Home > मॅक्स ब्लॉग्ज > वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने..., कर्मकांड ते स्वार्थकांड ..?

वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने..., कर्मकांड ते स्वार्थकांड ..?

कोणत्याही जातीतील लोकं आता इतर जातीतील लोकांची काम करताना पाहिला मिळतात. मात्र, ब्राह्मण समाज करत असलेल पौरोहित्याचं काम इतर समाजातील लोक का करु शकत नाही?. वाचा हेमंत पाटील यांचा वेगळा विचार मांडणारा लेख...

वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने..., कर्मकांड ते स्वार्थकांड ..?
X

कोणत्याही जातीतील लोकं आता इतर जातीतील लोकांची काम करताना पाहिला मिळतात. मात्र, ब्राह्मण समाज करत असलेल पौरोहित्याचं काम इतर समाजातील लोक का करु शकत नाही?. वाचा हेमंत पाटील यांचा वेगळा विचार मांडणारा लेख...

आमदार अमोल मिटकरी –

संभाजी ब्रिगेडचे माजी पदाधिकारी, प्रवक्ते. सध्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार. प्रभावी वक्ते. शिवाजी महाराजांवर व्याख्यान देणारे…

परवा सांगलीत झालेल्या राष्ट्रवादीच्या संकल्प यात्रेच्या जाहीर सभेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. हे वक्तव्य त्यांनी पौरहित्य करणार्‍या म्हणजे लग्नात होम हवन करणार्‍या गुरुजींबद्दल केले. गुरुजी म्हणतात, "मम भार्या समर्पयामी म्हणजे माझी बायको घेवून जा असे म्हणायला सांगतायत". या आधी त्यांनी कन्यादान ह्या विषयाची खिल्ली उडवली. आता कोणताही गुरुजी मम भार्या समर्पयामी असे म्हणत नाही. मला तरी तसे वाटत नाही. कन्यादान हा विषय वेगळा आहे. त्या विधिला कन्यादान म्हणायचे का नाही हे आजच्या 21व्या शतकात विचार करण्यासारखे आहे. कन्या ही दान करण्याची गोष्ट असूच शकत नाही. ती माणूस आहे. त्यामुळे कन्यादान हा शब्द बदलण्याची गरज आली आहे असे वाटते.

आता ह्या निमित्ताने हिंदू धर्मातील चुकीच्या चालीरीती, कर्मकांड, खोट्या कथा ह्या सर्वांवर विचार करून योग्य अयोग्य ठरवण्याची वेळ आली आहे. त्याची अंमलबाजवणी सर्व समाजाने विचार करून एकमताने करण्याची गरज आहे.

आधी अमोल मिटकारीच्या वक्तव्यावर बोलू...

अमोल मिटकरींनी त्यांच्या दृष्टीने पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींच्या चुकीच्या पद्धतीवर टीका केली. हसत टीका केली, खिल्ली उडवली आहे. एक किस्सा सांगून पक्षाच्या जाहीर सभेत खिल्ली उडवली आहे. त्यांनी उडवलेल्या खिल्लीचे समर्थन कोणीही करू नये. कारण 'मम भार्या समर्पयामी म्हणजे माझी बायको घेवून जा' असे सांगितले जात नाही. समस्त गुरुजी वर्गाने, हो फक्त समस्त गुरुजी वर्गाने त्यावर आवाज उठवला पाहिजे. मिटकारींनी त्यांचे वक्तव्य अयोग्य असेल तर त्यांची माफी मागायला पाहिजे.

आता मुद्दा असा की मिटकारींनी संपूर्ण ब्राह्मण समाज्यावर टीका केली नाही... किंवा हिंदू समाजावर टीका केली नाही...! मग समस्त ब्राह्मण समाजाने त्यांच्या विरुद्ध रान उठवायचे कारणच नाही. बहुजन समाजात उगाच चुकीच्या गोष्टी पसरवू नये. ही दडपशाही कोणत्याही समाजाने करणे अयोग्य आहे.

लग्नातील विधींवर त्यांच्या दृष्टीने जे खटकले ते जाहीर भाषणात सांगितले. ते जर चुकीचे असेल तर पौरोहित्य करणाऱ्या लोकांनी त्यांना त्यांची चूक दाखवून द्यावी आणि त्या श्लोकाचा अर्थ सर्व जनतेला सांगावे म्हणजे सर्व प्रश्न मिटतील. आणि समजा त्यांनी सांगितलेल्या किस्स्यामध्ये खरोखरच एखाद्या चावट गुरुजी त्यावेळेस तसे म्हणाले असेल तर...? हा सर्व जर तरचा मामला आहे.

