बाबा, स्वामी, बापू, सद्गुरू, श्रीश्री, योगी आणि त्यांचे निष्पाप किंवा बनेल भक्त
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात झालेल्या उष्माघाताच्या बळीनंतर देशातील बाबा, बुवा, स्वामी, बापू सद्गुरू, श्री श्री, योगी यांची चर्चा सुरू झाली. पण या बाबा, बुवा, स्वामी, सद्गुरू यांचा व्यवसाय काय असतो? यामध्ये निष्पाप भक्त कसे तयार होतात? याविषयी ज्येष्ठ लेखक सुनिल सांगळे यांनी परखड विश्लेषण केले आहे.
X
या विषयावर लिहिणे म्हणजे अनेक लोकांच्या श्रद्धांना (किंवा अंधश्रद्धांना) दुखावणे आहे याची कल्पना आहे. पण परवाच्या खारघर (Kharghar heat stroke) प्रकरणात ज्याप्रकारे साधेसुधे मध्यमवर्गीय लोक हकनाक उन्हात तडफत मेले, त्यामुळे लिहावेसे वाटते. आपला देश हा हजारो वर्षांपासून धार्मिकच आहे आणि त्यामुळे असल्या स्वामी, बाबा, बापू, माता इत्यादींची फौज या देशात गावागावात दिसून येते. यांची कार्यपद्धती काय असते?
या धार्मिक नेत्यांचे वेगवेगळे स्तर असतात. गावपातळी ते थेट आंतरराष्ट्रीय स्वामी (International Swami), योगी, इत्यादी. राज्य पातळीपर्यंत स्थानिक भाषेत संवाद साधणे हे ठीक असते. पण देशपातळीवर किमान हिंदीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाबा बनायचे असेल तर मात्र इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. याची अनेक उदाहरणे देता येतील. ओशो, डबल-श्री रविशंकर (जाता जाता माहिती: नेपाळ नरेश हे ५ श्री लावतात आणि त्यांना 'पंचश्री सरकार' असे म्हणतात), सध्याचे सद्गुरू जग्गी, इत्यादी गुरु हे इंग्रजीवरील प्रभावी वक्तृत्वाशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊच शकले नसते. ज्यांचे शिक्षण कमी, बुद्धी कमी, अभ्यास कमी, वक्तृत्व कमी, त्यांची प्रगती कमी, हे करियरचे सूत्र इथे तंतोतंत लागू पडते.
याच पातळीनुसार प्रत्येकाचे क्लाएंट वेगवेगळे असतात आणि त्यानुसार आर्थिक मिळकत कमी असते. उदा.गावपातळीवरील किंवा तालुका पातळीवरील बाबाचे भक्त अतिश्रीमंत नसतात आणि त्यानुसार त्यांची मिळकत देखील कमी असते. राज्य आणि देशपातळीवरच्या स्वामींच्या भक्तांची संख्या अर्थात मोठी, त्यात श्रीमंत, अतिश्रीमंत असू शकतात आणि त्यामुळे ते मग ट्रस्ट वगैरे स्थापन करून, सीए, ऑडिटर ठेवून आपापल्या संस्थानांची योग्य कायदेशीर काळजी करतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बाबाचा पसारा याहूनही मोठा आणि त्यांचे आर्थिक व्यवहार देखील शेकडो कोटीत असतात. सत्य साईबाबा यांचे अनुयायी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री, गावस्कर-तेंडुलकर यांच्यासारखे खेळाडू, मंगेशकर कुटुंबियांसारखे घराणे असे व्हीव्हीआयपी लोक होते. त्यांच्या चमत्काराचा पर्दाफाश कॅमेऱ्यासमोर झाला आणि त्याची व्हिडीओ कॅसेट अंनिसवाले शंकरराव चव्हाण यांना दाखवायला घेऊन गेले, तेंव्हा त्यांनी त्यांना भेटच नाकारली हे अंनिसच्या पुस्तकात नमूद आहे. नाणीजच्या स्वामींची अंनिसवाल्यांनी समोरासमोर काय हालत केली ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. पण त्यांचा संप्रदाय आजही खूप मोठा आहे.
या बाबा, स्वामी, गुरु, सद्गुरू, महाराज इत्यादीं होण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागते? यात काही समान गोष्टी दिसतात. सर्वप्रथम यशस्वी बाबा इत्यादी होण्यासाठी आपले धर्मग्रंथ, भगवद गीता, रामायण, महाभारत, पुराणे इत्यादींचा अभ्यास करावा लागतो. महाभारत आणि पुराणे ही गोष्टींचा खजिना आहेत. चांगली स्मरणशक्ती असेल तर त्यातल्या अनेक मनोरंजक गोष्टी सांगून फड मारून नेता येतो. वक्तृत्व चांगले हवेच. याशिवाय संस्कृत येणे हे वरच्या स्तराचा स्वामी होण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. मग गीता, उपनिषदे यांच्यातील श्लोक फाडफाड बोलून श्रोते चितपट होतात. कारण चांगले संस्कृत येणारी जमात आता एक दोन टक्केच उरली असेल. याशिवाय अतिरिक्त पात्रता म्हणजे, महाराष्ट्रात राज्यस्तरीय बाबा होण्यासाठी सगळे संत साहित्य नीट माहिती असणे आवश्यक आहे. इथे गाडगेबाबा, तुकडोजी महाराज उपयोगी नाहीत, कारण ते पोटावर पाय देणाऱ्या गोष्टी सांगून गेलेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि इतर प्रसिद्ध संत यांच्या ओव्या, कविता, इत्यादी पाठ असल्या तर महाराष्ट्रात भागून जाते.
या सगळ्या स्वामी, बाबा लोकांचा दुसरा अत्यंत चलाखीचा उद्योग म्हणजे आपल्या कमाईतील पाच दहा टक्के रक्कम ते खरोखरच समाजोपयोगी कामासाठी खर्च करतात. आपल्या भक्तांना दाखविण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. गरीब विद्यार्थ्यांना वही-पुस्तके वाटप करणे, अपंगांना मदत करणे, संस्थांना देणग्या देणे, वृक्षारोपण करणे, छोटी-मोठे दवाखाने सुरु करणे, रुग्णांना मदत करणे, ऍम्ब्युलन्स सेवा देणे, इत्यादी गोष्टी हे लोक मोठा गाजावाजा करून करतात. मुंबईतील एक सुप्रसिद्ध बापूंचे अनुयायी फक्त गणेशोत्सवात चौपाट्यांच्या जवळ ट्रॅफिक नियोजन करत असतात आणि त्यांच्या जवळ बापूंचे फलक वगैरे असतात. एरवी वर्षभर ते कुठेच दिसत नाहीत. म्हणजे जेव्हा सगळ्या चॅनेलचे कॅमेरे थेट चित्रीकरण दाखवत असतात, लाखो लोक रस्त्यावर फिरत असतात, तेंव्हा हे बापू स्वतःची प्रसिद्धी करून घेत असतात. बिचाऱ्या त्यांच्या स्वयंसेवकांच्या हे गावीही नसते. असे स्वामी बापू वगैरे लोक त्यांच्या प्रवचनाच्या जागी अनेक वस्तू (उदा. रुद्राक्ष, कुंकू, बत्तासे, छोट्या मूर्ती, कि-चेन, लॉकेट्स, इत्यादी) बाजारभावापेक्षा १०/२० पट महाग विकत असतात. उदा. हे मुंबईतले बापू १० रुपयाचे प्लास्टिकचे बॉलपेन ८० रुपयाला २००४ साली विकायचे. त्यांच्या भक्ताला असे का? असे विचारले, तर त्याने सांगितले की हाच नफा तर आम्ही समाजोपयोगी कामासाठी वापरतो. यावर काय बोलणार? हा झाला निष्पाप भक्त! या बापूंच्या पत्नीचा सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय होता आणि ते ही त्या ठिकाणी विकले जायचे. तरीही अनुयायी त्यांना विष्णू, पत्नीला लक्ष्मी आणि त्यांच्या सहकाऱ्याला शेषनागाचा अवतार मानतात म्हणे! याच बापूंचे असेच प्लास्टिकचे बॉलपेन खिशाला लावून फिरणारे अनेक उच्चपदस्थ अधिकारी पाहण्यात आले, जे अत्यंत तामस वृत्तीचे होते. असे बिलंदर भक्त लोक, फक्त आपण सात्विक आध्यात्मिक आहोत हे दाखविण्यासाठी बापुंचाच वापर करत असायचे.
२००३-२००४ साली माझ्या अनेक अधिकारी मित्रांच्या आग्रहावरून मी रविशंकर यांचा दहा की बारा दिवसांचा 'सुदर्शन क्रिया' प्राणायाम वर्ग केला. त्या काळी देखील त्याची फी चांगलीच महाग वाटली. प्रत्यक्षात वर्ग एका इमारतीच्या गच्चीवर (म्हणजे जागा फुकट) घेतला जाई आणि शिक्षक आणि स्वयंसेवक सगळे बिनपगारी अनुयायी होते. बॅच २०/२५ लोकांची, म्हणजे कमाई २००३ साली रु.४०,००० तरी असावी. असे शेकडो वर्ग मुंबईत चालत असावेत, मग देशात किती असतील? जर मेंदू शाबूत ठेवून विचार केला तर हे अध्यात्माचे अर्थकारण डोके सुन्न करून टाकेल. हेच रविशंकर आता फारच मोठे आंतरराष्ट्रीय स्वामी झालेत. रामदेव बाबा यांचा योग गुरु ते हजारो कोटींच्या औद्योगिक साम्राज्याचा मालक हा जेटच्या गतीने झालेला प्रवास तर सगळ्यांनाच माहित आहे. आसाराम बापू हे जेंव्हा ऐन भरात होते तेंव्हाही मुंबई-ठाण्यातील बिल्डर लोकांकडे केलेली त्यांची गुंतवणूक अनेक लोकांना माहिती होती. आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आणि अगदी तालुक्यातही त्यांच्या मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनी आणि आश्रम आहेतच. एखाद्या डिस्को सुपरस्टार सारखा राहणारा राम-रहीम बाबा आपल्याला फार उशिरा माहित झाला.
राजकारणी लोक अर्थातच अशा बाबा, स्वामी यांनाही वापरून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कारण लाखोंची संख्या ज्याला देवासमान मानते, असा एखादा बाबा हा त्यांच्यासाठी खूप मोठा मते देणारा स्रोत आहे आणि अशा बाबा-बापू लोकांना राजकारणी हा देखील खूप उपयोगी व्यक्ती आहे. कारण मोठ्या प्रमाणात जमिनी मिळणे, आश्रम स्थापन करणे, इत्यादी कामे त्याच्या सहकार्याने सुलभ होतात. अशी ही स्वामी-राजकारणी यांची Synergetic Relationship असते. हे सगळे बिनबोभाट सुरु असते. मग उगीच कधीतरी या संबंधापायी खारघरसारखा प्रकार घडतो आणि त्यावर काही दिवस चर्चा होते. पुढे या दोघांनाही याचा काही फरक पडणार नसतो, आणि अनुयायी तर काय? जे मेले ते आपल्या पूर्वकर्माच्या प्राक्तनापायी, त्यात 'स्वारींचा' काय दोष? असे म्हणून पुन्हा पुढच्या कार्यक्रमाला गर्दी करतीलच!