वागळे, आपण मुद्द्यांवर बोलत राहू, ज्यांना ट्रोल करायचे त्यांना करू द्या: अजित अनुशशी
कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावरुन सध्या समाजमाध्यमांमधे आरोप-प्रत्यारोप सुरु असून ज्येष्ठ संपादक निखिल वागळेंनी अजित अनुशशी यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आता पुन्हा एकदा अनुशशींनी वागळेंना उत्तर दिले आहे.
X
माननीय निखिल जी,
आपण मुद्द्यांवर बोलत राहू, ज्यांना ट्रोल करायचे त्यांना करू द्या. अर्थात ज्या पातळीचं खासगी आणि अश्लील ट्रोलिंग हे मोदीसमर्थकांकडून होतं, तसं तुम्हाला नक्की झालं नसेल हि आशा! बाकी अनेकदा संघी एजंट हा शब्दप्रयोग फार लाइटली केला जातो. माझ्यावर ही शिवी कोणी भिरकावल्ये हे ऐकलंत तर आश्चर्य वाटेल तुम्हाला. पण ते असो, व्यक्तिगत आहे, ते वैयक्तिक बोलू कधीतरी!
१. काँग्रेस पक्ष मरणासन्न आहे, हे आकडेवारीने पटण्यासारखं नाही. मोदी उदयानंतर राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश, या तीन राज्यात काँग्रेसने एकट्याने लढून भाजपाविरुद्ध सत्ता खेचून घेतली. मोदींच्या परसदारात गुजरातमध्ये पक्षाने भाजपच्या नाकातोंडाला फेस आणला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि झारखंडमध्ये योग्य आघाड्या करून सत्ता आणली. मणिपूर, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात भाजपाने खेळ उलटवला, हे खरं पण ते जनतेच्या दरबारात नव्हे तर सत्तेचा पाशवी वापर करून. अनेक भाजपा मंत्री एका वेळेला काँग्रेसवर आणि राहुलवर तुटून पडतात, बाकी कोणत्याच नेत्यावर नाही, ते म्हणूनच. काँग्रेस कमकुवत आहे, पण थोडं विनोदाने सांगायचं तर, रॉकी बाल्बोआसारखी परत परत मार खाऊनही लढायला उभी आहे, शेवटच्या राउंडला खेळ पालटवू शकते, याची भीती त्याही नेत्यांना आहे, तीही म्हणूनच.
बरं काँग्रेसमधून टीका करणारे नेते कोण? मी यापूर्वीच्या एका पोस्टमध्ये हे सविस्तर लिहिलेलं होतं. काँग्रेसचा उरलेला जनाधार ज्या नेत्यांकडे आहे, मग ते कॅप्टन अमरिंदर असो, गेहलोत किंवा कमलनाथ, हे परिवारासोबत ठामपणे आहेत. टीका कोणाकडून येत्ये? ज्यांचा राजकीय पाया दरबारी आहे किंवा आधीच्या पिढीपेक्षा विस्तारीत करू शकले नाहीत. त्यांचा जनाधार कमकुवत आहे. दुसरं म्हणजे यांना निवडून येणं कठीण जातं. तिसरं म्हणजे (एखाद्या पायलटचा आणि तोही जेमतेम दोन वर्षांपूरता अपवाद वगळता) यातलं कोणीही सत्ता नसताना पक्षासाठी फारसं काम करताना दिसत नाही.आणि पक्षांतर्गत टीका तर काँग्रेसमध्ये कायमच होत आल्ये. भाजपात ती सहन न करता काढून टाकतात आणि आयाबहिणींवर ट्रोल करतात. तेव्हढी वाईट अवस्था काँग्रेसमध्ये वर्तमानात तरी होत नाही.
२. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, ते दोन कारणांमुळे... एकतर असं कि जी व्यक्ती ९ संस्था मॅनेज करते, ती दहावी आणि सगळ्यात महत्त्वाची यंत्रणा निष्पक्ष राहू देईल, हे अतार्किक आहे. याबद्दल इव्हिएमच नव्हे तर अनेक मुद्द्यांवर यापूर्वी वाद/कोर्टबाजी झालेली आहे आणि ती सलमानच्या खटल्यासारखीच निरुपयोगी ठरलेली आहे. दुसरं असं कि २०१७ उत्तर प्रदेश विधानसभा असो, २०१९ लोकसभा किंवा २०२० बिहार, प्रत्येक वेळेला जमिनीवर भेट देऊन येणाऱ्या तद्न्यांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांच्या अपेक्षा चुकीच्या ठरतात, हा फारच अजब योगायोग आहे. त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावे हे निवडणूक प्रक्रियेत हेराफेरी असल्याचेच दिसतात.
अश्या वेळेला नेहमी हा प्रश्न येतो, कि मोदीविरोधक जिंकतात, तेव्हा काय? एक लक्षात घेऊया. सदोष ईव्हीएमपासून हस्तक्षेप करणाऱ्या डीएमपर्यंत सर्व यंत्रणेची ढवळाढवळ १०० टक्के मतं एका पक्षाला जाण्यासाठी नसते. कोणत्याही क्षणी निवडणुकीत 'मॅनेज' होतात, ती काही ठराविक टक्केच मतं. आता विरोधकांनी या मतांच्या पलीकडे जाऊन बहुमत मिळवलं, तर मात्र निकाल विरुद्ध जाऊ शकतो. या परिप्रेक्ष्यातून पाहीलं तर गेल्या सात वर्षातल्या अनेक निकालांबद्दलच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष निकाल, यांच्यात सांधेजोड करता येईल.
३. काँग्रेसचे टीकाकार नेहमीच एक आकर्षक युक्तिवाद करतात. आम्हाला काँग्रेसकडूनच आशा आहे, हा तो युक्तिवाद! आता काँग्रेस मरणासन्न आहे म्हणायचं, नेतृत्त्व निकामी आहे समजायचं, तर मग आशा कशाला ठेवायची? फक्त टीकेला सोयीची म्हणून?
पण मोदी लाटेत सगळ्याच पक्षाची अवस्था कठीण आहे, या युक्तिवादाचं कारण समजून घ्या. वस्तीत एकच बिल्डिंग पडली तर बांधणाऱ्याला दोष देता येतो. सगळ्याच इमारती हलत असतील, तर कारण सार्वत्रिक आहे, हे लक्षात घ्यायला हवं. मोदीलाटेने, मग ते निवडणूक निष्पक्ष असो का नसो, सर्वांचीच अवस्था बिकट केल्ये. तेव्हा त्याच्याशी मुकाबला करताना एकट्या काँग्रेस नेतृत्त्वाला दोष देत राहिलं, तर अभ्यास पूर्ण होणार नाही!
४. अण्णांवर माझा विशेष राग आहेच. एडमंड बर्क म्हणतो तसं समाजाला कोरा चेक समजून स्वतःच्या नैतिक गुर्मीत त्यावर वाट्टेल ते खरडायला निघालेल्या प्रत्येक स्वयंघोषित महात्म्यावर माझा रागच आहे. पण तो विषय इथे नको वाढवूया.
त्यांचं आंदोलन विवेकानंद फाउंडेशनने कसं 'उत्स्फूर्त' आयोजित केलेलं होतं, त्याचे किस्से आजही जाणकार रंगवून सांगतात. पण कहीसुनी सोडून देऊ. त्यांच्या आंदोलनातून केजरीवाल सोडून बाकी सगळे आज मोदींच्या कोअर टीममध्ये (निव्वळ भाजपात नव्हे!) आहेत, यात तुम्हाला फक्त योगायोग दिसतो? वर्षानुवर्षं काँग्रेस व परिवारातल्या पक्षांविरुद्ध नेमकं आंदोलन छेडणारे अण्णा काँग्रेसने भाजपाकडे नेऊन सोडले??? हे काही पटणारं नाही!
५. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ. भारतातच काय, जगात सर्वत्र, राजकीय पक्षांची एक भूमिका असते आणि अधूनमधून तरी त्यापेक्षा विपरीत कृती असते. तशी काँग्रेसचीही आहे आणि त्याबद्दल त्यावर सडकून टीका करावी. मी स्वतः मुस्लिम समुदायाच्या विषयाची हाताळणी काँग्रेसने चुकीची केली असं मानतो. पण त्या टीकेच्या भरात तुम्ही इतके टोकाला जाता की थेट भाजपाच्या जोडीला काँग्रेसला बसवता. मग त्या भरात 'आंबेडकरांच्या पाठोपाठ' दलित काँग्रेसपासून दूर गेले. किंवा १९९१नंतर काँग्रेसची सतत अधोगती होत आहे, अशी अनैतिहासिक विधानं, तुमच्यासारखा कसलेला पत्रकार करायला लागतो. यातल्या कोणत्याही विधानाला आकड्यांचे आधार नाहीत. उलट लव्ह जिहादच्या कायद्याविरुद्ध तात्काळ प्रतिक्रिया राजकीय परिघात गेहलोतांनी दिली, हेही आपण लक्षात ठेवू. किंबहुना 'गर्व से कहो, हम सेक्युलर है', असं म्हणायला सध्या काँग्रेस व्यतिरिक्त फक्त राजद तयार आहे आणि त्यातही काँग्रेसची मुस्लिम व्हॉटबँक नाही, हे ध्यानात ठेवायला हवं. बाकी सेक्युलॅरिझम वाचवायला, दलाली/लाचारी/भ्रष्टयाचार वगैरे होत नसलेले कोणकोणते पवित्र पक्ष तयार आहेत, हे आपण सर्वांना सांगा, म्हणजे आम्हीही त्यात सहभागी होऊ…!
६. कुमार केतकर काय म्हणतात, त्याचा प्रतिवाद करायला ते (माझ्याहून जास्त) समर्थ आहेत. पण तुमचं जसं या विषयातलं चाळीस वर्षं लिखाण आहे, तसं त्यांचंही आहे. मी तुमच्या लिखाणाला 'विनोदी' अशी संभावना करून रद्दीत काढून टाकू शकत नाही, तुम्ही या पोस्टमध्ये त्यांना तसं काढून टाकलं तरी!!
पण तुमच्या ज्या पोस्टचा मी प्रतिवाद केला, त्यात फाळणीची कहाणी अर्धवट सांगितलेली होती, हे स्पष्ट सत्य आहे. ज्याला शंका आहे त्याने तुमची पोस्ट काढून पाहावी. बाईंनी ती मागे घेणं, सत्ता शांततामय मार्गाने सोडणं आणि परत सत्तेत येणं, हे तुम्ही त्या पोस्टमध्ये बरोबर गाळलेलं होतं.
७. आपण स्वतः ज्या डायनामाईट केसचा उल्लेख केला, ती काय घटनेच्या चौकटीत होती? आणि 'बेकायदेशीर' आदेश पाळू नका असं म्हणायचं म्हणजे सैन्य आणि पोलिसांनी काय आदेशातले कायद्याचे तपशील तपासायला घ्यायचे का? प्रत्येक अराजकतावादी असलेच आदेश देत असतो!
पण आणीबाणीच्या काळातून बाहेर येऊ. माझ्या पोस्टमध्ये मी एक नेमका प्रश्न विचारला होता, त्याला तुम्ही अजूनही बगलच दिलेली दिसत्ये. इथे परत टाकतो…
१९७३ ते ७५ हा काळ आणि २०१४ ते २०२० या काळात आपल्याला गुणात्मक, संख्यात्मक फरक काही दिसतो?
