Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'अरे ला कारे' ; आदिवासींच्या संघर्षाचा सशक्त उदगार

'अरे ला कारे' ; आदिवासींच्या संघर्षाचा सशक्त उदगार

यशोधरा काटकर- लेखिका

अरे ला कारे ;  आदिवासींच्या संघर्षाचा सशक्त उदगार
X

नाताळ. बेथलहॆम गावाबाहेर एका गोठ्यात बाळ येशूचा जन्म झाला. या देवपुत्राच्या जन्माचे सूचन करणारे लखलखीत तीन तारे आकाशात चमकले आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. तसाच प्रत्यय राजरत्न भोजने लिखित-दिग्दर्शित नाटक 'अरे ला कारे ' बघताना येत होता. आदिम जनजातींच्या जंगल,पाणी जमीन वाचवण्यासाठी जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे एक लखलखीत व्हिज्युअल स्टेटमेंट यानिमित्ताने मराठी रंगभूमीवर उमटले.





या नाटकाच्या कथावस्तूचा संदर्भ आरेच्या भूमीवर विकासाच्या नावाखाली होणाऱ्या अतिक्रमणाचा आणि विध्वसाचा असला तरी त्याचे नाते आज वसई, गोवा, नर्मदेच्या खोऱ्यात, आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकन देशांत पर्यावरण आणि मूळ रहिवासी असलेल्या माणसांचे जे शोषण सुरू आहे त्याच्याशी नीटच जुळलेले आहे. या प्रत्येक ठिकाणी या आदिम माणसांचे आजूबाजूला असलेल्या झाडांशी , इथल्या प्राण्या-पक्षांशी , वाघोबा देवाशी शतकानुशतकांचे भावबंध जुळलेले आहेत. हे या मायमातीतले मूळ रहिवासी, इथल्या जंगल- जमीन -पाण्यावरती त्यांचा हक्क पहिला पण यांच्या हक्कांची कोणालाच पर्वा नाही, जशी झाडे कापली जात आहेत तशीच ही माणसंही विस्थापित केली जात आहेत. त्यांनी कुठे जायचं? कसे जगवायचे आपल्या झाडांना, आपल्या देवांना,आपल्या पाड्यांना? झाडांची कत्तल करून आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत, पुढच्या पिढ्यांसाठी हे प्रदूषित पर्यावरण मागे सोडून जाणार आहोत याचे भान लोभी माणसाला येणार केव्हा? विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबडत चाललेला क्रूर माणूस आणि झाडांचं प्राणपणाने जतन करणारा शांतिप्रिय आदिवासी समाज यातला जो संघर्ष या नाटकातून ठळकपणे उमटला आहे ,तो अस्वस्थ करणारा आहे .





आज आपल्या मराठी रंगभूमीवर जी नाटकं येत आहेत त्यात प्रामुख्याने कौटुंबिक सौख्याच्या झुळूमळू कथा मांडणारी मनोरंजनात्मक आणि दुसरीकडे एखादी विशिष्ट विचारसरणी किंवा अजेंडा-प्रोपोगेंडा घेऊन अवतरलेली नाटकं दिसत आहेत. एखादेच अपवादात्मक नाटक शोषित-वंचिताचा आवाज म्हणून अवतरताना दिसते. अशा वेळी राजरत्नसारखा तरुण मुलगा असा समकालीन वास्तवातला आशय मांडणारे शोकात्म नाटक लिहितो, पन्नासेक कलाकार आणि तंत्रज्ञ् साथीला घेऊन ते नृत्य -संगीतासह समूहनाट्याच्या फॉर्ममध्ये इतक्यात ताकदीने प्रत्ययकारी साकार करतो हे मराठी नाट्य-चळवळीला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाणारे आहे.कालच्या प्रयोगाला आरे मधल्या शेवटच्या पाड्याचे रहिवासी, 'आरे बचाव' संघर्षातले एक प्रमुख कार्यकर्ते प्रकाश भोईर, त्यांच्या पत्नी आणि इतर उपस्थित होते. प्रकाशदादांच्या चार शब्दातून आदिवासींची व्यथा रंगमंचावर प्रत्यक्ष प्रकट झाली ती हेलावून टाकणारी होती .असे समकालीन वास्तवाशी सांधा जोडणारे आणि तुम्हा-आम्हाला पुन्हा एकदा खडखडून जागे करणारे आवाज चुकून-मागून उमटत असतात . ते क्षीण होऊन संपून जाऊ नयेत, आदिम समाजाने आपल्या अस्तित्वासाठी आपल्या पर्यावरणाच्या रक्षणा साठी मारलेली ही बोंब जोमाने सगळ्या महाराष्ट्रात, सगळ्या देशात पसरत जावी.




अशा प्रयोगाला वरूण सुखराजसारखा चळवळ्या, सर्जनशील निर्माता म्हणून लाभला आणि या सगळ्या प्रकल्पाच्या पाठीशी महेश मांजरेकरांसारखे आघाडीचे व्यावसायिक रंगकर्मी तसेच अनेक दृश्य -अदृश्य व्यक्तिमत्वे उभी राहिली हेही एक आशादायक चित्र या निमित्ताने सामोरे आले. काल नाताळचा दिवस असूनही (संध्याकाळी साडेआठला असलेल्या )या प्रयोगाला तरुणाईने मोठ्या जोशात गर्दी करून प्रयोग हाऊसफुल केला. तरुण पिढी केवळ मौजमजा- मोबाईल - मनोरंजनात रमत नाही ती सामाजिक विषय घेऊन सर्जनशील काम करते, जेव्हा असे प्रयोग होतात तेव्हा स्वतःच्या उपस्थितीने तिथे चैतन्य निर्माण करते , आता हीच पिढी उद्याच्या संघर्षात 'अरे ला कारे 'प्रत्युत्तर देत सामील होईल आणि आणि अशा चळवळींना बळ देईल हॆ सकारात्मक चित्रही या निमित्ताने सामोरे आले.

या नाटकाचे अनेक प्रयोग सगळीकडे होवोत, आदिवासींच्या आक्रोशाची बोंब सर्वदूर पोहोचो यासाठी 'अरे ला का रे' च्या सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा.



Updated : 26 Dec 2023 8:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top