Home > मॅक्स ब्लॉग्ज > ऍनिमल ' फिल्मचं (भव्य -दिव्य) यश आणि आजचा समाज

ऍनिमल ' फिल्मचं (भव्य -दिव्य) यश आणि आजचा समाज

ऍनिमल  फिल्मचं (भव्य -दिव्य) यश आणि आजचा समाज
X

गेल्याच आठवड्यात खरं म्हणजे आपण 'ऍनिमल ' आणि 'कबीर सिंग ' या या दोन्ही हिंसक चित्रपटांबद्दल चर्चा केली होती.. आता ,पुन्हा तेच चित्रपट आणि तीच चर्चा असं जर वाटत असेल तर चित्रपट जरी 'ऍनिमल ' असला तरी रोख या फिल्मने मिळवलेल्या उत्तुंग यशाकडे आहे ! संदीप रेड्डी वांगा या साऊथच्या दिग्दर्शकाचा हा चित्रपट . त्याचा 'कबीर सिंग ' हा मागचा चित्रपट देखील यशस्वी ठरला होता . पण 'ऍनिमल 'फिल्मने हल्लीच्या समाजावर केलेले गारुड चकित करते . 'ऍनिमल ' चे मीडिया स्क्रीनिंग झाले तेव्हा मी उपस्थित राहू शकले नाही , आणि चित्रपटाला वाढती गर्दी स्तिमित करू लागली तेव्हा जवळच्या चित्रपटगृहात 'ऍनिमल ' पाहिला ऍनिमल ' फिल्मच्या जमेच्या बाजू म्हणजे या फिल्मला कथा आहे . बऱ्याच चित्रपटांना हल्ली कथा नसते ,आणि असे 'कॉन्टेन्ट ' नसलेले चित्रपट दिशाहीन ठरतात . ऍनिमल 'चित्रपटाला निश्चितच एक सशक्त कथा आहे . अनिल कपूरसारख्या जेष्ठय अभिनेत्याने अतिशय संयत पण तरीही प्रभावी अभिनयाने त्याने त्याच्या परफॉर्मन्सचं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध केलं . अनेक दृश्यात अनिल कपूरला संवाद नाहीत पण त्याने त्याच्या अगतिकेतेच्या भावना सहजपणे व्यक्त केल्यात . अनिल कपूर ,रश्मिका मंदाना अशा प्रमुख कलावंताच्या भूमिका नावाजल्या जात आहेत . आता मुद्दा असा आहे - 'ऍनिमल 'मध्ये अनेक जागी अनावश्यक अश्लील संवाद आहेत , ज्याचा ऊल्लेख इथे करता येण्यासारख्या देखील नाही ..यावरून त्या संवादांच्या अश्लीलतेची जाणीव व्हावी ! कथेचा मुख्य नायक 'प्रोटोगॅनिस्ट ' रणबीर कपूर (रणविजय सिंग ) मोठ्या आत्मविश्वासाने गीतांजली अर्थात रश्मिका मंदनाशी विवाह करतो ,पुढे पत्नीसह तो अमेरिकेत स्थायिक होतो ,त्याला दोन अपत्यं होतात ,पण लग्नांला ७-८ वर्षे झाल्यानंतर एका एका परस्त्रीसोबत नायकाला शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दाखवले आहे ! ही सगळीच दृश्यं अनैतिक संबंधांना अवाजवी महत्व देताहेत असं जाणवतं ..कहर म्हणजे नायक आपल्या कृत्याचा पाढा स्वतःच पत्नीसमोर वाचतो आणि हे वर्तन कसं -का -कोणत्या कारणांनी घडले यात स्वतःचं निरपराधीत्व सिद्ध करण्याचा दुबळा प्रयत्न करतो ! त्याचे हे वर्तन अशोभनीय आणि निंदनीय आहेच ,पण स्वतःच्या वर्तनाची त्याला कुठेही लाज वाटत नाही .. पण तरीही आजच्या प्रगत समाजातल्या प्रेक्षकांनी , त्यातूनही स्त्रियांना यातील किळसवाणे संवाद , अनेक चुंबन दृश्यांची रेलचेल , विभत्स कामूक दृश्य यावर आतापावेतो काहीही आक्षेप घेतला नाही ..भले या चित्रपटाला 'ए ' (अडल्ट ) प्रमाणपत्र मिळाले आहे . .पण 'पोर्नोग्राफिक ' चित्रपट असावा अशा आभास वारंवार निर्माण करून देण्याऱ्या 'ऍनिमल ' ला मोठया संख्येने महिलांची उपस्थिती आहेच !

रणबीर कपूरने त्याच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये घुसलेल्या शेकडो शत्रुंना जीवे मारण्यासाठी 'रणगाड्यासदृश ' गाडीचा उपयोग करत अनेकांना यमसदनी धाडले ! पण गम्मत म्हणजे तरीही या नायकावर कुठलीही पोलीस कारवाई झाली नाही ! संपूर्ण चित्रपटात टोकाची हिंस्र दृश्य आहेत पण पोलीस मात्र कुठेही नाहीत .. 'नायक लहान असताना त्याच्या शाळेत चक्क रायफल घेऊन जातो .. ऍनिमल चित्रपटात वरचेवर अशी दृश्यं आहेत ज्यात लक्षात यावे महिलांचा तिरस्कार करणारी भावना निर्माण केली आहे .. रणबीर कपूर नायकाच्या व्यक्तीरेखेतून ''मिसॉगीनी ' दिसून येते असं म्हटलं जातं ..पण त्याचा परिपाक काहीही घडून येत नाही ! रणविजय सिंग हा नायक मानसिक दृष्टया ठीक नाही हे अनेकांना भासत राहतं ! आजवर अनेक हिंदी चित्रपटांतून प्रचंड हिंसा ,हिंसामत्क दृश्यं दाखवली गेली आहेत ,हे नवल नाही ,पण किड्या-मुंगीसारखी माणसं मारणारा नायक समाजात उजळ माथ्याने फिरतो , पत्नी-बहीण -आई सगळ्यांवर त्याचे प्रेम आहे ,पण त्यात आदर कमी आणि 'पझेसिव्हनेस ' अधिक वाटतो .. पितृसत्ताक वृत्तीचा हा 'ऍनिमल ' आजच्या घडीला लोकप्रिय ठरला आहे .. रणबीर कपूर या टायटलसह 'सुपर स्टार ' हे विशेषण देखील आपले लक्ष वेधवून घेतं ! नायकावर 'हार्ट ट्रान्सप्लांट ' होऊनही तो सतत हाणामारी करतो , सिगरेट्स फुंकतो ,दारू पितो , अनैतिक संबंध निर्माण करतो ! बॉबी देवलसोबत रणबीर कपूरची जी हाणामारी दाखवली आहे त्यातही बॉबीचा गळा कसायाप्रमाणे चिरताना रणविजय उर्फ बॉबीला दाखवले आहे !

ऍनिमल 'चा आरंभ आणि शेवट ' दोन्ही हिंसेत संपते ..खरे ऍनिमल असे असतात का ? स्वतःच्या विश्वात रमलेले ऍनिमल कधीही दुसऱ्याला तापदायक ,हिंसक ठरत नाहीत ! तरीही ! तरीही

ऍनिमल फिल्मच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने वर्ल्डवाईड ५२७ कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे ! इतके काही दाखवून देखील अशा विकृत 'ऍनिमल 'ला गळ्यात बांधायला आपण धजावलोय हेच खरं आहे ! कुठे चुकतोय आपण ? मनोरंजनाची आपली व्याख्या बदलली आहे का ?'

Updated : 10 Dec 2023 4:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top