Home > मॅक्स ब्लॉग्ज > आयांनो शामबालाची कथा वाचण्यापेक्षा जिजाऊ, सावित्री-रमाई वाचा !

आयांनो शामबालाची कथा वाचण्यापेक्षा जिजाऊ, सावित्री-रमाई वाचा !

लक्ष्मीव्रत करणा-या आया-मायांना सावित्रीमाय फुले कोण होती ? तिने काय काम केले ? तिचा संघर्ष काय होता ? तिला दगड का मारले ? तिच्या अंगावर शेण का भिरकावले ? तिला व तिचा नवरा जोतिबा यांना वाळीत का टाकले ? याचा मागमुसही नाही. माहिती करून घ्यायची त्यांची मानसिकताही नाही. सत्यवानाची सावित्री सर्वांना परिचीत आहे पण जिने स्त्रीयांचाच उध्दार केला, स्त्रीला माणसात आणले, शिक्षण दिले, तिच्या शिक्षणासाठी दगड-धोडे झेलले, अंगावर शेणाचा मारा सहन केला ती उध्दारकर्ती सावित्री या आया-मायांना माहित नसावी ही शोकांतिका आहे. कर्मकांडात अडकलेल्या स्त्रियांचे डोळे खाडकन उघडायला लावणारा वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांचा हा लेख नक्की वाचा…

आयांनो शामबालाची कथा वाचण्यापेक्षा जिजाऊ, सावित्री-रमाई वाचा !
X

काल मार्गशिर्ष महिन्यातला शेवटचा गुरूवार झाला. तमाम आया-माया एकदाच्या लक्ष्मी व्रतातून मोकळ्या झाल्या. याच महिन्यात तीन जानेवारीला सावित्रीमाय फुले यांची जयंती झाली. सावित्रीमायची जयंती किंवा पुण्यतिथी फार कमी महिलांना माहिती आहे. पण मार्गशिर्ष महिन्यातील शामबालाची कथा घरोघर माहिती आहे. लाखो-करोडो महिला मार्गशिर्ष महिन्यातील गुरूवारी व्रत करतात. लक्ष्मीव्रत या नावाने गुरूवारचा उपवास पकडतात. शिकल्या-सवरलेल्याही आया-माया हे व्रत करतात. त्यांना शामबाला आणि राणी सुरतचंद्रीकेची कहाणी तोंडपाठ आहे. लक्ष्मी व्रताने शामबालाची कशी भरभराट झाली ? सुरतचंद्रीकेने अपमान केल्यावर तिची एकाच महिन्यात कशी वाट लागली ? पुन्हा लेकीकडे जाऊन शेवटचा गुरूवार केल्यावर तिला तिचे गतवैभव कसे परत मिळाले ? याची कथा दर गुरूवारी या सर्व मावशा श्रध्देने वाचतात. विशेष म्हणजे केवळ निरिक्षरच नव्हे तर बहूतांश साक्षर, उच्च विद्याविभूषीत आया-मायासुध्दा हे व्रत करतात. जुण्या गोष्टींना नाक मुरडणा-या अलिकडच्या मॉड पोरीही तेवढ्याच श्रध्देने हे व्रत करत शामबालेची कथा वाचतात. मार्गशिर्ष महिना आला रे आला की बाजारात या पुस्तकाची लाखोंच्या प्रतीत विक्री होते.

लक्ष्मीव्रत करणा-या याच आया-मायांना सावित्रीमाय फुले कोण होती ? तिने काय काम केले ? तिचा संघर्ष काय होता ? तिला दगड का मारले ? तिच्या अंगावर शेण का भिरकावले ? तिला व तिचा नवरा जोतिबा यांना वाळीत का टाकले ? याचा मागमुसही नाही. माहिती करून घ्यायची त्यांची मानसिकताही नाही. सत्यवानाची सावित्री सर्वांना परिचीत आहे पण जिने स्त्रीयांचाच उध्दार केला, स्त्रीला माणसात आणले, शिक्षण दिले, तिच्या शिक्षणासाठी दगड-धोडे झेलले, अंगावर शेणाचा मारा सहन केला ती उध्दारकर्ती सावित्री या आया-मायांना माहित नसावी. तिला जाणून घ्यायची यांची मानसिकता नसावी हे चित्र अस्वस्थ करणारं आहे. याला अपवाद असणा-याही खुप आया-माया आहेत. सरसकट माहिती नाही असे नाही पण ही संख्या त्या मानाने फार कमी आहे. ज्या संख्येत शामबाला व सुरतचंद्रकेची कथा वाचली जाते त्या संख्येत नक्कीच सावित्री वाचली जात नाही. ज्या सावित्रीने भारतातल्या समस्त स्त्री वर्गाला माणसात आणले तिचीच इतकी उपेक्षा ? ती ही महिलांनीच करावी हे वेदना देणारे चित्र आहे. त्याचबरोबर ज्या जिजामातेेने स्वराज्य उभारले, स्वराज्य उभारणीसाठी जे कष्ट उपसले ती जिजामाता व तिचे स्वराज्यातले योगदान किती माहिती आहे ? ते शामबालेच्या तुलनेत किती वाचले जाते ? डॉ बाबासाहेब आंबेडकरांना खंबीरपणे साथ देणारी, त्यांच्या परदेश गमनानंतर आयुष्यातली भयंकर परवड आनंदाने झेलणारी माता रमाई या आया-माया किती वाचतात ? चाल करून आलेल्या पेशव्याला न लढता गुडघ्यावर आणणारी, महिलांची पहिली फौज बांधणारी अहिल्याई किती वाचली जाते ? हा ही प्रश्न आहे. लक्ष्मीव्रताचे उपवास करत करत लाखो-करोडो आया-मायांचे आयुष्य गेले. तरीही त्यांच्या घरची परस्थिती बदलली नाही. पण तरीही त्यांच्या डोक्यातले हे भुत उतरत नाही. या लक्ष्मी व्रताला हिंदूधर्मातल्या प्रमुख ग्रंथांत आधार नाही. गीता, भागवतात स्थान नाही. संत तुकारामांची तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत किंवा मुक्ताई-जनाईच्या अभंगात कुठे स्थान नाही. भटजी आणि शेठजींच्या युतीतून अनेक गोष्टी या देशात जन्माला आल्या. त्यांनी धंद्यासाठी अनेक व्रत-वैकल्ये प्रसवली. देवा-धर्माला या लोकांनी धंद्याचे साधन म्हणून वापरले. त्यासाठी अनेक कपोलकल्पीत कथा लिहील्या. त्या भोळ्या व श्रध्दाळू बहूजन समाजाच्या माथी मारल्या. त्यांना देवा-धर्माची भिती घालत अवघा समाज बौध्दीकदृष्ट्या विकलांग केला. अनेक मुलं हाता-पायाने व्यंग जन्माला येतात. काही जन्मताच मतीमंद म्हणून जन्माला येतात पण या साल्यांनी धडधाकट म्हणून जन्माला आलेला बहूतांश समाजच देवाधर्माच्या नावाने मंतीमंद करून टाकला आहे.

