शरद पवारांना खुले पत्र
Max Maharashtra | 10 Jun 2019 3:50 PM IST
X
X
मा. शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
पत्र लिहिण्यास कारण की आपणांस पद्मविभूषण हा नागरी सन्मान घोषित झाला, ऊर भरून आला. तुम्ही नुकतंच संसदीय राजकारणात हाफ सेंच्युरी पूर्ण केली. खूपच आनंद झाला. मनापासून अभिनंदन!
तुम्ही सतत बेरजेचे राजकारण करत आलात, त्यामुळे तुमच्या राजकारणाचा आवाका कुणालाच लक्षात आला नाही. बेरीज करता करता तुम्हीइतके पुढे गेलात की नेमकं तुम्ही काय काय जोडलंय हे ही तुमच्या लक्षात राहिले नसावं. अर्थात यालाही तुमचे भक्त आक्षेप घेतील. साहेबांना सर्वमाहित असतं, आणि त्यांच्या लक्षात सर्व असतं अशी त्यांची पक्की धारणा आहे.
असो, तो काही आपला विषय नाही. गेली अनेक वर्षे तुम्ही राज्यातील पुरोगामी राजकारणाचा चेहरा आहात. संघ परिवारावर थेट, आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पुरोगामी चळवळीतले लाखों कार्यकर्ते, कुठेच काही नाही झालं तर आहेत पवार साहेब, म्हणत थेट तुमच्या दारात यायचे. तुम्ही ही मोठ्या मनाने त्यांना सामील करून घेतलं. तुमचा पक्ष वाढत गेला. मग हळूहळू हा पक्ष नसून टोळी आहे असा आरोप विरोधी पक्षांनी सुरू केला. तुमच्यावरचा हल्ला म्हणजे पुरोगामीत्व, धर्मनिरपेक्षतेवरचा हल्ला माणून शेकडो कर्यकर्ते विरोधी पक्षांसोबत लढले. तुमचा पुरोगामी चेहरा आणि सर्वसमावेशक राजकारण करण्याची हातोटी यामुळे वांद्र्यात तुम्ही खाल्लेल्या माशांचे काटेही कार्यकर्त्यांनी आनंदाने, मोठ्या मनाने पचवले.
अर्ध्या चड्डीवरच्या तुमच्या रागामुळे म्हणा किंवा चड्डीशी तडजोड न करण्याच्या भूमिकेमुळे तुम्ही अनेकांच्या गळ्यातले ताईत बनून गेलात. कालांतराने अर्ध्या चड्डीचं फुलपँटमध्ये रूपांतर झालं आणि नंतर लोकांच्या लक्षात आलं की ही फुलपँट घसरू नये म्हणून लावलेला बेल्ट तुमचाचआहे. मग,पँट घसरल्याने लाज जाऊ नये म्हणून उदात्त भावनेने तुम्ही हे बेल्टचं काम स्वीकारलं अशी भावना करून घेऊन तुमचे भक्त सुखावले. बाहेर सांगू लागले, साहेब आहेत म्हणून सुरू आहे सगळं.
असो, माझा विषय वेगळाच आहे. सेक्युलरीजम वगैरे वगैरे च्या नावाखाली आयुष्य काढल्यानंतर, बाबरीकांडानंतर झालेल्या हिंसाचाराचे प्रत्यक्ष साक्षीदार राहिल्यानंतर, संघाशी लढाई ही वैयक्तिक नसून सैद्धांतिक लढाई जाहीर केल्यानंतरही तुम्ही या देशातील लोकशाही, पुरोगामीत्व, निधर्मीवाद य सर्वांना छेद देऊ पाहणाऱ्या विचारधारेला बळकट करण्याचं काम करत बसलात.
या विचारधारेशी लढायचं की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असू शकत नाही. तुम्ही आजपर्यंत समाज जीवनात जसं वावरलात, वागलात त्यातून निर्माण झालेल्या या अपेक्षा आहेत.
संघाच्या विचारधारेशी दोन हात करायची ऐतिहासिक जबाबदारी चालून आलेली असताना, तुम्ही नेमकं ती विचारधारा बळकट कशी होईल याचा प्रयत्न करत बसलायत.
तिकडे तुमच्या टोळीने काय उच्छाद मांडला, हे बाहेर येऊ नये म्हणून तुम्ही गप्प बसलायत अशी पण मार्केट मध्ये चर्चा आहे. तुमचे बहुजन समाजास आधारू असेलले माळी समाजाचे लोकप्रिय नेते छगन भुजबळ, रमेश कदम जेल मध्ये आहेत. बाकीचे कधीही जाऊ शकतील. साहेब आजपर्यंत निष्कलंक सामाजिक राजकीय आयुष्य जगले असा तुमच्या भक्तांचा दावा फोल ठरवण्यासाठी म्हणून की काय तुमच्या परिवारातल्याच जवळच्या लोकांवर आरोप झाले. खरं खोटे तुम्हालाच माहित.
