इंग्रजांनी सती प्रथा भारतात आणली?
भारतात इंग्रजांनी सती प्रथा आणली आणि या इंग्रजांनीच हिंदू धर्माला बदनाम केले. असा दावा एका भागवत बाईंनी केला आहे. मात्र, खरंच इंग्रजांनी ही सती प्रथा आणली का? काय आहे सत्य? डॉ. मुग्धा कर्णिक यांचे डोळ्यात अंजन घालणारं विश्लेषण
X
कालपरवा फेसबुकवर एका मंदाड भागवती बाईंनी टाकलेली पोस्ट वाचली. सती ही प्रथाच भारतात नव्हती आणि त्या काळचे काही अतीशहाणे सुधारक आणि ब्रिटिशांनी ही प्रथा असल्याचे सांगून भारताला म्हणजेच हिंदू धर्माला बदनाम केले वगैरे त्यात पूर्ण कट्टर हिंदुत्ववादी अभिनिवेशाने लिहिले होते. यात त्या काळच्या मीडियाला पद्धतशीर पैसे चारून हे सगळं पसरवल्याचाही उल्लेख होता. हा सारा चुकीचा इतिहास शाळेत शिकवतात. त्यामुळे बाईंनी स्वतःच्या लेकीवर योग्य ते संस्कार केल्याचंही त्या लिहितात.
खरं म्हणजे या हिणकस वृत्तीच्या लोकांची दखल घ्यावी लागते हेच दुर्दैव आहे. पण वेळच्या वेळी या लोकशाही देशाने या लोकांचा पुरता बंदोबस्त न केल्याची ही विषफळे आपण पाहातो आहोत. यातून ज्या लोकांची दिशाभूल होणार ती ब्राह्मणी वर्चस्ववादी मंडळी सोडून देऊ. कारण त्यांनी स्वतःहून नवे विचार नाकारून असल्या घाणीत आपली मुंडकी खुपसून ठेवली आहेत. पण हे वाचून जर कुणी इतर बुचकळ्यात पडत असतील तर त्यांच्यासाठी हे लिहिते आहे.
सगळ्याच विधवा सती जात असं कुणाही सुधारकाने वा ब्रिटिशाने कधीही म्हटलेलं नाही. सर्व देशभरात दरवर्षी ५८० विधवा सती जात किंवा जाळल्या जात- ५ कोटी सत्तर लाखाच्या लोकसंख्येत ही संख्या काही फार नव्हेच. पण तरीही या बाया जित्याजागत्या होत्या. प्रत्येक गावात वीस वर्षांतून एकदा तरी अशी घटना घडली असावी असा नॉर्बर्ट शूररने नोंदलेला आकडा आहे.
मी स्वतः कोकणात फिरताना अनेक ठिकाणी सतीच्या शिळा, त्यावरचे लहान-मोठे कोरलेले हात पाहिले आहेत. सतीच्या हातांचे ठसे. देव्हारे गांवच्या शिवमंदिराच्या मागच्या बाजूला पडलेले अठरा सतीचे दगड पाहून थरकापून गेले होते मी. ब्रिटिशांनी वा सुधारकांनी ही प्रथा असल्याचं सांगून प्रकरण मोठं केलं असं म्हणण्यापेक्षा अगदी मर्यादित घटना असल्या तरीही अशा अमानुष घाणेरड्या गोष्टींचे उदात्तीकरण होऊ नये अशी भूमिका घेतली असं म्हणणं योग्य आहे.
सगळ्या बायका सती गेल्या तरच ती प्रथा होते. हे म्हणण्यात मुदलातच एक गडबड आहे. सती जाणे याला धर्माची मान्यता आहे. एवढाच यातला अर्थ. सती जाण्याची सक्ती नाहीच. पण कौटुंबिक पातळीवर विविध कारणांनी सक्ती होत असे हे सत्य आहे. विशेषतः सत्तेचा खेळ, मालमत्तेचे प्रश्न असले तर सती जात असत. शिवाय धर्ममान्यता असल्यामुळे उदात्तीकरण करणे शक्य होत होते. काही बायका त्या उदात्तीकरणानेही नादावत असत. आणि काहींना अफू चारून गुंगीत नादावून जाळलं जात असे. आणि असल्या सतींची मंदिरे अजूनही जागोजाग आहेत, अगदी मुंबईसारख्या शहरातही आहेत. भोळसट किंवा बापसत्तेची नशा अंगात भिनवलेल्या बाया तिथं जाऊन नवसबिवस सारखे भुक्कड प्रकार प्रेमाने करत असतात.
