Home > Election 2020 > जनतेनेच ही निवडणूक लढवली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकींचा ताळेबंद
जनतेनेच ही निवडणूक लढवली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकींचा ताळेबंद
Max Maharashtra | 25 Oct 2019 4:30 PM IST
X
X
महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या दोघांच्याही कारकिर्दीची वाखाणणी केली आहे आणि येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या दोघांच्याही कारकिर्दीची वाखाणणी केली आहे आणि येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडणूकीत जनतेने आपल्या परीने विरोधकांनाही बळ दिलं आहे पण सत्ता दिली नाही. विरोधी पक्षांकडे पाहिलं तर फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि जननायक जनता पार्टीने कडवी झुंज दिली. कोंग्रेसचं म्हणाल तर त्यांचे उमेदवार तर लढले पण पक्ष या लढाईत कुठेही दिसला नाही. महाराष्ट्रातल्या निवडणुकीतल्या दोन फोटोंबद्दल बोलून या विश्लेषणाला सुरुवात करूया. या दृष्यांनी प्रचाराची वावटळ उडवून लावणाऱ्या (व्यावसायिक) मंडळींची भंबेरी उडवली.
हे ही वाचा
साताऱ्यात राजे फुस्स, दोस्ती जिंकली!
पराभव कुणाचा…?
Courtesy : Social Media
भर पावसात भाषण करणाऱ्या शरद पवारांचा हा फोटो १९ ऑक्टोबरचा आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातला. ७९ वर्षांचे शरद पवार यांनी तब्बल अर्धा तास पावसात भिजत भाषण केलं. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षातून निवडून आलेल्या उमेदवारा विरुद्ध ते प्रचार करत होते. शिवजी महाराजांचे वंशज म्हणवून घेणारे उदयनराजे भोसले आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन या मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते.
उदयनराजे इथून तीन वेळा निवडून आले होते पण त्यांना आता भाजपच्या तिकिटावर पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे आता पावसात भिजणा-या पवारांच्या फोटोसोबत हा फोटो पहा. भाजपवाले या फोटोला ‘आयकॉनिक’ फोटो म्हणतात.
Courtesy : Social Media
अगदी योजनापूर्वक हा फोटो काढण्यात आलाय हे दिसून येतंय. शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याशी मोदींचा चेहरा असा काही तंतोतंत जुळवून आणण्यात आलाय की दोन्हीही एकाच फोटोत एकसारखे दिसावेत. खरोखरच जर या फोटोची जादू चालली असती तर भाजपाने स्वबळावर सरकार स्थापन केलं असतं. पण आता फक्त हा फोटो जिथे पनवेल इथे काढलाय. तिथला उमेदवार विजयी झालाय इतकंच. पण पवारांचा फोटो मात्र खरोखरच आयकॉनिक ठरला आहे. त्यांचं सरकार आलं नाही पण त्यांच्या पक्षाचा किल्ला मजबूत झाला आहे. थकल्या भागल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या मांदियाळीत हा फोटो आता दंतकथा बनून राहिला आहे.
शिवसेनेची भूमिका काय असेल हे ही आता पहावे लागेल. उद्धव ठाकरे आता ५०-५० च्या समीकरणाची भाषा बोलू लागले आहेत. अडीच वर्षं भाजपचा आणि अडीच वर्षं शिवसेनेचा मुख्यमंत्री अशी बोली झाली आहे. उत्तरप्रदेशात सपा-बसपा आणि जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी-बीजेपी यांच्यातले असे समझोते चालले नाहीत. शिवसेनेला मागल्या खेपेप्रमाणे ६३ जागा मिळाल्या नसल्या तरी भाजपाच्या २०-२२ जागा कमी झाल्या आहेत. पुन्हा थोरला भाऊ बनण्याची संधी आहे असं शिवसेनेला वाटू लागलंय. सरकारचे स्वरूप काय असेल याबाबत चर्चा करायला कदचित अमित शहांना यावं लागेल अशी भाषा उद्धव ठाकरे करू लागले आहेत. तर दुसरीकडे, कालच दिल्लीतून सरकारच्या प्रमुखाची घोषणा करण्यात आली आहे तरीही उद्धव ठाकरे म्हणत आहेत की ते प्रत्येकवेळी भाजपाला समजावून घेणार नाहीत.
Courtesy : Social Media
महाराष्ट्राच्या राजकारणात आता कुठल्याही एका पक्षाचा वरचष्मा नाही. पुन्हा सर्व पूर्वीसारखे झालं आहे. फडणवीस यांनी पक्षाच्या आतल्या आणि बाहेरच्या विरोधकांचा पुरता बंदोबस्त केला आहे असं वाटत होतं; पण असं नाही. शिवसेना, राष्ट्रवादी सोबत काँग्रेसनेही या निवडणुकीत चांगली कामगिरी केली आहे. अपक्ष आणि नवख्या पक्षांनाही ३१ जागा मिळाल्या आहेत, महाराष्ट्रात जनतेनेच ही निवडणूक लढवली. जनता आपल्या प्रश्नांवर निवडणूक लढत होती तर राजकीय पक्ष जनतेला आपल्या मुद्द्यांवर लढवत होते. माध्यमं सत्ताधारी पक्षासोबत निवडणूक लढवत होती. पण प्रचाराची ही वावटळ जनतेच्या वादळवा-या पुढे हरली. महाराष्ट्र आता कुण्या एकाची जहागीरदारी नाही, पण भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. १५ अपक्ष विजयी आमदार आपल्या संपर्कात असून ते पाठींबा दयायला तयार आहेत असं देवेंद्र फडणवीसांना का सांगावं लागलं?
