Home > मॅक्स ब्लॉग्ज > निमित्त: भाऊ कदम आणि गणपती

निमित्त: भाऊ कदम आणि गणपती

भाऊ कदम यांनी घरात गणपती बसवल्यानंतर त्यांंच्या भावकीने त्यांच्यावर बहिष्कार टाकल्याची घटना 2017 मध्ये घडली होती. त्यानंतर आनंद भंडारे यांनी त्या घटनेविषयी व्यक्त केलेले परखड मत

निमित्त: भाऊ कदम आणि गणपती
X

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम यांनी त्यांच्या घरी गणपती बसवला म्हणून भावकीने त्यांच्यावर बहिष्कार टाकलाय असं समाज माध्यमांवरूनच वाचायला मिळालं. खरं खोटं माहीत नाही पण संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर ap अर्थात 'आपल्यापैकी' आहे हे जसं अनेकांना यानिमित्ताने कळलं तसंच मलाही. आणि माझ्या लग्नाचे दिवसही आठवले.

आपलं लग्न कमीतकमी खर्चात व्हावं म्हणून जसं लग्नातलं जेवण रद्द करून आम्ही फक्त आईस्क्रीम ठेवलं तसं एकच फोटोग्राफर आणि कॉमन लग्नपत्रिका आम्ही छापली. जन्माने आम्ही दोघंही बौद्ध. मात्र बहुसंख्य हिंदू असलेल्या चाळीत बायको वाढलेली. त्यामुळे हिंदू धर्माच्या बऱ्याचशा चालीरीतींचा तिच्या घरावरच एकूण प्रभाव! सांगायचा मुद्दा हा की आमच्या लग्नपत्रिकेत देवांची नावं असावीत असं तिचं म्हणणं. त्यावेळी मला ते फार गंभीर वाटलं नव्हतं आणि कुणालाही ते गंभीर वाटेल असंही वाटलं नव्हतं. पण आमच्या चाळीतल्या लोकांना ते फारच भयंकर वाटलं. चाळीतलेचं काय अगदी शेजारचेही आमच्या लग्नाला आले नाहीत. बहिष्काराचं अजिबात समर्थन करत नाही पण लोकांची ती स्वाभाविक प्रतिक्रिया होती. कारण आमच्या चाळीतल्या कुणाच्याही लग्नपत्रिकेवर देवांची नावं नसायची. आजही नसतात.

आमच्या दादांची हयात गेली फक्त आंबेडकरी गाणी गाण्यात. चार पैसे मिळतात म्हणून देव-देवतांची गाणी कधीही त्यांनी म्हटली नाहीत. त्यांच्याच चिरंजीवाच्या लग्नपत्रिकेवर देवांची नावे? बरं माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्नं मीच करून दिलेली. पण त्यांच्या लग्नपत्रिकेतही देवांचा उल्लेख नव्हता. मग माझ्या लग्नपत्रिकेवरचा उल्लेख कसा काय ते खपवून घेतील? बहिष्कारामुळे नव्हे तर चळवळीतल्या मित्रांच्या संवादातूनच मलाही माझं तेव्हा चुकलंच असं नंतर ध्यानात आलं. तशी कबुली तेव्हाही त्या मित्रांकडे दिलेली आज यानिमित्ताने जगजाहीर झाली एवंढच!

अर्थात ही कबुली देतानाही एक गोष्ट प्रकर्षाने मांडावीशी वाटते. देवांच्या उल्लेखाबाबत बौद्ध समाज फारच सेनसेटिव्ह आहे. आपल्याच नव्हे तर एकूणच देशाच्या अधोगतीला देव ही संकल्पनाच कारणीभूत आहे यावर या समाजातील घरबसली पोरंही प्रवचन देतील. देवांच्या उल्लेखांवरूनच वरळीची दंगल पेटली होती हा इतिहास आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांपैकी पहिल्या पाच प्रतिज्ञा या देवांबाबतच आहेत इतकं त्यांनाही ते महत्वाचं वाटलं होतं.

धर्मांतराच्या वेळी अडाणी असणाऱ्या महार समाजाने देव्हाऱ्यासह देवांना घरातून बाहेर काढल्याचं अभिमानास्पद उदाहरण आजही दिलं जातं. ती धाडसी कृती होती यात शंकाच नाही. पण तो सगळा काळ उलटूनही आता जवळपास चार पिढ्या गेल्यात. त्यावेळी एकजात सगळे महार होते. आता बौद्धांमधे इतर धर्मीयांचा संकर होतोय. विशेषत: हिंदू मुलींची लग्नं बौद्ध मुलांशी होताहेत. त्यामुळे या दोन संस्कृती एकमेकांमधे मिसळताहेत. अशा वेळी देवांबाबत किती ताठर असावं याचा ज्याने त्याने विचार करावा.

सगळ्या अंधश्रद्धांचं मूळ देव ही संकल्पना आहे ही बाब अनेक हिंदूंनाही मान्य आहे. आस्तिक परिषदेत केवळ बौद्ध तरूणच नसतो, ही वास्तव परिस्थिती आहे. रमाईंचा विठ्ठलाच्या दर्शनाचा हट्ट बाबासाहेबांनी मोडून काढला. आजच्या तरुणानेही आपल्या बायकोवर आपले विचार लादण्याचा प्रयत्न केला तर तिच्या व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्याचे काय? की माझा विचार तोच पुढारलेला आणि तिचा तो मागासलेला ही पुन्हा एकदा पुरूषी अरेरावीच? भिक्खूंच्या कत्तली करून, विहारांची, लेण्यांची मंदिरं करून, बुद्धाला विष्णूचा अवतार करूनही जो विचार संपला नाही तो एखाद्याने घरी गणपती बसवला म्हणून नष्ट होईल? मान्य की हे बाबासाहेबांच्या शिकवणी विरोधात आहे. चूक जरूर लक्षात आणून द्या, त्यावर हवं तर जहरी टीका करा. पण ती चूक सुधारण्यासाठी मोकळा श्वासही द्या. बहिष्काराने लोकं गुदमरतात याची आठवण किमान या समाजात तरी असायला हवी.

सफरचंदाचा खराब भाग कापून उरलेला आपण खातोच ना. माणसांबाबत मात्र असं काही घडलं की आपण तो संपूर्ण माणूसच नाकारतो. हे आपण टाळायला हवं. आंबेडकरी विचारांचा असणं अर्थात माणूस असणं हे याहून वेगळं नाहीय.

- आनंद भंडारे

Updated : 31 Aug 2022 12:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top