Home > मॅक्स ब्लॉग्ज > अग्रलेख > संयमी नेता, उत्कृष्ट संघटक : डॉ. नरेंद्र दाभोलकर - सुभाष वारे

संयमी नेता, उत्कृष्ट संघटक : डॉ. नरेंद्र दाभोलकर - सुभाष वारे

संयमी नेता, उत्कृष्ट संघटक : डॉ. नरेंद्र दाभोलकर - सुभाष वारे
X

डॉ. दाभोलकरांची निर्घृण आणि भ्याड हत्या होऊन आठ वर्षे झालीत. पण तरीही या घटनेचे गांभीर्य जराही कमी होत नाही. दाभोलकरांच्या हत्येने आपले स्वत:चे, चळवळीचे व समाजाचे किती आणि कशा प्रकारचे नुकसान झाले आहे, हे आजही जास्तच तीव्रपणे जाणवत रहाते.

समाजासमोरील, राष्ट्रासमोरील अनेक प्रश्न अधिक गंभीर बनत चाललेत. समस्यांचा गुंता अधिक वाढतोय. पूरोगामी चळवळीसमोरील आव्हानेही त्याच प्रमाणात वाढत असताना, पुढे जाण्याची वाट अधिक धुसर होत असताना, काय करावे व कसे करावे याचा गोंधळ मनात वाढत असताना नेहमीच्या सवयीने जरा डॉ. दाभोलकरांना विचारून बघू या का, काय आणि कसे करावे ते- असे सहजपणे मनात येऊन जाते आणि फोनकडे हात जातो... पण अचानक लक्षात येते की दाभोलकरांना तर संपवलय विवेकाच्या मारेकऱ्यांनी. आता दाभोलकर नाहीत चर्चेसाठी उपलब्ध. आता आपल्याला सामुहिक चर्चेतून आणि सामुहिक कृतीतूनच वाट काढावी लागणार आहे.

वैयक्तिक जीवनातील आचार-विचाराबाबतचे त्यांचे स्पष्ट विचार आणि त्यासाठीचा तितकाच आग्रह यामुळे त्यांच्या हयातीत त्यांचा वाढदिवस कधी साजरा झाला नाही, इतर अनेक नेत्यांची होते तशी षष्ठ्यब्दीही साजरी झाली नाही. त्यामुळे 26-27 वर्षे त्यांच्याबरोबरचा संपर्क आणि संवाद असूनही त्यांचे नेमके वय मला कधीच समजले नाही. त्यांची जन्मतारीख सुध्दा त्यांच्या खुनानंतर वर्तमानपत्रवाल्यांनी छापली, तेव्हाच समजली. चळवळीच्या कामातील शिस्त व्यक्तिगत जीवनालाही असल्याने 68व्या वर्षीही त्यांचा उत्साह, चपळपणा तरुणांना लाजविणारा होता.

त्यांच्या खुनानंतर एक कार्यकर्ता म्हणाला होता, दाभोलकर दर सोमवारी- मंगळवारी 'साधना'च्या कामासाठी पुण्याला न चुकता असायचे आणि मंगळवारी सकाळी व्यायामासाठी बाहेर पडायचे म्हणजे पडायचेच, ही शिस्तच त्यांचा घात करून गेली. त्या मंगळवारी थोडा आळस करून ते व्यायामाला बाहेर पडलेच नसते तर... या 'जर-तर'ला आता अर्थ नाही आणि इथे नाही तर आणखी कुठे तरी असे घडले नसते, असे थोडेच आहे? पण एक नक्की- कार्यक्रमासाठी बाहेरगावी पहाटे पाचला निघायचे असेल तर दाभोलकर पहाटे साडेतीनला उठायचे, पण व्यायाम कधीही चुकवायचे नाहीत; मग आदल्या रात्री कितीही उशिरा घरी आलेले असोत. त्यांची गुणवत्ता ही त्यांच्या अंगभूत प्रतिभेसोबतच या प्रकारची शिस्त, चिकाटी आणि मेहनतीतून निर्माण झाली होती. कार्यक्रमाला बसल्यावर कितीही ज्युनिअर कार्यकर्ता बोलत असला, तरी त्यांच्या हातात वही-पेन असणारच आणि त्याच्या बोलण्यात एखादा महत्त्वाचा मुद्दा आला की, तो टिपून घेणार.

प्रत्येक वेळी हा माणूस भेटायचा तेव्हा त्याच्या प्रतिभेची, प्रश्न समजून घेण्याची आणि नावीन्यपूर्ण कार्यक्रम सुचविणाऱ्या कल्पकतेची नवीच उंची समोर यायची. अनेक क्षेत्रांतील त्यांच्या गुणवत्तेचे अशा टोकदारपणे दर्शन व्हायचे की, अशा वेळी तुम्ही खुज्या मनोवृत्तीने विचार करणारे असाल, तर तुमच्या मनात असूया निर्माण व्हावी आणि तुम्ही उमद्या स्वभावाचे असाल, तर 'गड्या, आपल्यालाही यांच्यासारखं जमायला हवं,' अशी सकारात्मक इर्ष्या मनात निर्माण व्हावी. पुरोगामी, समाजवादी चळवळीजवळ साधनांची वानवा ही नेहमीचीच. डॉ. दाभोलकर 68व्या वर्षीही शक्य तेवढा प्रवास एस.टी. बसने, रेल्वेने करायचे. शहरातल्या शहरातही शक्य तिथे पायी फिरायचे.

