Home > मॅक्स ब्लॉग्ज > शाळेत होणाऱ्या प्रार्थनेत सर्वसमावेशक भजनं गायला हवीत – विनय राम रघूनाथ

शाळेत होणाऱ्या प्रार्थनेत सर्वसमावेशक भजनं गायला हवीत – विनय राम रघूनाथ

शाळा सुरू होताना आपण ज्या प्रार्थना म्हणतो त्या प्रार्थनेवरून राजकारण आपल्या देशात गेल्या काही काळापासून रंगत आहे. कुणी म्हणतं प्रार्थना थांबवा तर कुणी म्हणतं प्रार्थना या संस्कारांसाठी असतात. यात नेमकं काय करायला हवं? जाणून घेण्यासाठी वाचा विनय रघुनाथ यांचा लेख...

शाळेत होणाऱ्या प्रार्थनेत सर्वसमावेशक  भजनं गायला हवीत – विनय राम रघूनाथ
X

काश्मीर मध्ये नागाम कुलगाम येथील सरकारी शाळेतील प्रार्थनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. श्रीनगर पासून 70 किलोमीटरवर असलेल्या डि एच पोरा विभागात ही शाळा आहे. मांडी घालून बसलेली बहुदा 8/9 इयत्तेतील मुले आणि मुली एकदा डावीकडे एकदा उजवीकडे असे वाकत, हलक्या टाळ्या वाजवत "रघुपती राघव राजाराम । पतित पावन सिताराम । " भजन म्हणताना दिसत आहेत. या भजनाचा पुढचा भाग "ईश्वर अल्ला तेरो नाम । सबको सन्मती दे भगवान ।" देखील तल्लीन होऊन म्हणताना दिसतात. ही जोड महात्मा गांधींच्या आश्रम भजनावलीत देण्यात आलेली होती. या भजनातून सर्वांना आंतरीक आपुलकीचा संदेश मिळावा असे गांधीना वाटत होते. तेच भजन शिक्षकांच्या मागोमाग ही मुले तल्लीन होऊन म्हणताना व्हिडिओमध्ये दिसतात.

या व्हिडिओमुळे काश्मीरमधील विविध मुस्लिम संघटनांमध्ये असंतोष निर्माण झाल्याच्या बातम्या पुढे आल्या आहेत. मुत्ताहिद मजलीस-ए-उलेमा या तीस इस्लामी धार्मिक आणि शैक्षणिक संघटनांच्या आघाडीने शाळांमधून हे प्रकार थांबवावेत अशी मागणी सरकारकडे केली आहे. पुढे असेही म्हटले आहे की शाळांमध्ये - भजन गाणे, योग करणे आणि सूर्यनमस्कार घालणे' हे मुस्लिम धार्मिक भावनांना धक्का देणारे खेजनक कृत्य आहे.

मुत्ताहिद मजलीस-ए-उलेमाच्या या मागणीला पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी पाठिंबा दिला आणि सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप केला. हा आदेश मागे घेऊन ताबडतोब प्रार्थनेच्या नावाखाली चालणारे हे उपक्रम बंद करावेत अन्यथा मुस्लिम लोक आपली मुले सरकारी शाळांमधून काढून घेतील असेही त्यांनी सांगितले. यावर भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी अल्ताफ ठाकूर यांनी 'यात नवीन काही नाही. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी परिस्थिती माहिती करून घेऊन मग विधाने करावीत' असे सांगितले.

तसे पाहिले तर - योग आणि सूर्यनमस्कार हे शारीरिक व्यायाम प्रकार आहेत. सूर्याची नावे घेत किंवा न घेता नमस्कार घातले तरी व्यायाम तेवढाच होतो. ओमकार हा शब्द वापरून श्वसनाचे व्यायाम वेगवेगळ्या प्रकारांनी करता येतो. त्यात श्रद्धा असण्या नसण्याचा प्रश्न येत नाही, किंवा आहेत त्या श्रद्धा बदलण्याचा प्रश्न येत नाही. धार्मिक श्रद्धा इतक्या कमकुवत आणि हलक्या असतील की त्याने माणसाचा समजूतदारपणा नष्ट होत असेल तर - त्या नसलेल्याच चांगल्या.

खरे तर भारतामधल्या सर्वच शाळांमध्ये धर्मांतील सदगुणांचा उल्लेख करणाऱ्या प्रार्थना नियमितपणे व्हायला हव्यात. यात विविध धर्म पंथांची गीते समाविष्ट करून घ्यावी. तसे केल्याने - सारे भारतीय माझे बांधव आहेत - या वाक्यातील सर्वधर्मसम भावाचा प्रत्यय येईल. शाळांमधून विविध पंथांची सर्वसमावेशक भजने गायली गेली तर माणसात निर्माण झालेल्या ईश्वर विषयक संकल्पनांची समज वाढेल, गायनाच्या आणि प्रार्थनांच्या विविध शैलीही मुलामुलींना समजतील.