आज 2022 साली एखाद्या विधीमध्ये जे म्ंत्रोचार करण्यात येतात त्याचा अर्थ यजमानाला कळला पाहिजे. यात जर काही खटण्यासारखे मंत्र - विधी असतील तर त्यावर 22व्या शतकात टीका करायची नाही का..?

स्वतःच्या धर्मातील खटकलेल्या गोष्टींवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. घटनेने तसा अधिकार त्यांना दिलाय. काही चालीरीती ह्या काळानुसार, स्थळांनुसार आणि समाजानुसार बदलत असतात. सतीची चाल किंवा विधवा केशवपण आज कालबाह्य झालय. ज्याला पूर्वी परंपरा व धर्माचे लेबल लावून चालू ठेवले होते.

आज 22व्या शतकात सर्व जातीतील लोकं शिक्षित व सुज्ञ झालीत. संस्कार, धर्म, चालीरीती, परंपरा या बद्दल योग्य अयोग्य लोकांना कळू लागलंय. त्यामुळे मिटकरीच काय तर अनेक तरुण पिढी टीका करायला लागलीय.

उदा: नारायण नागबली किंवा सत्यनारायन पुजा. सत्यनारायण पूजेचे महत्व दिवसेंदिवस कमी होतंय. त्यातील खोट्या कथा लोकांना समजू लागल्यात. कोणता देव त्याचे व्रत केले नाही म्हणून शिक्षा देतो...? हा बदल योग्य की अयोग्य...? निश्चितच योग्य आहे... अनेक घरात पूर्वी सारख्या सत्यनारायण पूजा होत नाहीत...! नारायण नागबली एक थोतांड आहे हे शिक्षित लोकांना कळू लागलंय. ज्याचे गोत्र माहीत नाही त्याला गुरुजी कश्यप ऋषीच्या गोत्रात टाकतात. हे का...? यावर कुणीही विचार करायचा नाही किंवा भाष्य करायचे नाही का..?

स्वतःच्या राजकारणासाठी कुणीही याचा वापर करू नये. आज जे चाललंय ते फक्त राजकीय हेतूने एकमेकांवर टीका करणे आणि आंदोलने करून आपली पोळी भाजण्याचा प्रकार आहे. जनता खूप सुज्ञ झालीय. ते या लोकांना भीक घालणार नाही.

लक्षात घ्या... एका कोरोनासारख्या महामारीने सर्वांना एक समान पातळीवर आणले. मेलेल्या लोकांना अग्निसुद्धा कोणतेही मंत्रोच्चारा शिवाय देण्यात आला. ना कुठला मंत्र ना कुठले गुरुजी ना कुठला विधी ...! मग तो कोणत्याही समाजाचा, जातीचा किंवा धर्माचा असो...!

मग तेंव्हा कोणत्याही गुरुजींनी या विरुद्ध का आंदोलन केले नाही..!

पूर्वी लोकांना संस्कृत येत नव्हते. त्यामुळे गुरुजी म्हणत असलेल्या श्लोकांचे अर्थ कळत नव्हते. आता लोकं शिक्षित झालीत. त्यांना सर्व कळू लागले. ते एकमेकांच्यात चर्चा करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन नवीन माहिती मिळवतात. त्यामुळे पूर्वीसारखे कोणतेही प्रश्न न पडता विधी करीत नाहीत.

ब्राह्मण समाजाने हिंदूंच्या माथ्यावर वेदोक्त आणि पुराणोक्त हे वेगवेगळे विधी लादून स्वतचे श्रेष्ठ्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आजही भटजी धर्मकार्यातून "पुराणोक्त विधी करून इतरांना दुय्यम वागणूक देतात. आता हे सर्व लोकांना कळू लागले आहे...!

आज कित्येक महिला पौरुहित्य करू लागल्यात. मग त्यांच्यावर सुद्धा ब्राह्मण समाज्याने कारवाई करावी का..? महिलांनी पौरोहित्य करण्याचे वर्ज होते. आज तो बदल समाजाने व पौरुहित्य करणार्‍या गुरुजींनी स्वीकारलाय. मग हा बदल सुद्धा स्वीकारवा लागेल.

मुख्य म्हणजे दवे आंदोलन करून धमक्या देतायत, ते स्वतः पौरोहित्य करतात का.? आज जे आंदोलन करतात त्यांच्या त्या आंदोलकांपैकी कितीजण पौरोहित्य करतात…? मिटकरींनी लग्न लावणाऱ्या गुरुजींवर टीका केली. जातीवर नाही तर व्यवसायावर टीका केली...! मग इतर व्यवसाय करणाऱ्या ब्राह्मणांनी बोलण्याची गरज काय..?

