Home > मॅक्स ब्लॉग्ज > मिलिंद नार्वेकरांनी केले ते सर्व राजकारणी करणार का?

मिलिंद नार्वेकरांनी केले ते सर्व राजकारणी करणार का?

मिलिंद नार्वेकरांनी केले ते सर्व राजकारणी करणार का?
X

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी CRZ नियमांचे उल्लंघन करुन बांधलेला आपला बंगला स्वत: पाडून टाकला आहे. त्यांच्या या कृतीचे कायदेतज्ज्ञ एड. असीम सरोदे यांनी स्वागत केले आहे. तसेच इतर राजकारण्यांनीही आपापली अनधिकृत बांधकामे पाडावीत असे आवाहन केले आहे. असीम सरोदे यांनी काय म्हटले आहे ते पाहूया....

" CRZ - समुद्रकिनारा संरक्षण नियंत्रण नियमांचे सगळ्यांनी पालन करावे ही बाब नार्वेकरांनी दापोलीतील स्वतःचा बांगला पाडल्याने चर्चेत आली आहे. मिलिंद नार्वेकरांनी केले ते सर्व राजकारणी करणार का?दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर शिवसेनेचे नेते व उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःहून समुद्रकिनारा संरक्षण नियंत्रण नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप असणारा बंगला बुलडोझर लावून पाडून टाकला आहे. या कृतीबद्दल मिलिंद नार्वेकरांचे कौतुक केले पाहिजे.

कोणत्याही बेकायदेशीर कृत्याबद्दल तक्रार घेऊन संबधित यंत्रणा व नंतर न्यायालयातच जावे लागते ही परिस्थिती येऊ नये असे वाटते पण त्याचबरोबर शेवटी राजकीय लोकांनाही कायद्याचाच आधार घ्यावा लागतो ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. न्यायाचा तराजू सुद्धा अनेकदा राजकीय वजनाने वाकविला जातो व काही न्यायाधीशांनाही भ्रस्ट केले जाते त्यावेळी न्यायव्यवस्थेतील चुकांबद्दलही बोलावे लागते.

महाराष्ट्राला लाभलेला 320 ते 330 किलोमीटरचा समुद्र किनारा उध्वस्त करणारे, गोव्यात समुद्र किनारा आपल्या ताब्यात घेणारे अनेक राजकारणी अनेकांना माहिती आहेत. कुणाचेच अतिक्रमण, बेकायदेशीरपणा खपवून घेत नाहीत ते भारतावर प्रेम करणारे नागरिक असतात.

समुद्रच कशाला जमिनींवर राजकीय लोकांचे बेकायदेशीर अतिक्रम, भूखंड बळकावणे, जबरीने लोकांना त्यांच्या जागा विकायला लावणे हे प्रकार आहेत. अगदी नागपुरातील गजबजलेल्या निवासी भागापासून तर यवतमाळ, अकोला, अमरावती व जवळचे मूर्तीजापूर, जळगाव, सोलापूर, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नासिक ठाणे, सातारा या काही जिह्यांमध्ये राजकीय लोकांनी केलेली बेकायदेशीर बांधकामे आहेत हे मला अनेकांनी दाखविले पण त्यांच्याकडे सबळ पुरावे नसतात.

यापार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकरांनी स्वतःहून आपले बेकायदेशीर ठरू शकणारे बांधकाम पाडणे ही मला महत्वाची घटना वाटते. काहीही कारणे असोत, त्यांनी दबावामुळे ते केले असो पण महाराष्ट्रातील तमाम राजकीय लोकांनी स्वतःची बेकायदेशीर बांधकामे तोडायची ठरविली तर ??

©असीम सरोदे

Updated : 23 Aug 2021 12:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top