Courtesy : Social Media
शिवसेनेला पाठींबा देणार नाही असं शरद पवार सांगतायत. सुपडा साफ होईल असं बोलल्या जाणा-या राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारांनीही चांगला निकाल दिला आहे. हे सर्व कॉंग्रेस पक्षामुळे घडलं नसलं तरी विरोधी पक्ष मजबूत झाला आहे. राजकारणाच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर ज्या धनगर समाजाच्या जोरावर पवारांना रोखण्याचे भाजपाचे मनसुबे होते त्या धनगर समाजाच्या प्रभावक्षेत्रात पवारांच्या पक्षाला भाजपपेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. पंकजा मुंढे बीडमधून ३०००० मतांनी पराभूत झाल्या आहेत तर बारामतीतून राष्ट्रवादीच्या अजित पवार १ लाख ६५ हजार २६५ मतांनी जिंकून महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी जिंकणारे नेते ठरले आहेत. मतदारांचे आभार मानण्यासाठी पवार शुक्रवारी सातारला जाणार आहेत. दिवाळीनंतर ते राज्याचा दौरा करणार आहेत.
हरियाणात काय घडलंय?
Courtesy : Social Media
एक्झिट पोलचा ताळेबंद तर जुळला नाहीच, पण मागल्या वेळेपेक्षा ७ जागा कमी जिंकूनही मोदी हरियाणातला विजय अभूतपूर्व आहे असं म्हणतायत. विरोधी पक्ष आणि विशेषज्ञ मनोहर लाल खट्टर हेच अपयशाला कारणीभूत आहेत असं मानत असले, तरी मोदींनी त्यांची भलामण केली आणि त्यांनाच मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवल्याचं जाहीर केलं आहे. जननायक पक्षाला १० तर कॉंग्रेसला ३१ जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला १६ जागा जास्त मिळाल्या पण ते सरकार बनवू शकले नाहीत. जर कॉंग्रेसने ही निवडणूक मनापासून लढवली असती तर जनतेने त्यांना पाठींबा दिला असता. महाराष्ट्राप्रमाणेच इथेही स्वतः जनताच आपली निवडणूक लढवत होती का? या निवडणुकीतून मिळालेला संदेश अगदी स्पष्ट आहे. जनता निष्पक्ष आहे. मनोहर लाल खट्टर यांची घोषणा होती, ‘अबकी बार ७५ पार.‘ तर तिथे ७ जागा कमी मिळाल्या. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पराभूत झाले. अनेक मंत्र्यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. खुद्द मनोहरलाल यांचे मताधिक्य घटलं. पण पंतप्रधान हा विजय अभूतपूर्व आहे असं म्हणत आहेत.
२०१४ मध्ये कर्नालमधून मनोहरलाल ६३७७३ मतांनी जिंकले होते. त्यांचे आताचे मताधिक्य ४५१८८ आहे. जननायक जनता पक्षाचे दुष्यंत चौटाला यांना अचानक महत्व आले होते. त्यांच्या पाठींब्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही असं वाटत होतं. पण आता तसं होणार नाही. हरीयाण्यात जजप आणि कॉंग्रेस यांचे संयुक्त सरकार बनण्याची शक्यता मावळली आहे. भाजप इथे सर्वात मोठा विधिमंडळ पक्ष आहे. साहजिकच त्यांना सरकार बनवण्याची संधी आणि आमंत्रण पहिल्यांदा मिळणार. भाजप बहुमतापासून ५ आकड्यांनी मागे आहे. ही दरी भरून काढणे फार कठीण नाही.
ताजा कलम :
जागा कमी होतात पण जागा कमी झाल्या म्हणजे पराभव झाला असं नाही; अशी अमित शहा यांची स्टाइल आहे. दिल्लीतल्या पक्ष मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत पंतप्रधान मोदीही हजार झाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरीही आले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डाही आले. कर्नाटक निवडणुकीत भाजपला स्पष्ट विजय मिळाला नव्हता तेंव्हाही हे सर्व याच मुख्यालयात आले होते. भर रात्री. विजयश्री त्यांच्या भाषणांतून झळकत होती. या ही वेळी.
अमित शहा म्हणाले कि मोदी-२ मधल्या या दोन निवडणुका जिंकून भाजपने एक पुढे पाउल टाकलं आहे. हरीयाण्यात भाजपाला ३% जास्त मतं मिळाली असून तो तिथला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अमित शहा यांनी मनोहर लाल आणि फडणवीस या दोघांचही कौतुक केलं, आणि म्हणाले कि दोन्ही राज्यातल्या जनतेने आमच्या मुख्यमंत्र्यांच्या कामावर शिक्कामोर्तब केलं आहे. शहांनी दोघांचंही अभिनंदन केलं. भाजप आपल्या सहकारी पक्षांच्या दडपणाखाली आपले मुख्यमंत्री बदलणार नाही, असं अमित शहांनी स्पष्ट केलय का! दिल्लीतल्या अनधिकृत वसाहतींबद्दल घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख करून ते म्हणाले कि, निवडणुका झाल्या आता पुढचा विचार करावा लागेल. त्यानंतर कार्यकर्त्यांसमोर पंतप्रधानांचे भाषण झाले. त्यांनीही आजचे निकाल म्हणजे जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक आहे असं सांगितलं. हरीयाणातला विजय अभूतपूर्व आहे अशी पुष्टी त्यांनी जोडली.
भाषांतर- रविंद्र झेंडे, पत्रकार आणि अभ्यासक
Updated : 25 Oct 2019 4:30 PM IST
Tags: bjpshivsena devendra fadnavis sharad pawar haryana-election-2019- Maharashtra Election 2019 ravish ki report ravish kumar on bjp
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire