अण्णाभाऊ साठेंच्या वास्तुची सुरक्षा रामभरोसे, सरकारला जाग कधी येणार?
X
पुणे बंगळूरु महामार्गावर कराडपासून कोल्हापुरच्या दिशेला जाताना थोडे पुढे गेल्यावर या महामार्गापासून अगदी 4 किलोमीटरच्या अंतरावर वाटेगाव आहे. वाटेगावातील एका सुपुत्राने महाराष्ट्राला दिशा देणारं सामाजिक लिखाण करण्याचं काम केलं.
ते महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणजे तुकाराम साठे अर्थात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. वाटेगावमध्ये १ ऑगस्ट १९२० ला अण्णांचा जन्म झाला. गरिबी आणि संघर्ष हा त्यांच्या पाचवीला पुजलेला होता. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे त्यांना अनेक चटके सहन करावे लागले. त्यामुळेच अण्णांनी अवघे शाळेत जाऊन दीड दिवस शिक्षण घेतले.
१९३२ साली सातारा जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडल्यामुळे शेकडो मैलाची पायपीट करत अण्णा भाऊ साठे आपल्या परिवारासह मुंबईला गेले. पण जाताना आण्णांनी आपल्या सोबत या मातीतील माणसाचा बेडरपणा, त्यांच्या व्यथा, त्यांची दु:खे, त्यांचा संघर्ष सोबत घेवून गेले, आणि त्यांच्या मुक्या नायकांना त्यांनी शाब्दांच्या रूपाने बोलते केलं.
वाटेगाव मधील या उपेक्षित नायकांना त्यांनी आपल्या कादंबरीत स्थान दिले. दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णांनी ३५ कांदबऱ्या लिहिल्या. १४ लोकनाट्य, १० कथासंग्रह, १० पोवाडे आणि काही प्रवास वर्णनं ही अण्णांची साहित्य संपदा. थोडक्यात दीड दिवसाच्या शाळेची एवढी मोठी शिकवण.
त्यांच्या चित्रा नावाच्या कादंबरीचे रशियन भाषेत भाषांतरित करण्यात आले. आण्णा ज्यावेळी रशियाला गेले होते. तेव्हा रशियाच्या तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला.
अशा या ज्येष्ठ साहित्यिकांच्या जन्मदिवसाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून शासनाने त्यांना अभिवादन करण्याच्या दृष्टीने २०२० साल हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून घोषित केलं. या निमिताने तत्कालीन फडणवीस सरकारने १०० कोटींचा निधी जाहीर केला. व त्यासोबत अनेक उपक्रमांची घोषणा केली गेली. त्यांच्या या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवाची सांगता येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल.
अशा या असामान्य प्रतिभेच्या साहित्यिकांच्या वाटेगावामध्ये मॅक्स महाराष्ट्र ची टीम पोहोचली. मात्र, या गावात जाताना अण्णा भाऊ साठे यांच्या घराकडे जाण्यासाठी लोकांना विचारत विचारत जावं लागलं. गावात या संदर्भात कोणत्याही प्रकारचे दिशा फलक आढळून आले नाही. येथील पान पट्टी, चहागाडीवर, किंवा कुणा ग्रामस्थाला पत्ता विचारावा लागतो.
मुख्य रस्त्यापासून त्यांच्या घराकडे जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या नावाची कोणतीही कमान अथवा त्यांच्या प्रति आदर व्यक्त होईल असा कोणताही फलक दिसून येत नाही. ज्या ठिकाणी अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला ते घर त्यांची आठवण म्हणून जतन केले आहे. त्या घरा समोर एक दोन घरे आहेत, व उरलेला भाग हा शेतांनी व्यापला आहे.
अण्णाच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग शिल्पाच्या रूपाने तिथेच मागील बाजूस असणाऱ्या जागेत उभे करण्यात आले आहेत. पण शोकांतिकेची गोष्ट ही की अशा ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. सी. सी. टी.व्ही. नाही. गेल्या महिन्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृहावर’ एका माथेफिरुन दगडफेक केली होती. मुंबईमध्ये रमाबाई नगर येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची केलेली विटंबना आणि त्यातून गेलेले लोकांचे जीव अशा अनेक घटना आपल्या समोर असताना, सरकारला काहीतरी घडल्यावरच जाग येते का? सरकारचं आण्णाभाऊ साठे यांच्या वास्तूकडे इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
विशेष साहित्यिकांच्या गावात गेल्यानंतर या ठिकाणी अण्णाभाऊ यांचं कुठलंही पुस्तक मिळत नाही. एखाद्या साहित्यिकांच्या गावात पर्यटक म्हणून जर एखादी व्यक्ती गेली. तर त्या साहित्यिकांचं जीवनचरित्र, त्यांनी लिहिलेली पुस्तक मिळाली हवीत. मात्र, या ठिकाणी असं काही होताना दिसत नाही. जर सरकारने असं काही केलं तर अवघ्या महाराष्ट्रातून येणाऱ्या साहित्य प्रेमींसाठी ते खूप उपयुक्त व पर्वणी ठरेल. नाही तर त्यांची उभा केलेली शिल्पे फक्त सेल्फी पॉइंट ठरतील.
संपूर्ण वाटेगाव मध्ये आण्णा भाऊ साठे यांचा एकच अर्ध पुतळा आहे. एका ट्रस्टच्या माध्यंमातून त्याची व त्यांच्या नावाने असणाऱ्या हॉलची देखभाल घेतली जाते. आण्णा भाऊ साठे यांच्या शताब्दी वर्षाची सांगता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण या ठिकाणी मात्र, अनास्था दिसून येते.
वाढलेली झाडे, पुतळ्याच्या बाजूला कित्येक दिवसापुर्वीचे काढून टाकलेल्या हारांच्या माळा, प्रवेश द्वाराजवळ अस्वच्छता यामधूनच ही अनास्था दिसून येते.
ज्या अण्णांच्या साहित्यकृतीची, त्यातील नायक, नायकाची, त्याच्या संघर्षाची, त्यांच्या विचारांची दखल भारताच्या बाहेर घेतली गेली. त्यांना जनसामान्यांनी साहित्यसम्राट अशा उपाधीने गौरवले.. ज्या आण्णा भाऊ साठे यांनी अनेक उपेक्षिताना, वंचिताना साहित्याच्या माध्यमातून जगासमोर आणले, ते मात्र, आपल्याच मातीत उपेक्षित झाले का? हा प्रश्न त्यांच्या १०० व्या जन्मशताब्दी वर्षात मात्र, अस्वस्थ करणारा आहे.