कार्यक्रम/उपक्रमांचे आयोजन करताना कमीत कमी संसाधनांच्या आधारे जास्तीत जास्त परिणामकारकता साध्य करण्याची त्यांची हातोटी हे त्यांचे खास वैशिष्ट्य. या त्यांच्या प्रभावी संघटनकौशल्याचा अनुभव सामाजिक कृतज्ञता निधीच्या उभारणीच्या वेळी सर्वांनी घेतला. सामाजिक कृतज्ञता निधी उभारणीसाठी योगदान बाबा आढाव, श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आणि अशा सर्वांचेच. पण 'लग्नाची बेडी' नाटकाच्या प्रयोगांचे महाराष्ट्रभरातील दौऱ्याचे नियोजन असो की, 'एक उपवास कृतज्ञतेचा' या अभिनव उपक्रमातून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांकडून निधी जमा करण्याचे नियोजन असो; डॉ. दाभोलकरांनी घेतलेली मेहनत आणि केलेले तपशीलवार व काटेकोर नियोजन आजही सर्वांच्या लक्षात आहे.

डॉ. दाभोलकर हे राष्ट्रीय पातळीवरचे कबड्डीपटू, व्यवसायाने डॉक्टर. सुरुवातीच्या काळात समाजवादी युवक दल या ॲक्शन ग्रुपच्या माध्यमातून त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली. 1985च्या आसपास अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी त्यांनी नातं जोडलं. त्याच काळात विषमता निर्मूलन चळवळीतून कल्पना पुढे आलेल्या 'सामाजिक कृतज्ञता निधी'ची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाची व्यापकता ही हळूहळू विकसित होत गेलेली आहे आणि डॉ. दाभोलकरांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भताही त्या निमित्ताने महाराष्ट्रासमोर येत राहिली. त्यातूनच सानेगुरुजींनी सुरू केलेल्या आणि समाजवादी विचारांची भक्कम परंपरा असलेल्या साधना साप्ताहिकाचे संपादकपद त्यांच्याकडे चालत आले. साधनाची जबाबदारी त्यांनी स्विकारल्यावर 'साधना'ची पाने वाढली, तितक्याच गतीने आतल्या मजकुराची गुणवत्ताही वाढली.

पुरोगामी समाजपरिवर्तनाच्या दिशेने समाजाची वाटचाल व्हायची असेल, तर समाजातील निरर्थक कर्मकांड व अनिष्ट प्रथांना आव्हान द्यावे लागणार. या कर्मकांड आणि प्रथांना जर धर्मश्रद्धेचा आधार आहे असे हितसंबंधी लोक मांडत असतील, तर मग अशा मतलबी धर्मकल्पनेची चिकित्साही आवश्यक बनते. अशी वाटचाल अंनिसला करावी लागली. दुसऱ्या बाजूला जात या संकल्पनेला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याने जात हीच सर्वांत मोठी अंधश्रद्धा आहे, असे मानून जाती-अंताचा लढाही अग्रभागी आणावा लागतो. त्यासाठीच त्यांच्या सार्वजनिक जीवनाच्या अगदी शेवटी-शेवटी डॉ. दाभोलकर हे 'जातपंचायतीला मूठमाती द्या' या अभियानात सक्रिय झाले होते. दाभोलकर काम करत होते त्या वेगवेगळ्या संस्था, संघटना पुरोगामी समाजपरिवर्तनासाठीचा एक-एक विषय हाताळत होत्या.

दाभोलकर स्वत: मात्र त्यातून एकत्रितपणे एका समग्र अशा व्यवस्था-परिवर्तनाचा विचार पेरत होते.

