Home > मॅक्स ब्लॉग्ज > खरंच स्पर्धा परीक्षा गरजेच्या आहेत का?

खरंच स्पर्धा परीक्षा गरजेच्या आहेत का?

आपल्या शिक्षण पद्धतीचा मुख्य उद्देश काय? चांगले मार्क मिळवणे म्हणजे हुशार हे आमच्या डोक्यात कोणी घुसवले? आपल्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांच्या जीवांवर उठल्या आहेत का? मार्कांच्या जाळ्यात अडकलेला आपला समाज कौशल्यावर आधारित असलेल्या शिक्षणाकडे कधी बघेल...? स्पर्धा परीक्षा मुलांच्या भवितव्यासाठी खरंच गरजेच्या आहेत का? यासंदर्भात संजय सोनवणी यांचा हा महत्त्वपूर्ण दृष्टी देणारा लेख नक्की वाचा...

खरंच स्पर्धा परीक्षा गरजेच्या आहेत का?
X

आपल्या शिक्षणपद्धतीचा प्रमुख उद्देश नोकरदार निर्माण करणे आहे असे मानले जाते. ठीक आहे, हा का उद्देश्य असेना. प्रत्यक्षात हे नोकर "दर्जेदार नोकर" बनावेत हे कोठे शिकवले जाते? कार्यक्षमता आणि दर्जा याचे शिक्षण शाळेपासूनच मिळायला हवे ही अपेक्षा असते. पण आम्ही, शिक्षणाचा मर्यादित हेतू जरी गृहित धरला तर तोही साध्य करण्याचा प्रयत्न करत नाही. मुळात आपण उद्देशच ठरवलेला नाही. पास होणे... चांगले मार्क मिळवणे म्हणजे हुशार हे आमच्या डोक्यात कोणी घुसवले? तसे असते तर एम. ए. चा गोल्ड मेडालिस्ट विद्यार्थी कसलीही स्पर्धा परिक्षा द्यावी न लागता सरळ कलेक्टरपदी नियुक्त व्हायला हवा. होते का तसे? मुळात स्पर्धा परिक्षांचीच गरज आहे. काय यावरही गंभीरपणे विचार व्हायला हवा.

पण शाळा-महाविद्यालयातील मार्क म्हणजे बुद्धीमत्ता व कौशल्य आहे. असे सरकारच मानत नाही. आपण मात्र, मानतो ही आपली चूक आहे. या चुकीनेच आपण आपल्या अनेक पिढ्यांचे वाटोळे केले आहे व आजही आम्हाला आमच्या जन्मजात अडाणीपणामुळे यात बदल घडवावा व तो आम्हीच घडवू शकतो हे लक्षात येत नाही. मग ज्ञान, उद्योजकता वगैरे कधी शिकवले जाणार?

त्यामुळे मार्कांकडे विशेष लक्ष न देता विद्यार्थ्यांचे आकलन कसे वाढेल यावर आपण भर देवू शकतो व आवडीच्या विषयात अधिक प्रगती करायला वाव देवू शकतो. अनेक विद्यार्थी विचारतात,

"अमूक क्षेत्रात स्कोप आहे का?" खरे म्हणजे स्कोप नाही असे जगात एकही क्षेत्र नाही. अगदी नवी क्षेत्रे शोधून इतरांनाही स्कोप देता येईल इतके स्कोप आहेत. प्रत्येक विषय हा महत्त्वाचा व मोलाचा आहे. हे सांगायला आधी शिक्षक लागायचे. आता कोणत्या विषयात काय स्कोप आहे ही माहिती तुम्ही संगणकावरुन मिळवू शकता. तीही जगभरची. महत्त्वाचे हे समजावून घ्या की स्कोप नाही असा विषय अस्तित्वात नसतो. उलट आज ठराविक लोकप्रिय क्षेत्रांकडेच धावायची विद्यार्थ्यांची प्रवृत्ती असल्याने महत्त्वाच्या असंख्य क्षेत्रांत माणसांचाच तुडवडा आहे.

उदा. मुलभूत विज्ञानाकडे आज खूप क्वचित विद्यार्थी जातात. त्यामुळे एकीकडे भरमसाठ बेरोजगार आहेत तर दुसरीकडे अनेक क्षेत्रात माणसांचाच तुटवडा आहे.

मग अशा स्थितीत, केवळ रोजगार हे उद्दिष्ट ठेवले तरी त्या उद्दिष्टाला समजावून न घेता कसलीच योजना न केल्याने काय गफलत झाली आहे हे लक्षात येईल. म्हणजे नोकरदार व्हायचेय पण तो कसा आणि कोणत्या क्षेत्रात हे तरी आम्हाला ठरवता यायला काय हरकत आहे? असे केले म्हणजे उद्दिष्टाच्या दिशेनेच प्रयत्न करता येतील.

त्या क्षेत्रात प्रत्यक्ष कसे कामकाज चालते हे पाहता येईल. त्या क्षेत्रातील आधुनिक व ताजी माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल. अद्ययावत राहता येईल. थोडक्यात, नोकरदारीच करायची तर चांगली नोकरदार तरी बनावे की नाही? पण उद्देश स्पष्ट असला पाहिजे. यात कालपरत्वे काही बदल व सुधारणा होत जातात. एखाद वेळेस एकदम नवीनच व आवडीची दिशा अवचित मिळू शकते. पण ज्यांची सुरुवातच निरुद्देशपणे होते त्यांना अनेकदा "संधी" म्हणजे काय हेच समजत नाही. अर्धवट ऐकलेली माहिती, करियर काउंसिलिंगवाल्याच्या लबाड्या, स्पर्धा परिक्षांचा विस्फोट यात "मला काय नेमके करायचे आहे?" हा प्रश्न सुटून जातो. आम्हाला हे थांबवायला हवे.

Updated : 6 July 2021 9:15 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top