक संपदा अधिकाराच्या (आयपीआर) नियमावलीत येतो; त्याला "ट्रेड रिलेटेड आयपीआर सर्व्हिसेस -ट्रिप्स" म्हणतात. ज्यावर भारतासकट जवळपास सर्व राष्ट्रांनी २५ वर्षांपूर्वी सह्या केल्या आहेत.
शास्त्रज्ञ लस तयार करण्याचे आपले काम करत आहेत. पण त्यांच्यात आणि तुमच्यात ट्रिप्स ने पवित्र बनवलेली औषध कंपन्यांची मक्तेदारी येऊ शकते. म्हणून कोरोना वरच्या लसीला डब्ल्यूटीओच्या ट्रिप्स मधून वगळण्याची मागणी जोर पकडू लागली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेने याबाबत पुढाकार घेतला आहे आणि त्याला अनेक जण पाठिंबा देत आहेत. नागरिकांच्या राजकीय शिक्षणाचे कित्येक पैलू दुर्लक्षित आहेत. हे परत परत जाणवते आणि आपला देश आपल्या तर्फे कोणत्या आंतरराष्ट्रीय करारांवर सह्या करत असतो? हा आपला जिव्हाळ्याचा विषय असला पाहिजे कि नको? आणि स्वतः मृत्यूच्या दारात उभे असणारे लाखो लोक प्रार्थनास्थळे, लव्ह जिहाद, बॉलिवूडच्या टिनपाट नट्या या विषयावरच आपले आयुष्य खर्ची करत आहेत.
कोण उचकवतय त्यांना ?