हा दिसत नसेल तर मग वादाची दिशाच वेगळी होते. मग या मुद्द्यावर तुम्ही भाजपाईंशी सहमत होत आहात, असं म्हणावं लागेल. आणि दिसत असेल, तर आत्ता कशावर अधिक भर द्यावा? हे ठरवूया. राजकारण, नेते, पक्ष, हे प्रवाही असतात. 'तेव्हा' असं केलं तर 'आता' काय बोलणार, असले प्रश्न पडायला लागले, तर कोणालाच आयुष्यात काहीच भूमिका घेता येणार नाही. हां, ज्यांना व्यावहारिक सत्ता आणि प्रशासनात सहभागी व्हायचं नाही, त्यांना सार्वत्रिक सुसंगतेची चैन परवडते.
८. मोदी शहाविरुद्ध हिंसक-अहिंसकपणे लढायची आपण तयारी दाखवली, म्हणून आपल्या आंदोलनातल्या सहभागाविषयी विचारलं. राजकीय परिघावर गेल्या सहा वर्षात नोटबंदीचा विरोध, जीएस्टीविरुद्ध निषेध, कर्जमाफीची मागणी, शेतमालाला भाव मिळण्याची आंदोलनं, असे अनेक विषय झाले. यात राहुल आणि काँग्रेस अग्रणी होती. भावाढीपासून ते राफेलपर्यंत अनेक विषयांवर पक्षाने भूमिका घेतली आणि आपल्या कमकुवत स्थितीतही लढे लढले. ते पुरेसे नाहीत हे जितकं खरं तितकंच हेही खरं की पक्ष काहीच करत नाही, असं बिलकुल नाही. किंबहुना पुनः एकदा इतर कोणत्याही पक्षाहून जमिनी लढे काँग्रेसने अधिक लढलेले आहेत, हे लक्षात घेऊ.
पण सर, एक पत्रकार म्हणून भाजपचं आर्थिक कु-शासन किती माध्यमांनी (अगदी मोदींना अनुकूल नसलेल्याही) चर्चेला आणलं. मोदी शहा कित्ती कित्ती २४ तास राजकारण करतात, हे सांगणाऱ्यांनी पन्नाप्रमुख सारख्या गावगप्पांवर किती स्टोरी केल्या? 'उत्तम संघटन'असूनही पिंपरी पासून माणिपूरपर्यंत आयात उमेदवार भाजपला का लागतात, यावर किती प्रश्न उठवले?
आपल्या अंगभूत शैलीनुसार संघ, भाजपाच्या क्षमतेविषयी भलत्याच आवया उठवतो आणि आपण दुर्दैवाने त्या खऱ्या मानायला लागतो. २००९ ला काँग्रेसची कामगिरी सुधारली तेव्हा नाही कोणी सोनिया गांधींच्या कामाचे तास विचारले? या असल्या कहाण्यांनी आपण भाजप narrative अधिक मजबूत करतो आहोत.
९. काँग्रेसने नेहरूंच्या काळापासून संघाला केलेली मदत आणि (आपल्या मूळ लेखात) दिलेली 'प्रतिष्ठा', हे आपण सप्रमाण सांगाच!पण गांधीच काय, मुखर्जींनीही संघाला कोणतंही प्रमाणपत्र दिल्याचं आमच्या ऐकिवात नाही, तेही तुम्ही मांडून टाका.
१०. मी स्वतः काँग्रेसमध्ये नाही. व्यक्तिगत मजबुरींमुळे मी ही लढाई लढत नाही, हे माझं दौर्बल्य आहे. आणि मी ते तसं मान्य करतो. पण ही लढाई फक्त राजकीय मंचावर होऊ शकते, असं स्पष्टपणे दिसतं, राजकारणातल्या अंगभूत मर्यादा मान्य करूनही! आपण मोदी शहांविरुद्ध लढा लढू इच्छिता आणि अनेक नेत्यांसारखे बाजारू नाही, म्हणून काँग्रेसमध्ये यायचं आवताण दिलं. पण तुम्हाला काँग्रेस पसंद नसेल तर दुसऱ्या पक्षातून जरूर लढा. आमच्यासोबत नसाल म्हणजे आमच्या विरुद्ध आहात, असं सच्च्या काँग्रेसवाल्याला कधीच वाटत नाही. तेव्हा आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा….
-Ajit Anushashi