Home > मॅक्स ब्लॉग्ज > मोदी, ट्रम्प आणि दरारा....

मोदी, ट्रम्प आणि दरारा....

मोदी, ट्रम्प आणि दरारा....
X

मोदी आणि ट्रम्प यांच्या खुल्या बॉडी लँग्वेज, एकमेकांच्या अंगाशी झटत बोलण्याची अद्भुत केमिस्ट्री यामुळे भक्तांना सातवं आसमान ठेंगणं वाटायला लागलं आहे. पाकिस्तानच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना हस्तक्षेप करू नका असं ठणकावून सांगीतलं आणि ट्रम्प यांनी माघार घेतली, मोदींची टाळी ( ट्रम्प यांच्या हातावर मारलेली चापट ) म्हणजे अमेरिकेने भारताला दिलेली टाळी आहे, अशा आशयाचा साक्षात्कार ( महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्याला सिरिअसली घ्यायचं नाही असं म्हणतात अशा) मुखपत्रांना झालाय.

दरम्यान पाकिस्तानने अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केलीय. पाकिस्तान असे इशारे भारताला सतत देत असतो. याच दरम्यान, अमेरिकेच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिल्ली दरबारी कश्मिर ( Kashmir ) मध्ये सातत्याने नागरिकांच्या धरपकडी आणि संपर्क-संचार बंदी वर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्याशी पंतप्रधानांच्या भेटीनंतर हे सर्व होतंय. हे विशेष.

मोदी यांच्या भक्तमंडळींपैकी अनेकांची कर्मभूमी आणि मातृभूमी अमेरिका आहे. या मंडळींकडून मोदींना प्रचंड जनसमर्थन मिळत असतं. भारताच्या निवडणूक प्रक्रीयेवर या मंडळींनी विशेष प्रभाव टाकायला सुरूवात केली आहे. मात्र, त्यांचा देश त्यांचं ऐकत नाही असंच चित्र सध्या दिसतंय. ज्या सहजतेने ट्रम्प मोदींना भेटतात, बोलतात, त्यांच्या इंग्रजीवरून सार्वजनिक मंचावर थट्टामस्करी करतात, त्याच सहजतेने ट्रम्प पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही भेटतात. चर्चा करतात. अनेकदा तर भारताशी चर्चा केल्यानंतर लगेचच पाकिस्तानला आर्थिक मदत ही अमेरिकेने पाठवली आहे.

मोदींचं परराष्ट्र धोरण हे त्यांच्या जगप्रवासानंतर स्पष्ट झालंय. जागतिक नेत्यांच्या उठबस मध्ये भारताला मानाचं स्थान मिळवून देणं, भारताला आंतरराष्ट्रीय मंचावर नवीन वैभव मिळवून देणं वगैरे वगैरे. मोदींनी जवळपास सर्वच राष्ट्रप्रमुखांशी भेटी घेऊन, चर्चा करून नवीन भारताची एक मुहूर्तमेढ रोवली आहे. भारत एक मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे जगाला भारताचं आकर्षण आहे. सर्वांत जास्त लोकसंख्येचा देश असलेला चीन हा जगातला प्रमुख उत्पादक देश आहे, तर दुसऱ्या नंबरचा देश असलेला भारत ग्राहक म्हणून जगाला जास्त आपलासा वाटतो. अशा वेळी भारताचं एक वेगळं स्थान जगाच्या नकाशावर स्थापित झालंय. मोदींच्या भेटीनंतर एखादा देश कश्मिरमधल्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्याची आगळीक दाखवत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या अशा देशांना खरोखरंच ठणकावलं पाहिजे. अमेरिकेला भारताचा हा दरारा दाखवून द्यायची हीच वेळ आहे.

Updated : 30 Aug 2019 8:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top