असा प्रसंग सामोरं आला तर कसा रिऍक्ट होऊ?
जागतिक महामारी कोरोनाच्या संकटाने अनेकांना धक्के दिले. या संकटात अनेक जण माणूसपण विसरून गेले, परंतु अनेकांनी माणुसकी ही दाखविली, बँकर हरीश तायडे अशाच एका हृदयद्रावक अनुभवातून गेले, तो अंगावर काटा आणणारा अनुभव खास त्यांनी मँक्स महाराष्ट्रशी शेअर केला...
X
- हरीश तायडे
मागच्या शनिवारची गोष्ट आहे, ऑफिसमधून काम करून घरी निघालो होतो, घराजवळच्या नाक्यावर दोघांनी आवाज दिला. त्यापैकी दोन जण पीपीई किट मध्ये होते आणि बाकी दोघांच्या गळ्यात बँकेचे आयडी होते म्हणून लक्षात आले की आपलेच भाऊबंद आहेत.
"काय झालं?" म्हणत चौकशी केली तर समजलं की पीपीई किट मध्ये बँकेचे जीएम आहेत आणि त्यांचे वडील बाजूच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि थोड्या वेळापूर्वी वारले आहेत.
पहिले तर धक्का बसला, घरातलं माणूस कोरोनाने गेल्याच दुःख मी अनुभवलंय त्यामुळे खूप वाईट वाटलं आणि त्यांचं सांत्वन करायला हात पुढे केला पण त्यांनी लगेच मागे हटत सांगितले की, "मी पण पॉझिटिव्ह आहे, कसं तरी बीएमसी ची परवानगी घेऊन वडिलांचे अंतिम संस्कार करायला आलोय." हे आणखी धक्कादायक होतं.
शेजारच्या हॉस्पिटलमध्ये सोपस्कर पार पडले तोपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे ज्युनिअर स्टाफ आणि आम्ही बाहेरच उभे होतो तितक्यात त्यांचा मुलगा आला "पप्पा, आजोबांना खाली आणायला आणखी दोन जण लागत आहेत, कसं करायचं !" त्याचं बोलणं संपताच साहेबांचे तिघे सहकारी रस्त्याच्या पलीकडे जाऊन उभे राहिले, त्यांचा नकार अप्रत्यक्षपणे कळाला होता.
जीएम साहेबांची तब्बेत आणि शरीरयष्टी अशी नव्हती की ते एक मजला उतरून डेडबॉडी आणू शकतील, त्यांचा मुलगा आणि अँबुलन्सचा ड्रायव्हर हे दोघे आणि मी असे तिघांनीच मयत शरीर खाली आणायचं ठरवलं.एक क्षण चपापलो पण धाडस करून दवाखान्यात शिरलो.
कोरोनाच्या महामारीच्या काळात, इन्फेक्शनचा धोका सगळ्यात जास्त असलेल्या कोरोनाचा उपचार करणाऱ्या दवाखान्यात प्रवेश करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
फेसशिल्ड, हॅन्डग्लोज, पीपीई किट इ इ काहीच नव्हते, 'तोंडाला एक कापडी मास्क' इतकंच काय ते संरक्षण. पहिल्या मजल्यावर गेलो, सगळा स्टाफ पीपीई किट मध्ये होता. एका रूममध्ये शिरलो तर तिथे दोन पलंग होते, एकावर डेडबॉडी प्लॅस्टिकमध्ये रॅप केलेली तर दुसऱ्यावर एक वयस्कर पेशंट शांत पडून सगळं पाहत होता. त्याचं वागणं बघून आश्चर्य वाटलं, शेजारचा पेशंट थोड्यावेळापूर्वी गेलाय, कदाचित आपला पण नंबर लागेल याचं त्याला काहीएक वाटत नसावं किंवा त्याने मनोमन तयारी करून घेतलेली असावी किंवा मग "मी स्ट्रॉंग आहे, मला काहीच होणार नाही" असा पण त्याचा आत्मविश्वास असावा ! काही असो पण बाबा एकदम थंडपणे सगळं पाहत पडला होता. एक क्षण त्याच्याकडे बघून मग ड्रायव्हर, मयताचा नातू आणि मी असं तिघांनी बॉडी उचलली आणि खाली नेऊ लागलो, वजनामुळे दमायला झाले, मास्कमुळे धाप लागत होती, श्वास जोरजोराने घेत होतो, घाम सुटत होता, अँबुलन्स पर्यंत पोहचता पोहचता हालत खराब झाली.

त्यानंतरचे सोपस्कर उरकणे आणखी त्रासदायक होतं, पनवेल सिव्हिल हॉस्पिटलच्या मॉर्गमध्ये बॉडी जमा झाली आणि "स्मशानात ७०वा नंबर आहे, आज कालच्या डेडबॉडीचे दहन सुरू आहे, यांचा नंबर उद्या लागेल, तुम्ही जा" हे ऐकून धक्का बसला. डॉक्टर जीएम साहेबांच्या गाववाले निघाले, दोन तास तातकाळत राहिल्या नंतर ओळखीने जवळच्या ग्रामीण भागातील स्मशानभूमीत अंतीमसंस्कार करायचे असं ठरलं आणि तासाभरात सगळं उरकलं.

या सगळ्या घडामोडीत मी साधारण चार तास रिकाम्यापोटी, घामाने भिजून डिहायड्रेड झालेला, डोकं दुखायला लागलं होतं, घशाला कोरड पडत होती आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे कोरोनाचे इन्फेक्शन झाले असण्याची शक्यता होती. घरी येतांनाच बायकोला फोन करून दारात बादली आणून ठेवायला सांगितले, दाराशी आल्यावर इनर सोडून सगळे कपडे बादलीत टाकले, वर्षभरात वापरला नसेल इतकं सॅनिटाइझर कपडे आणि अंगावर रिकामं केलं, सरळ बाथरूममध्ये जावून डेटॉल ओतूनच अंघोळ केली.
पुढचे दोन दिवस 'कोरोनाचे इन्फेक्शन, दवाखान्यात ऍडमिशन, अकस्मात मृत्यू, आपल्या पश्चात कुटुंबाला होणारे दुःख, त्रास' इत्यादी इत्यादी विचार सुरू होते, दर दोन तासाला बॉडी ऑक्सिजन चेक करत होतो, वेगळ्या खोलीत आईसोलेट झालो होतो.तब्बेत ठणठणीत आहे हे जाणवल्यावर सोमवारी पुन्हा ऑफिसला गेलो.
आताही विचार येतो की, पुन्हा असा प्रसंग सामोरे आला तर मी कसा रिऍक्ट होईल?????
- हरीश तायडे
संपर्क क्रमांक: +91 95949 29109