भारतीयत्वात सर्व धर्म पंथ समाविष्ट आहेत असे जुन्या काळात विविध संत महंतांनी आणि आधुनिक काळात महात्मा गांधी, रवींद्रनाथ ठाकूर, साने गुरूजी इत्यादींनी मान्य केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वांना एकत्र घेण्याची भूमिका काँग्रेसने घेतली ती महात्मा गांधी यांनी पुढे विस्तारित करत नेली. भारताची राज्यघटना रचताना डॉ. आंबेडकरांनी तो विचार पायाभूत मानला. देशातील कायदे, न्याय व अंमलबजावणी यंत्रणा कोण्या एका विशिष्ट धर्म पंथातील श्रद्धांनी संकुचित वा प्रभावित असणार नाहीत असा कटाक्ष पाळला गेला. सार्वजनिक जीवनात देखील सर्व धर्म पंथ यात एकोपा राहील यासाठी प्रयत्न करणे हे नैतिक कर्तव्य मानले गेले. मात्र सध्या धर्म पंथ वापरून समाजात वैमनस्य निर्माण करून आपले राजकीय हीत साधण्याची होड लागली आहे हे वरील उदाहरणावरून दिसून येते.

यावर उपाय म्हणून शाळांमधील नित्यपाठात रोज वेगवेगळ्या प्रार्थना प्रकारांचा अंगीकार करावा. संगीताची जाण येण्यासाठी भजनांचे प्रकार जसे - चक्रीभजने, सोंगी भजने, निर्गुण भजने, सुफी भजने, अभंग, दोहे, अखंड गायन, वेद तसेच सालेमच्या पुस्तकातील स्तोत्रे, शीखांचे पंचबानी, अरदास, शबद वा कीर्तन असो, उत्सवी वातावरणाची जुनी नवी कॅरोल, एकेश्वरवादी सलाह, शहाणपण सुरक्षितता आणि मार्गदर्शन मागणारी नात, बौद्ध प्रार्थनेचा जपानी प्रकार शिंटो, गुलामी आणि वसाहतवादामुळे गमावलेले जीवन, आरोग्य रक्षण, प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारी, आभार मानणारी - रास्ताफारी आराधना, विवेकाची पातळी गाठणारी शमन, कथा सांगणाऱ्या सुवार्ता ऊर्फ गॉस्पेल, साम गायन असे कितीतरी प्रकार आहेत. त्याशिवाय 'हम होंगे कामयाब', 'रुक जाना नही तू कही हार के', 'एकला चलो रे' पासून झुंड सिनेमातील 'बादल से दोस्ती' पर्यंत अशी हिंदी तर 'मन शुद्ध तुझं' या कुंकू सिनेमातील गाण्यापासून 10 वी फ सिनेमातील 'शुद्धी दे, बुद्धी दे' अशी कैक आत्मविश्वास जागवणारी गीते शाळेच्या प्रार्थनेत घेता येऊ शकतात. देव न मानणाऱ्यांनी सुद्धा अंतरमनाला जागी करणारी गाणी लिहीली आहेत, त्या स्वतःलाच केलेल्या प्रार्थना आहेत. विविधतेने नटलेल्या या विस्तारलेल्या देशात माझाच देव, माझाच धर्म, माझाच प्रार्थना मार्ग खरा आणि इतरांचे देव, धर्म, प्रार्थना प्रकार खोटे अशी आडमुठी भूमिका घेऊ नये. परधर्म द्वेषावर आधारीत राजकारण करणे त्या त्या धर्मीयांना संकुचित करणारे आणि देशभरातील एकोप्याला नख लावणारे, सामूहिक आत्मघात करणारे ठरेल. अशा धर्मभाकडांपासून सावध रहायला हवे.

आकाशवाणी केंद्रावरूनही रोज लागणाऱ्या भक्ती संगीत या कार्यक्रमातून अशी विविध गायने नियमित ऐकवायला हवीत. आकाशवाणी केंद्रे म्हणजे सार्वजनिक शाळा आहेत. सर्वांना हा देश आपला आहे असे वाटण्यासाठी सार्वजनिक शाळा, सार्वजनिक स्थळे आणि सार्वजनिक सेवांमध्ये धार्मिक एकारलेपणा नको सर्वसमावेशकता ठेवायला हवी.

विनय र. र.

[email protected]

Updated : 30 Sept 2022 9:28 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top