पतीवरील अतीव प्रेमाने बाया जाळून घेत असे. एक भयानक विनोदी विधान या भागाबाई करतात आणि त्यांना दुजोरा देणाऱ्या बर्वे, सहस्रबुद्धे वगैरे टाईप महिलाही यात दुर्दैवाने आहेत. (सती जाण्यास कायद्याने बंदी केल्यानंतर सकल स्त्रियांचे नवऱ्यावरील प्रेम आटले असावे.) इतिहासाचे अभ्यासक डॉ. शैलेन भांडारे सांगतात, 'महानुभाव वाङ्मयात कामाइसा या यादव राणीची करूण कथा आली आहे. तिला सती जायचे नसते म्हणून ती अनेकांच्या विनवण्या करते''. "मला मारू नका, मी तुझ्या भटारखान्यात कदान्न खाऊन राहीन" असे ती सिंघण या राजपुत्राला सांगते. पण खुद्द तिचा बाप तिला सांगतो की "राणी असताना तू सगळ्याचा उपभोग घेतलास, जे गोड होते ते आपलेसे केलेस मग आता हा कडू प्रसंग आला तर तोही तुला आपलासा केला पाहिजे!" असे म्हणून तिला सगळेजण जबरदस्तीने चितेत ढकलतात ("लोटा रे लोटा म्हणून लोटली").
आणखी एक सन्मित्र डॉ. ज्ञानेश पाटील सांगतात, 'हिंदूधर्माचा, आणि रास्वसंघाचा नागपूरखालोखालचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यनगरीतील पर्वतीवरील संग्रहालयात सतीचे एक प्रातिनिधिक पेंटिंग आहे. त्यात शिवाजी महाराजांच्या पत्नी कशा सती गेल्या होत्या वगैरे माहिती दिली आहे. त्या चित्रात, आजूबाजूला ढोल वाजवणारे लोक, काही बांबू घेऊन उभे असलेले लोक असे तपशील आहेत. ढोल अशासाठी की जळणाऱ्या बाईच्या किंकाळ्या लोकांना ऐकायला येऊ नयेत. यदाकदाचित एखादी बाई होरपळून चितेतून बाहेर यायला लागली, तर तिला परत लोटण्यासाठी बांबू घेऊन उभी असलेली माणसे असत. अशा सगळ्या जय्यत सुविधांसह बाई 'स्वेच्छेने' सती जात असे.'
अशा प्रकारे जबरदस्ती झाल्याचे राजा राममोहन रॉय यांनी प्रत्यक्ष घरात आपल्या वहिनीबाबत पाहिले, आणि त्यांना ते थोपवताही आले नाही. त्यानंतर त्यांनी हा प्रश्न लावून धरला. महाराष्ट्रात जख्ख म्हाताऱ्यांशी कोवळ्या मुलींची लग्न लावून देण्याची प्रथाही समाज सुधारकांनी प्रश्न लावून धरल्यामुळे, त्यावर लोकप्रबोधन करणारे नाटकही लिहिले गेल्याने शारदा कायद्याने बंद झाली. अजून या बाया या प्रथेवरील बंदीवर घसरलेल्या नाहीत. (स्कोप आहे हं, भागवतबाई. कारण काय की सगळ्याच मुलींची लग्ने म्हाताऱ्यांशी होत नव्हती- वर्षभरात शेपाचशे पोरी गेल्या जख्ख म्हाताऱ्यांच्या पदरी तर त्याला प्रथा म्हणायचं का गडे?)
तिकडे चार दिवसांपूर्वी मोहन भागवत म्हणाले ब्रिटिशांना देश नव्हे हिंदू धर्म नष्ट करण्यात स्वारस्य होते- की इकडे हे भगवे पोपट-मैना टिवटिवायला लागले. कुठलाही मुद्दा उचला आणि री ओढा. ब्रिटिशांनी तेव्हा भारताचे नुकसान लूट भरपूर केली. लोकांचे सत्त्वहरणच केले. हातमाग मोडून टाकले. संपत्तीची लूट केली. पण या विशिष्ट वर्चस्ववादी लोकांना- त्यातील महिलांना असले फालतू मुद्दे सुचतात. कारण तेव्हा जे शोषण ब्रिटिश करत होते. तेव्हा यांच्यातले लोक रावबहादुरी नाहीतर देशमुखी कशी पदरात पाडून कशी घेता? येईल याचा विचार अधिक करत होते. आणि रास्वसंघाचे मुखंड चुपचाप बसून होते.
ब्राह्मणांकडचे नेतृत्व बनियाकडे गेले म्हणून स्वातंत्र्यचळवळीचा दुस्वास करण्यात मग्न होते. अजूनही यांना दुःख कशाचे तर सती जाणाऱ्या (कुठेतरी चारदोन हो) बायकांचा कळवळा दाखवून ती थांबवण्याचा ब्रिटिशांनी कायदा केला याचे. बंगाल मधल्या दुष्काळात अन्न न मिळाल्यामुळे हजारो लोक भुकेने टाचा घासत मेले या बद्दल करा ना टीका ब्रिटिशांवर. पण नाही- कारण मग त्या निमित्ताने हिंदूधर्मातील दुष्ट प्रथांचे समर्थन करणं कसं जमेल किंवा त्या काळच्या पुरोगाम्यांना शिव्या कशा घालता येतील. अत्यंत घाणेरड्या वृत्तीच्या या बाया आणि बाप्यांचे असले लेख कुठे वाचलेत आणि माहिती अभावी गोंधळ उडालाच तर हे सारे मुद्दे लक्षात ठेवा. बाकी या हलकटांना कवडीची किंमत देण्याची लायकी नाहीच त्यांची. यांना थोडीशी लाजशरम कधीतरी वाटावी एवढेच पसायदान मागायचे.