पत्रकारितेचं 'अर्नबायजेशन'
माध्यमांवर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न का दिसत नाही. माध्यमांवर वरचष्मा कोणाचा? मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी पत्रकारांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत का? स्टुडिओ मध्ये चर्चे ऐवजी आरडाओरडा करणाऱ्या अर्णब गोस्वामी ला तिथेच रोखलं असतं तर... वाचा वैभव छाया यांचा लेख
X
मराठी पत्रकारितेत कायम उच्चवर्णीय पुरूषांचा वरचष्मा राहीलेला आहे. मराठी वृत्तपत्रांच्या सुरूवातीपासूनचा इतिहास जरी तपासला तरी त्यात महिला आणि मागासवर्गीयांचा टक्का हा खूप कमी आढळेल आणि महत्त्वाच्या पदांवर तर ना च्या बरोबरच आढळेल. सध्या माध्यमांत ब्राह्मण्यग्रस्त उच्चवर्णीय पुरूषांचा एकहाती अंमल आहे. हे सर्व लोक काही आजच उगवलेले नाहीत. खूप काळापासून माध्यमात काम करत आहेत. माध्यमात काम करताना जोपर्यंत सिस्टीम आपल्या फेवरची होत नाही. तोपर्यंत स्वतःचे रंग अगदी अलगद लपवून वागण्यात अतिशय वाक्बगार लोक आहेत. नावे घ्यायची झालीच तर शंभर नावे सहजच निघतील. पण आता तीच तीच नावे घ्यायचाही कंटाळा आला आहे.
पत्रकाराने बातमीदारी करताना, लेख लिहीताना, संपादन करताना सत्याचा पक्षपाती राहायचं असतं. त्यानं जनमत सत्याच्या बाजूने प्रभावित होईल असं कृतीशील वर्तन राखायचं असतं. भाषेचा वापर अतिशय तिखट आणि धारदार करून असत्याचे, अनैतिकतेचे अंग तार तार करून टाकायचे असते. जनमत प्रदूषित होईल. असे प्रत्येक वर्तन आणि कृतीच्या विरोधात उभे राहून लढायचे असते. पण सध्याचे कोणते मराठी पत्रकार हे वर्तन करत आहेत. हा पीएचडीच्या संशोधनाचा विषय बनला आहे. जे कुणी सरकारी दमनाविरोधात बोलत आहेत. त्यांच्या बोलण्यातही विरोधी पक्षांतील ठराविक पक्षाच्या सॉफ्ट कॉर्नरचा शिक्का आहेच. तो स्पष्टपणे दिसतो देखील. मग अशा अवस्थेत दोन्ही गटांतील पत्रकारांमध्ये फरक करणार तो काय?
ज्या पत्रकारांनी कॉस्ट कटिंग मध्ये, फेवरिटीजम मध्ये चांगल्या उमेदवारांच्या नोकऱ्या जाताना आवाज उठवण्याची हिम्मत नाही दाखवली ते काय फॅसिस्टांविरोधात बोलणार आहेत? आपलाच सहकारी खोट्या बातम्या देतो, खोट्या तथ्यांना सत्य सांगून मांडतो. त्यावर बोलण्याऐवजी सोईस्कर मौन बाळगण्याला पत्रकारिता म्हणता येत नाही. त्यांना पत्रकारही म्हणता येत नाही. कॅबिनेट मधला मंत्री गाडीत बसून फिरवतो, कधीही फोन करतो, थेट एक्सेस देतो. म्हणून आपण खूप पॉवरफुल आहोत असे समजण्याचा नादानपणाही तितकाच घातक आहे. हाथरस बलात्कार प्रकरण घडले. त्यावेळेस ते कवर करण्याऐवजी दुसरीकडे घडलेल्या घटनांवर विरोधक का गप्प म्हणून बोंबलणं, देशातल्या मॉब लिंचिंगवर सोईस्कर मौन बाळगून पैरिस मध्ये घडलेल्या घटनेसाठी इथल्या पुरोगाम्यांना जबाबदार धरणं वगैरेसारख्या क्ल्यूप्त्या संघशाखेत शिकवल्या जातात. त्याचा अर्थ असा नाही की, त्या क्लूप्त्यांचं इम्प्लिमेंटेशन थेट नॅशनल टिव्हीवर करावं.
अर्नबही असाच होता. आरडाओरडा करायचा. तेव्हा तो इंग्लिश वागळे आहे. म्हणून फार मजेत घेत त्याला सोडून दिलं. मी तर असं म्हणेन त्याला वाढण्यासाठी स्पेस निर्माण करून दिला. जर या विंचवाच्या नांग्या वेळीच ठेचल्या गेल्या असत्या तर आज ही वेळ ओढावली नसती. अर्नबायझेशन ऑफ जर्नालिजम मध्ये खुप कार्यकर्ते आहेत. थोडं डोळे नीट उघडा आणि पहा. धडाधड दिसू लागतील. बिल्कूल घाबरू नका. खोटं बोलणाऱ्या पत्रकारांना तर मुळीच घाबरू नका. यांच्या फक्त तोंडात दम असतो. त्या दमावरच रेटून खोटं बोलू शकतात. '…' दम नाही. दोन रट्टे पडले की बिळात लपून बसायला कमी करणार नाहीत.
तुम्ही सामान्य लोक गप्प बसता म्हणून अर्नबसारखी गिधाडे माजतात. यांना वेळीच आवर घाला. तुम्ही घालू शकता. यांना थेट प्रश्न विचारा. यांच्या जाहिरातदारांना प्रश्न विचारा. त्यांच्या मालकांना प्रश्न विचारा. पाठीचा कणा ताठ असेल, नैतिकता, तर्कबुद्धी जागी असेल तर निश्चित प्रश्न विचाराल.. नाहीतर श्वेता सिंहचं ऐकून दोन हजारच्या नोटेच चिप आहे म्हणून सुधीर चौधरीवर पण विश्वास ठेवणाऱ्या जमातीत तुमचा नंबर निश्चितच वरचा आहे. पत्रकारितेला अर्नबायजेशन पासून वाचवलंच पाहीजे.