अनेक गुरुजी विविध खड्यांच्या अंगठ्या घालायला सांगतात. त्यामुळे काहीही होत नाही. मग त्यावर बोलायला नको.? त्यावर कोणी टीका केली तर राग व्यक्त करण्याचे कारणच नाही.. !

होम करा आणि घरात चांगले होईल, भरभराट येईल ह्या असल्या तकलादू गोष्टींची खात्री कोण देते का…? चांगलं झालं नाही तर पैसे परत देतात का ..? फक्त गुरुजी सांगतात म्हणून विश्वास ठेवायचा का ...? मग त्यावर सुद्धा बोलायला नको..?

आपल्या देशात खास करून महाराष्ट्रात संतांची परंपरा खूप मोठी आहे. सर्व संतांनी भक्ति मार्गाबरोबरच त्यांना खटकणार्‍या चालीरीतीवर सडकून टीका केलीय. विडंबन केलीत. मोठमोठे ग्रंथ लिहलेत. त्या त्या काळातील सनातन ब्राह्मणांनी त्यांना त्रास सुद्धा दिलाय. मग ते सर्व संत मूर्ख होते का..?

आजपर्यंत बऱ्याच चित्रपटात या रुढींवर भाष्य झालीत, कठोर टीकाही झाली, मग ते सुद्धा चूक आहे का..त्यावर का आंदोलने झाली नाहीत..?

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज हे महामानव सुद्धा कर्मकांड व चुकीचे मंत्र तंत्र या विरुद्ध होते. त्यांच्या विरुद्ध का आता आंदोलने होत नाही..?

त्रंबकेश्वर मधील गुरुजींच्यामध्ये नुकतेच भांडण झाले. एका परप्रांतीय गुरुजींनी पिस्तुल काढले. त्यावेळेस हे ब्राह्मण समाज्याच्या तथाकथित पुढारी काय करीत होते..? नंतर सर्वांना लक्षात आले की हे भांडण फक्त आणि फक्त मिळणार्‍या दक्षिणेसाठी होते.

मंत्राने गोष्टी घडतात किंवा असे केल्याने पाप लागते किंवा असे केले नाही तर भरभराट होत नाही… हे सांगून किती वर्षे समाजाला घाबरवणार…?

जे गुरुजी आपली भरभराट होण्यासाठी होमहवन करायला सांगतात, विविध विधी करायला सांगतात ते सर्व स्वत: करोडपती असायला पाहिजेत.... परंतु तसे असते का ...?

मिटकरींनी भूमिका योग्य आहे की नाही हा विषय वेगळा. परंतु काही वर्षांपूर्वी गायत्री मंत्र खूप भारी आहे आणि तो फक्त ब्राह्मणांनाच सांगितला जातो इतरांना नाही अशी व्यवस्था समाजात होती. नंतर गायत्री मंत्राच्या ऑडिओ सीडी आल्या...! एकाही ब्राह्मण व्यक्तींने त्यावर आंदोलन केले नाही...!

समजा, उद्या बहुजन समाज्याच्या मुलांनी लग्न, वास्तुशांत, प्राणप्रतिष्ठापना , होम हवन इत्यादी सर्व विधी व त्याची पद्धत - मंत्रोचार शिकले आणि लोकांच्याकडे ते विधी करायला लागले तर काय होईल...? समाजाने त्या सुद्धा तसे विधी बहुजन मुलांकडून करून घेतले तर काय होईल...?

पौरोहित्य करणे हा एकमेव व्यवसाय आहे की तो फक्त एका जातीचे लोकं करू शकतात. दुसर्‍या सर्व व्यवसायात कोणत्याही जाती – धर्मांचे बंधन नाही. विचार करा, माळी, शिंपी, सोनार, लोहार, चांभार, न्हावी, परीट, कुंभार, सुतार, तेली, ढोर, कोळी, गवंडी, विणकर, गुरव. ह्या सर्व जातींचे काम कोणत्याही जातीतील लोकं करतात. एखादा मराठा किंवा ब्राह्मण गवंडी काम करू शकतो , एखादे टेलरिंगचे काम करू शकतो.

काळ बदलतोय..!

सर्व समाजाने लक्षात घेतले पाहिजे.

जस जसा समाज विज्ञानावर आधारित आपली प्रगति करेल तस तसा तो कर्मकांड व चुकीच्या चालीरीतीतून मुक्त होईल. त्याची भरभराट होईल.

धन्यवाद ...!

हेमंत पाटील

राजकीय विश्लेषक व निवडणूक सल्लागार,

Updated : 25 April 2022 5:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top