अतिशय आक्रमकपणे आणि जोरजोरात बोलणारे किंवा मधे मधे टाळ्याखाऊ वाक्ये पेरणारे वक्ते आपल्या आजूबाजूला बरेच दिसतात. डाॕ. नरेंद्र दाभोलकर हे त्या पठडीतले वक्ते नव्हते. ते अतिशय शांतपणे आणि मुद्देसूदपणे बोलायचे. त्यातून समोरच्याच्या मनातील विचार प्रक्रियेला चालना मिळायची. त्यांच्या बोलण्यात कुणावरही व्यक्तीगत टीका नसायची. कुणाची निंदानालस्ती तर कधीच नाही. तरीही डाॕ. नरेंद्र दाभोलकरांना संपवलेच पाहिजे असे त्यांच्या खुन्यांच्या सूत्रधारांना का वाटले असावे? शांततेतली ताकद हे त्यापाठीमागचे कारण स्पष्ट आहे. डाॕ. नरेंद्र दाभोलकरांच्या संवादशैलीची परिणामकारकता जबरदस्त होती. संबंधित विषयाबाबतच्या श्रोत्यांच्या मनातील केवळ शंका कुशंकाच नव्हे तर भितीसुध्दा घालवत, गैरसमज दूर करत त्यांचे संभाषण त्याच्या मनातील चिकित्सक प्रवृत्तीला जागे करायचे आणि मग श्रोत्यांच्या मनात विवेकी विचारांचा जागर सुरु व्हायचा जो त्यांना स्वप्रेरणेने विवेकाच्या रस्त्यावर पुढे पुढे चालायला मदत करायचा. दाभोलकर अनेक विषयांशी आणि संस्थांशी संबंधित काम करायचे. पण स्वाभाविक आहे की अंधश्रध्दा निर्मुलनाच्या कामाबरोबर त्यांची ठोस बांधिलकी होती. हे काम तसे संवेदनशील काम. लोकांच्या भावना आणि अस्मितासुध्दा या विषयात गुंतलेल्या असतात. अंधश्रध्दा निर्मुलनाचा विषय एका टप्प्यावर धर्मविषयक परंपरांच्या चिकीत्सेकडे जातोच. मानवी जीवनाबद्दलची अनिश्चितता आणि असुरक्षितता माणसाला सतत भयभित करत असते, चिंतेत टाकत असते. या भितीचा पध्दतशीरपणे लाभ उठविणारी यंत्रणा त्या त्या धर्मातील पूरोहितशाहीच्या रुपाने कार्यरत असते. पूरोहितशाहीला धर्माचा चिरंतन भाग असलेल्या नैतिक शिकवणूकीशी देणेघेणे नसते. स्वतःच्या उपजिविकेचे साधन म्हणून रुजवलेल्या कर्मकांडाशी त्यांची अधिक बांधीलकी असते. लोकांच्या मनात विवेकी विचारांची पेरणी सुरु झाली की समाजमनावरील निरर्थक कर्मकांडाचा पगडा हळूहळू दूर होऊ शकतो. म्हणूनच दाभोलकरांची शांत आणि संयत संवादशैली धर्माच्या ठेकेदारांना अडचणीची ठरली असणार.

एवढी प्रचंड क्षमता आणि गुणवत्ता असूनही कार्यकर्त्यांशी बोलताना-वागताना हा माणूस अंगभूतपणे लोकशाहीवादी होता. आपला मुद्दा समोरच्याच्या गळी उतरविण्यासाठी ते आर्जवी पद्धतीचाच वापर करायचे. त्यांना कधी चिडचीड करताना, रागावताना कोणी पाहिलेच नाही. स्वत:च्या क्षमतेवर प्रचंड विश्वास असलेल्या माणसाला रागवावेही लागत नाही आणि चिडचिडही करावी लागत नाही. आपल्यासोबत चार पावले चालणाऱ्या कार्यकर्त्याचाही ते तेवढाच सन्मान करीत. कारण चार पावलं चालू शकणारे आणखी दहा कार्यकर्ते जमवून मोठं काम पार पाडण्याची हिंमत त्यांच्यात होती.

अशा लाख मोलाच्या माणसाची भ्याडपणे हत्या केली गेली. धर्मांधांनी डाव साधला. केवळ मतांच्या राजकारणाचा विचार करून सर्व काही करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी ते जाईपर्यंत त्यांची उपेक्षा केली, हा सल मनात सतत राहील. लढाई मोठी आहे याचे भान आहेच. गौतम बुद्धांपासून सुरू झालेल्या या लढाईत संत तुकारामांसहित अनेकांचे बळी गेले आहेत. लढाई अवघड असली तरी पूरोगामी विचार पुढे सरकतो आहे याची अनेक उदाहरणे दाभोलकर स्वतःच द्यायचे. ती सकारात्मकता जपत परिवर्तनाची गती वाढवावी लागेल. दाभोलकरांनी त्यांचे काम केले, आता आपली पाळी आहे. शिस्त आणि मेहनतीच्या आधारे स्वत:च्या अंगभूत क्षमतांचा कमाल पातळीपर्यंत विस्तार आपल्यापैकी प्रत्येकाला करावा लागेल. एकमेकाचे हात सतत एकत्र गुंफलेले असतील हे पहावे लागेल. परस्परपूरकता वाढवावी लागेल. सामूहिक कर्तृत्वामधून विवेकाचा आवाज बूलंद करावा लागेल. परिस्थितीने आपल्यावर टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभवण्याचा निर्धार हे नरेंद्र दाभोलकरांना आठव्या स्मृतीदिनी सच्चे अभिवादन ठरेल.

Updated : 21 Aug 2021 3:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top