अशोक चव्हाण यांना अखेर गणपती पावला ! - ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम ठोकल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला खरा, मात्र त्यांनी हा निर्णय कसा घेतला आणि त्यामागचे नेमके राजकीय "गुपित" काय ? ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे
X
गणपती बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे भाद्रपद महिन्यासोबत, आता माघ महिन्यातही गणपतीची प्रतिष्ठापना करून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होताना दिसतो.
यंदा गणेश जयंती, उद्या १३ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी केली जाणार आहे. या दिवशी काही घरांमध्ये दीड दिवसांसाठी गणपती बाप्पाचे आगमन होते. तसेच काही सावर्जनिक गणेश मंडळही बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतात.
तर या अशा दोन गणेशोत्सवामध्ये बऱ्याच घडामोडी घडत असतात. हे सर्वसामान्य लोकांना कळत नसते.
सहा महिन्यांपूर्वीपासून या दोन गणेशोत्सवा दरम्यान रंगलेले राजकीय पक्ष प्रवेशाचे "विलक्षण नाट्य" आज अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने समोर आले आहे.
२ सप्टेंबर, २०२३ रोजी देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीनंतर, हे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या दोन नेत्यांमध्ये "मैत्री पर्व" सुरू झाले होते. वास्तविक पाहता, चव्हाण - फडणवीस भेटीच्याच दिवशी यासंदर्भात प्रसार माध्यमांमध्ये चर्चा रंगू लागल्या होत्या.
तर त्याचे असे झाले की, भाजपा नेते आणि सध्या मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या आशिष कुलकर्णी यांच्या घरी "श्री गणेश दर्शनाच्या निमित्ताने" अशोक चव्हाण पोहचले होते. त्याच सुमारास देवेंद्र फडणवीस सुद्धा तेथे (ठरवून) पोहोचल्याने ही बहुचर्चित भेट झाली. त्यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चेवर बोलताना देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांनी "आमची भेट राजकीय स्वरूपाची नव्हती," असे स्पष्टीकरण दिले होते.
पण आज माघी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला, "त्या" भेटीमागील राजकीय "गुपित" उघड झालं आहे.
एकूणच काय तर, "त्या" गणेशोत्सवातील भेटीगाठीच्या माध्यमातून काँग्रेस परंपरेतील मुरब्बी राजकारणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नव्या राजकीय कारकिर्दीचा "श्री गणेशा" केला होता. हे आज स्पष्ट झाले आहे. खरंतर, फडणवीस यांना भेटल्यापासून आतापर्यंत अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षा संदर्भातील आपले धोरण एकदम मवाळ केले होते. आणि आता तर ते अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाजवळ आले आहेत. या एका राजकीय घडामोडीमुळे भारतीय जनता पक्षाची मराठवाड्यातील बाजू आता अधिक मजबूत झालेली दिसेल. मराठवाड्यातूनच मराठा आरक्षण आंदोलन पेटवून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पक्ष आणि सरकारमधील मंडळींना शह देणे शक्य होईल. त्यासाठी मराठवाड्यातील राजकारणावर पकड असलेला अशोक चव्हाण रुपी दिग्गज मराठा नेता पुरेसा ठरेल. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात, भाजपचं पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांचं पारड जास्त जड राहील.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, पक्षफुटीने ग्रासलेल्या उद्धव ठाकरें आणि शरद पवार यांना नव्याने झेप घेण्यासाठी ज्या काँग्रेसचा आधार वाटत होता, तिथे सुद्धा उभी फूट पडणे हे "माविआ" साठी तापदायक ठरणार आहे.थोड्याच दिवसात अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ आणखी मोठी नावे काँग्रेस मधून बाहेर पडताना दिसतील. तेव्हा या फुटीच्या संकटाची तीव्रता ठाकरे - पवारांना प्रकर्षाने जाणवेल.
"अकेला देवेंद्र क्या करेगा" असे उघड आव्हान मिळत असूनही,
प्रतिकूल परिस्थितीत शांत राहून, एकहाती 'गेम' फिरविणारे देवेंद्र फडणवीस यांचे "राजकारण तंत्र" हे आता अनेक वरिष्ठ राजकीय नेत्यांसाठी अभ्यासाचा विषय बनले तर आश्चर्य वाटायला नको.