आज देशातील सरकार सतत वेगवेगळे निर्णय घेतंय. या देशातील गरीब- कमजोर घटकाला श्रीमंत करायचं स्वप्न दाखवून सरकार सरकारने एक प्रकारची आर्थिक आणीबाणी लादली. एखादा भोंदू बाबा चमत्कार करण्याचा प्रचार करून लोकांना लुबाडतो तसं काहीसं चित्र देशात दिसलं. अशा लुबाडणुकीबाबत कुणाची सहसा तक्रार नसते. कारण आपण गंडलं गेलोय, हे लोकांना कसं सांगणार हा मुद्दा असतो. अशा वेळी कुणी तरी दीपस्तंभासारखी भूमिका घ्यायची असते. अपेक्षा ही होती की तुम्ही गरीब- सामान्य माणसाचं दुखणं मांडाल. आर्थिकदृष्ट्या असहाय्य झालेला माणूस कुणाशी कसा लढेल? खरं तर सामान्य माणूस लढून शकणार नाही. दु:ख या गोष्टीचं वाटतंय की आपण ही लढला नाहीत. #rcode
अतिशयोक्ती वाटेल पण, कन्हैय्याच काय पण राहुल गांधी सुद्धा त्यांना झेपेल तेवढी इतिहासाने सोपवलेली जबाबदारी पार पाडत आहेत. तुम्हीमात्र 'आतले की बाहेरचे' ते न कळल्यामुळे नेमकं साहेबांचं धोरण काय? हे लोकांना कळतंच नाही. लोकांचं सोडा पण तुमच्या टोळीलाही हे समजलेले नाही. लोक म्हणतात पैसा आणि मसल पॉवर असल्याशिवाय तुमच्या पक्षात प्रवेशच मिळत नाही. त्याच तुमची रित अशी की पक्षाने मोर्चा काढायचा, मग तुम्ही त्याआधी चर्चेला दिल्लीला जायचं. बँका - कारखाने अडचणीत आले की तुम्ही थेट पंतप्रधान- अर्थमंत्र्यांशी बोलायचं. पण प्रश्न हा आहे की, इथे विचारधारा धोक्यात आलेली असताना तुम्ही गप्प का?
बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून, निदान नागपूरला जाऊन मोहन भागवतांना भेटा. त्यांना सांगा मुख्यमंत्री स्टेजवर असताना हिंदूंना दहा दहापोरं काढायचे सल्ले देण्यापासून संत- महंताना रोखा, यामुळे 'मान न मान, मैं तेरा मेहमान' सरकार धोक्यात येईल. त्यांना सांगा अश्या चमत्कारी 'माळा' मुख्यमंत्र्यांच्या बायकोला काढून देत जाऊ नका. दुष्काळामुळे राज्यातल्या शेकडों महिलांनी आपले दागिने, मंगळसूत्र गहाण ठेऊन शेतीसाठी पैसा उभा केलाय. त्यांना सांगा हे राज्य शाहू फुले आंबेडकरांचंच आहे. छत्रपतींचा आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्राला आहे, तिथे महाराजांच्या नावाचा जयघोष करण्याऐवजी मोदी-मोदी ओरडणे शिवद्रोह आहे.
जमलं तर भागवतांना हे ही सांगा, भाजपेतर लोकं पाकिस्तानी नसतात. हिंदू नसलेले देशद्रोही नसतात. चाय पर चर्चा झाल्यानंतर दिलेली आश्वासनं पूर्ण करता आली नाहीत म्हणून गाय पर चर्चा नका करू. पवार साहेब, भागवतांना हे पण सांगा तुम्ही हाफ चड्डीतून फुलपँटमध्ये आलात म्हणून बायकांना बुरख्यात ढकलू नका.
अजूनही बरेच आहे साहेब, पण तुमचेच भक्त मला बोलले, जरा बेतानं सांगा, साहेबांना सर्वच माहिती असतं, म्हणून आवरतं घेतो. जर मोदी- आणि भागवत साह्यबांनी तुमचं नाहीच ऐकलं तर मग मामला साफ आहे. तुमचं घड्याळ बंद पडण्याच्या मार्गावर आहे. वेळ आहे तोवर सेल बदलून टाका.
ता.क. - नाही म्हटलं तुम्हाला राग येईल म्हणून मघाशी बोललो नाही, पण सांगीतल्या शिवाय राहावत नाही. माझा जन्म झाला तेव्हा मुख्यमंत्री झाला होतात, तेव्हा तुमच्याच भाषेत सांगायचं तर मला तेवढा अधिकार नाही. पण आपलं कार्य फार मोठं होतं आणि आहे. या वयात व्यवहारासाठी विचारांशी तडजोड करू नका. फारच वाटलं तर तुम्हाला कोणी सांगणार नाही करायला, पण स्वत:हून यातून निवृत्त व्हा आणि नवीन पिढीला नेतृत्व सोपवा. त्यांनाही सांगा, सत्ता येते जाते, सत्तेसाठी विचारांशी तडजोड करू नका.
आपलाच,
राज्याचा एक हितचिंतक
सदर लेख २५ जानेवारी २०१७ ला मॅक्समहाराष्ट्रच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Updated : 10 Jun 2019 3:50 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire