जागृत देवस्थान नावाचा झकास धंदा! रवि वाळेकर
छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तिरुपतीच्या दर्शनाला जाताना काढावी लागल्याचा प्रकार नुकताच व्हायरल झाला आहे. जागृत देवस्थानच्या नावाखाली काय चालतं? हे तिरुपतीला जाऊन अनुभवलेल्या लेखक रवी वाळेकर यांचा खळबळ जनक अनुभव..
X
परवाच तिरूपतीला जाऊन आलो. खुद्द देवाचे मनसोक्त म्हणजे एक दशांश सेकंदापर्यंत दर्शन झाले. कॅलेंडरात दिसतो ना अगदी तस्साच खराखुरा देव आहे! (तिथे खराखुरा देव आहे, हे मला कित्येक मित्रांनी कित्येक वेळा सांगितलयं) प्रत्यक्ष देवापर्यंत पोहोचणे एवढे सोपे झालेय, हे मला वेड्याला माहितीच नव्हतं. माझ्या विमान-प्रवास, हॉटेल, कारभाड्याच्या पन्नास-एक हजाराच्या खर्चाचे चिज झाले!
मी तसा आस्तिक नाही, पण पुर्णपणे नास्तिक बनण्याएवढी हिमंतही नाही. देवाचे दर्शन घेतल्याने मला वा देवाला बरे वाटो ना वाटो, पुर्वी आईला आणि आता बायकोला बरे वाटते हे मात्र पक्के माहिती आहे! देव आहे किंवा नाही, या विषयावर बोलण्याएवढा माझा आवाका नाही, ना पात्रता!
सरस्वतीची कधीच पुजा ना केलेले अब्दुल कलाम, शनिवारी कधी मारूतीला तेल ना वाहिलेला अरनॉल्ड, कधीही लक्ष्मीपुजन न केलेला बिल गेट्स मला माहितीये. ह्या लोकांनी जे कमवलयं ते स्वत:च्या कुवतीवर वा क्षमतेमुळे, पण कधी कोणा देवाच्या भरवशावर किंवा मदतीने नसावे.
त्यामुळेच तिरूपतीला लाखो लोकांचा समुदाय बघून मी थक्क झालो! कर्ज मंजुर झाले म्हणुन आलेल्यांपासून ते पार मुलाला अमेरीकेत जॉब मिळाला म्हणुन आलेले असंख्य लोक त्या गर्दीत होते! घटस्फोट मिळावा या पासून प्रेमप्रकरणी यश मिळावे, कोर्टात केस आपल्याच बाजूने निकाली निघावी वा विशिष्ट काॅलेजात अँडमिशन मिळावी यासाठी देवाला नवस बोलण्यासाठी आलेले हजारो, लाखो त्यात होते.
संध्याकाळपर्यंत ATM मोकळे व्हावे आणि थोडी अजून थोडी रोकडं हाती मिळावी, अशी माफक इच्छा बाळगणारा त्या भाऊगर्दीत बहुधा मी एकटाच होतो! सगळेच काही ना काही इच्छा घेऊन आले होते. मनगटातली धमक वा व्यवस्थेवरचा विश्वास कुठेतरी कमी पडतं होता. १० तले ८ जणं नवस बोलत होते. किंबहूना त्यासाठीच तर ते आले होते. त्या नवसात एक प्रकारची दयनीयता होती. फुले वाहतो, प्रसाद वाहतो, पैसे वाहतो, सोने वाहतो, 'मागण्या मान्य करं, देवा, तुला मी माझे केस वाहतो!'
लाच काय द्यावी हे सुद्धा ना कळणारी हतबलं जनता!
भलेभले देखणे पुरूष केस गेल्यावर बघवत नाहीत, इथे तर टक्कल करुन घेणाऱ्या जवळपास ४० टक्के बायका! टक्कल केलेला पुरूषच जिथे ओंगळवाणा वाटतो, तिथे बायंकाबद्दल तर बोलणंच नको. टक्कल केलेल्या या बायका, मुली तर अक्षरश: बघवत नाहीत.
बिभत्स हा शब्द सुद्धा सुंदर वाटावा!
लोकं हौसेने केशवपन करून घेत होते, शेकड्यानी असणारे 'केशकर्तनकार' (हो! उगा अँट्रासिटी नको!) ५-५ मिनिटातं प्रत्येकाला आनंदाने विद्रूप करतं होते! एवढा मुर्खपणा जगाच्या पाठीवर कुठे होत नसावा! बरं, केस वाहून मग दर्शन करावे कि दर्शन करून केस वाहावे, याबद्दल कुठेही एकवाक्यता नव्हती!
तुम्ही इंटरनेटवर शोधले तर असे समजेल, की तिरूपतीला सर्व काही मोफत आहे. राहुल गांधीला ४००० रुपयांची गरज पडते आणि मोदींमुळे गांधी खानदानातल्या या भल्या गरिबाकडे खर्चाला पैसेच नाही, एवढेच हे ही सत्य आहे!
सर्वच अमान्य नाही. सगळे फुकट आहे, पण तुमच्याकडे २-४ दिवस वेळ पाहिजे! पैसे नसतील तरं एकाच दिवसात भगवंताची कृपा शक्य नोहे! तुमच्याकडे पैसे असतील तर (आणि तरच) देव तुम्हाला लवकर दर्शन देईल. गरिबांचा हा देवच नाही.
जेवढे जास्त पैसे टेकवाल, तेवढे लवकर 'दर्शन'.
'काय? पैसे द्यायचे नाहीत? लायनीत लांब ऊभे रहा... माझ्या बायकोचे (लक्ष्मीचे) नातेवाईक आलेत! त्यांना अगोदर भेटावे लागेल!' देव खरतरं अस बोलणार नाही, असे मला वाटते. करणार काय बिच्चारा? तिथे अक्षरश: गुलाम झालाय!
घरी आलेल्या पाहुण्याला, 'सकाळच्या चहाचे ७ रूपये झाले बरं का! नाष्ट्याचे मिळून तुमचे अजुन ५६ होतील!' म्हणनारे तुम्ही असाल तर देवाचा 'प्रसाद' म्हणुन एका 'लाडू' साठी २५ रुपये मोजण्यासाठी तुम्हाला काहीच वाटणार नाही!
बरं, हे लाडु वाटणारे (आपल्यावरं ऊपकार!) आणि ते ज्या दगडी प्लॅटफॉर्मवर ते 'लाडू' ठेवतात,ते बघितले तरं, ज्या भल्या माता आपल्या मुलांना Hygienic चे महत्वं सांगतात, त्यांना फेफर आल्याशिवाय राहणार नाही!
तसा, एक 'प्रसाद' मोफत मिळतो, पिवळा भात वा मराठी 'साधी खिचडी' समान... १००-१२५ ग्रँम असावा, गरमागरम असतो, पण चमच्याशिवाय! भाजलेल्या बोटांनी खा अथवा गरमागरम घशात ढकला. एका पानांच्या द्रोणात तो देतात, पण तुम्ही भिकारी वा भिकारी सदृष्य वागलात / वाटलात तरच तो मिळेल! ' स्वच्छ भारत' मुळे लोक द्रोण शक्यतो इतस्ततं फेकत नाही, पण तो 'प्रसाद' सांडतोच. पण हा प्रसाद खा, सांडला तरी हरकत नाही, चपलेला चिकटणार नाही याची गॅरंटी!
कारण, चपला दुरवर कुठेतरी न सापडनाऱ्या स्टॉलवर ठेवायच्या असतात आणि पायाला चिकटणारा भात दुर्लक्षित करायचा असतो!
मोबाईल लांब २ किलोमिटर दूर जमा करायचा! का? माहिती नाही अन विचारायची सोय नाही. नंतर मंदिराच्या परीसरात जेव्हा पन्नास-एक फोटोग्राफर 'सरजी, बेष्ट फोटू, वन्ली हंड्रेड रूपीज' म्हणतं अंगावर येतात, तेव्हा 'सोय' कळते!
अजुन एक नवे फॅड म्हणजे पुरूषांनी 'धोती'च घातली पाहीजे! हा तसा नवा नियम आहे. नियम का? कारण मंदिराचे म्हणे, 'पावित्र्य' जपायचेय! गेटजवळचे शेकडो धोतीवाले (लुंगीवाले) व्यापारी या 'पावित्र्य जपण्या'ला मनापासून साथ देतात! किंबहूना त्यांचा धंदा व्हावा, याच साठी हा अट्टाहास आहे! अंतवस्त्र दिसेपर्यंत वर ओढून धोती घालून वा तीन फुटी डेनिम जिन्सवर फुटभराची लुंगी बांधून 'पावित्र्य' जपणारे हजारोत सापडतात!
एकदा (एकदाचं!) दर्शन झाले की तुमचे हाल कुत्र्ं खाणारं नाही! कमवायचे तेव्हढे कमावलेले असते, आता तुम्हाला विचारतोच कोण? बाहेर कसे पडायचे याचीच विवंचना असते!आत येताना शेकडो सुचना फलक आणि (३००, ५०० च्या लायनीत) हजारो पंखे! बाहेर काहीच नाही! या चक्रव्युहातून बाहेर कसे पडायचे हाच गहनं प्रश्न!
आपल्या चपला कुठे मिळतील, मोबाईल कुठे परत मिळेल हे आपले आपण शोधायचे! कसेबसे सापडलेच तर प्रत्येकाचे हात पुढे! 'आप्पका दस्स हज्जार का मोबैल संभ्भाल्ला, कुछ्छ त्तो दो!' (बहुधा माझ्या फोनची डेप्रेसियेशन कॉस्ट कमी करून बोलतं असावा!) याला 'मोफत सेवा' म्हणायचे!
पैसे...पैसे...पैसे!
मंदिराच्या मांडवात हुंडीत पैसे टाकायला शेकडोंची रांग! मुळ हुंडीपासून थोडी दुर पण मंदिराबाहेर असणाऱ्या हुंडीकडे कोणी ढुंकून बघेना! जणु हा देव त्या बाहेरच्या हुंडीतली देणगी मान्यच करंत नाही!
तिरूमलाला हुंडीत टाकायला लाखो / करोडो आणलेले पण खाली तिरूपतीला काकडी घेताना अर्ध्या किलोमागे गरीब बाईशी ५ रूपयासाठी हुज्जत घालनारे, मुलांसाठी ६०० रूपयाचे पिझ्झा घेऊन ड्रायव्हरला ५० रूपये देऊन ' खाना खाके, एक घंटे मे इधरही खडा रेहना' म्हणनारे, 'पांच क्या सात देता, जल़्दी दरशन करवा दे, साले' म्हणुन एजंटांच्या अंगावर नोटांची गड्डी फेकणारे, टिळा लाऊन ५-१० रूपये कमावणाऱ्या लहान लहान गरीब पोरांना हुडूत करणारे, महामुर गर्दीचा ''मनसोक्त' फायदा घेणारे, या देवाला दिसत नाही काय?
का रे बाबा, डोळ्यावरं कातडं ओढलयं?
किंबहूना तु खरचं आहेस की नाही तिथे?