जगाच्या पाठीवर अडीचशे देश असतील. या एकूण देशापैकी लक्ष्मीव्रत फक्त आपल्याकडेच केले जाते. लक्ष्मी व्रताच्या कथेत असे सांगितलय की भक्तीभावाने जर लक्ष्मीव्रत केले, शामबालेची कथा वाचली तर साक्षात लक्ष्मीची कृपा होते. घरात वैभव आणि समृध्दी निर्माण होते. लक्ष्मीव्रत करणा-या शामबालेचे लग्न एका राजकुमारासोबत झाले. तिची आई सुरतचंद्रीका पुन्हा राणी झाली, तिचे गेलेले राज्य परत मिळाले. असे एकूण या व्रताचे स्वरूप आहे. जगाच्या पाठीवर असणा-या देशांचा विचार केला तर हे लक्ष्मीव्रत इतर कुठेच करत नाहीत. तसेच जगातील सर्वाधिक श्रीमंताची यादी तपासली तर त्यात जे टॉपर देश आहेत त्यातलं कुणीच कधी लक्ष्मीव्रत करत नाही. भारतातले मुकेश अंबांनी आणि काल-परवा सरकारी मर्जीवर त्या यादीत गेलेले अंबानी सोडले तर लक्ष्मी व्रत करणा-या करोडो आया-मायांची नावं श्रीमंतांच्या यादीत कधीच आली नाहीत. खरेतर ती यायला हवी होती. अंबानी आणि अदानी यांनीही कधी हे व्रत केले नाही. त्यांनी सरकारला हाताशी धरून आपल्याच देशाला टोप्या जरूर घातल्या. पण ते कधी श्रध्देने व भक्तीभावाने शामबालाची कथा वाचताना दिसलेले नाहीत. जर व्रत करून वैभव येत असते तर जगातल्या श्रीमंतांच्या यादीत ही व्रत करणारी मंडळीच टॉपला असायला हवी होती. या यादीत बहूतांश अमेरिकन लोक आहे. जगातले प्रमुख सुपर पॉवर देश पाहिले तर त्यांच्यातही कुणी हे व्रत करत नाही. सत्य नारायण घालून साधूवाण्याची बुडालेली नाव वर आली म्हणे पण त्यानंतर सत्य नारायण घालणा-या कुणाचे काही वर आले नाही. सत्यनारायणाने भटांची पोट तेवढी वर येताना दिसली. त्यांचीच भरभराट होताना दिसली. या देशातला गरीब बहूजन समाज कधीही अशा व्रताने वर आलेला नाही. त्याला जेव्हा शिक्षण मिळाले तेव्हाच त्याच्याकडे भरभराट आली. भटजी आणि शेठजींच्या कारनाम्यांनी बहूजनांना येडे केले आहे. दुर्गा उत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसणा-या आया-माया असा कधीच विचार करत नाहीत की खरच हे दुर्गामातेने सांगितले असेल का ? ज्या वेळी वस्त्रांचीच निर्मीती होत नव्हती. आदी मानव झाडांच्या साली अंगावर लपेटत होता तेव्हाच्या आया-मायांनी नऊ दिवस कुठल्या रंगाच्या साड्या नेसल्या असतील ? की विविध रंगाच्या झाडाच्या साली गुंडाळल्या असतील ? अशा व्रतांनी व्रत करणारे श्रीमंत होत नाहीत पण या देशातला शेठजी-भटजी मात्र मात्र श्रीमंत होतो. त्यांचीच तेवढी भरभराट होते. भटशाहीच्या नादाने मेंदू विकलांग झालेला बहूजन समाज या थोतांडातून ज्या दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी हा भारत वैभवशाली व समृध्द होईल हे नक्की

Updated : 12 Jan 2024 5:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top