Home > मॅक्स ब्लॉग्ज > Zomato : मुस्लीम महिलांचे स्तन आवडतात पण जेवण आवडत नाही

Zomato : मुस्लीम महिलांचे स्तन आवडतात पण जेवण आवडत नाही

Zomato : मुस्लीम महिलांचे स्तन आवडतात पण जेवण आवडत नाही
X

काल झोमॅटोच्या निमित्ताने हिंदू धर्माला ठोकण्याची एक चांगली संधी मिळालीय सर्वांना. डिलीव्हरी बॉय मुस्लीम असल्याने अमित शुक्ल नावाच्या कर्मठ हिंदूने जेवणाची डिलीव्हरी घ्यायला नकार दिला. आपण आपली ऑर्डर रद्द करत आहोत, आणि एका नॉन-हिंदू रायडर कडून डिलिव्हरी घ्यायला तुम्ही मला फोर्स करू शकत नाही असं ट्वीट अमित शुक्ल ने केलं आहे.

माझ्या ओळखीच्या हिंदूंपैकी असा हिंदू मला अभावानेच माहित आहे, अमित शुक्लच्या निमित्ताने अनेकांच्या आतला हिंदू ही जागृत झाला असेल. पण अशा हिंदूंची संख्या कमीच असावी. अशा हिंदूंनी जातव्यवस्थेची जोखडं डॉ. आंबेडकरांनी तोडण्याआधी देशात काय दहशत माजवली असेल याचा अंदाज मी बांधत होतो. डोक्यावर रूळणारी अदृश्य शेंडी देशात सतत अशा पद्धतीचा भेदभाव जागवत आलीय. कधी दलित तर कधी मुसलमान. कधी दगडांनी ठेचलं तर कधी अशा ट्वीट ने. अमित शुक्लचं ट्वीट ही केवळ भावना नाहीय, धर्माचं अतिप्रेम-आग्रह नाही, तर कायद्याने गुन्हा आहे. भारतीयत्वाच्या व्याख्येत अशा हिंदूंना थारा नाही.

झोमॅटोच्या निमित्ताने या देशातील अशा कर्मठ हिंदूंचा विद्रूप चेहरा समोर आलाय. हिंदुत्वाच्या नावाने भडकवणाऱ्या तमाम लोकांपासून चार हात लांब राहा असं आम्ही सतत सांगत असतो ते या मुळेच. या देशाला भारतीय बनवण्याची गरज आहे. भारतीयत्वाचा मार्ग हिंदुत्व किंवा इस्लाम मधून किंवा कुठल्याही धर्मामधून जात नाही. तो मानवतेचा विचार आहे. जात-धर्म-भाषा यांच्या प्युरिटीचा आग्रह का कर्मठपणाकडची वाटचाल आहे, असा विचार माणसाला अतिरेकी बनवतो.

अमित शुक्लने एका गरीब डिलीव्हरी बॉयकडून जेवण घ्यायला नकार दिला. असा विचार करणारा माणूस कशा टाइपचा हिंदू आहे हे पाहण्याची गरज आहे. अमित शुक्लचं ट्वीटरवरचं हँडल आहे. नमो सरकार या नावाने. कालच्या वादानंतर अमित शुक्लने ट्वीटर वरच अकाऊंट प्रायव्हेट केलं.

तो स्वतःला प्राऊड हिंदू म्हणवून घेतो. त्याच्या ट्वीटर हँडल वरून तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निस्सीम चाहता आहे, असं दिसून येतं. त्याने केलेलं एक ट्वीट याआधी खूप व्हायरल झालं होतं. तस्लीमा नसरीनच्या एका फोटोवर तिच्या स्तनांची तारिफ करणारं ट्वीट अमित शुक्ल ने केलं होतं असे स्क्रीनशॉटस् नेटकऱ्यांनी पोस्ट केले आहेत. असं असेल तर हा अमित शुक्ल कसला हिंदू आहे हे कळायला मदत होते. मुस्लीम माणसाच्या हातचं जेवायला आवडत नाही, त्या माणसाला एका मुस्लीम महिलेच्या स्तनांवर जाहीररित्या बोलायला मात्र आवडतं.

मुस्लीम महिलांच्या सन्मानासाठी तिहेरी तलाक वर बंदी घालणाऱ्या नरेंद्र मोदींचं नाव ही हा माणूस स्वतःच्या ट्वीटरला देतो, याचा अर्थ हा माणूस हिंदू नसून वेगळ्यात बुरसटलेल्या विचारांचा असल्याचं समोर आलंय. या अमित शुक्लच्या समर्थनार्थ #IstandwithAmit अशी मोहीम ही काही रिकामटेकड्या लोकांनी चालवली आहे. अन्नाला धर्म नसतो असं ट्वीट करणाऱ्या झोमॅटोला या लोकांनी ‘हलाल’ च्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लीम ग्राहकांनी हलाल मांसाहारासंदर्भात ट्वीट केल्यावर दखल घेणारं झोमॅटो हिंदूंना श्रावणात मुस्लीम डिलीव्हरी बॉयकडून डिलीव्हरी घ्यायला सांगतंय, त्यामुळे झोमॅटोला bycott करा ( #BycottZomato ) अशी मोहीमही राबवण्याचा प्रयत्न केला.

मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, माझ्या काही धार्मिक भावना आहेत, असं अमित शुक्ल ने आपल्या मुलाखतीत म्हटलं आहे. अशा पद्धतीच्या धार्मिक भावना त्याला कोणी शिकवल्या, त्या ज्या काळात प्रबळ होता तो काळ जाऊन बरीच वर्षे झाली असली तरी अमित शुक्लच्या रूपाने त्याच्या खाणाखुणा आपल्याला बघायला मिळतात. आता अशा पद्धतीची कट्टर धार्मीकता राबवता येऊ शकते असा आत्मविश्वास त्याला का आला, ज्या हिंदूराष्ट्राची मांडणी गेल्या काही वर्षांपासून केली जातेय ते हिंदूराष्ट्र अशा पद्धतीचं असणार आहे का, अशा अनेक मुद्द्यांवर आता विचार करण्याची गरज आलीय. मला वाटतं अमित शुक्ल चा विचार हा धार्मिक नसून एक राजकीय विचार आहे. हा राजकीय विचार हळूहळू धार्मिक कट्टरतेकडे घेऊन जाण्याचा विचार आहे. झोमॅटोचं जेवण नाकारलं जाणं ही फक्त लिटमस टेस्ट आहे.

Updated : 1 Aug 2019 9:09 AM IST
Next Story
Share it
Top