Home > Election 2020 > लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाला बीड जिल्ह्यात मर्यादित ठेवणारे भाऊ-बहीण

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाला बीड जिल्ह्यात मर्यादित ठेवणारे भाऊ-बहीण

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाला बीड जिल्ह्यात मर्यादित ठेवणारे भाऊ-बहीण
X

स्व गोपीनाथ मुंडे यांचा आयुष्यभराचा संघर्ष पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या नेत्यांनी अक्षरशः वाया घालवला. जसे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी उमेदवार दिला नाही. जर रोहित पवार पुणे जिल्हा सोडून नगर जिल्ह्याच्या राजकारणात येऊ शकतात, तसेच धनंजय मुंडे हे गंगाखेड मधून निवडणूक लढवू शकतात. म्हणजे ते परभणी जिल्ह्याच्या राजकारणात येऊ शकत होते, परंतु एकमेकांच्या विरोधात उभे राहून एकमेकांना परळीपुरते मर्यादित करून घेतले आणि एकार्थाने दोघेही संपले. निवडणूक इतक्या खालच्या पातळीला नेऊन ठेवली जिथे महिलांना लाज वाटावी आणि प्रतिनिधींना आपली नीतिमत्ता गहाण ठेवावी लागली. यातच स्व गोपीनाथजी मुंडे यांचा पराभव झालेला आहे, ज्यांनी आपलं आयुष्य बेरजेच्या राजकारणात घातलं त्यांच्या विचारांना तडा गेला.

तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना शह तेंव्हाच दिला गेला जेंव्हा अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांच्यासारख्या वक्त्यांना राष्ट्रवादीने पक्षात स्थान दिले. आता त्या पक्षात धनंजय यांना भविष्य नाही, ज्या अजित पवारांच्या समर्थनावर ते पक्षात आले आज त्याच अजित पवारांना पक्षात वजन नाही. आणि शरद पवार हे गोपीनाथ मुंडे यांच्या नातलगास कधीच पुढे येऊ देणार नाही हे अंतिम सत्य आहे. आणि उरले सुरले पंकजा मुंडे यांचे भाजपा मधील भविष्य या निवडणुकीतून संपुष्टात आणायचा प्रयत्न विरोधकांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आणि पक्षाने अगदी सोयीने केला आहे. निवडणुकीत पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारून ओबीसी समाजाला नाराज करण्याचे काम मुख्यमंत्री नक्कीच करणारे नाहीत, त्यांच्यासारखा चाणाक्ष नेता हे काम करणारा नाही. म्हणून तिकीट देऊन निवडणुकीत पाडण्याचे काम सोयीस्कररीत्या करण्यात आले. शरद पवार यांनी नेहमी सोयीचे राजकारण केले गेलेले आहे, कुणाला कसे वापरून घ्यायचे याची त्यांना चांगली जाण आहे. समाजापासून ते व्यक्तीपर्यंत त्यांनी फक्त वापरून घ्यायचं काम केले आहे हे इतिहास सांगतो. त्यामुळे भविष्यात अमोल कोल्हे हे शिवसेनेत जातील यात कुणाला आश्चर्य वाटायला नको. फक्त आढळराव, अडसूळ आणि खैरे यांच्यासारखे पाचव्या वेळा निवडून येऊ नये आणि कुठलेही नेतृत्व प्रस्थापित होऊ नये म्हणून कोल्हे यांना राष्ट्रवादीकडे पाठवून त्यांना निवडून आणायचे काम सुद्धा सेनेने केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा सेनेत परततील यात शंका नाही.

या सगळ्यात धनंजय मुंडे यांचे अस्तित्व पणाला लागलेले असताना, त्यांनी या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत निवडून येणे गरजेचे होते. त्यात सत्ताधारी पक्षाने पंकजा मुंडे यांना पाडण्यात हात धुवून घेतला. भविष्यात धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी या पक्षात फारसे स्थान उरणार नाही हे वास्तव आहे, कारण पवारांच्या पक्षात सुप्रिया सुळे, अजित पवार आणि रोहित पवार यांना सोडून दुसऱ्या कुणास मोठे स्थान मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे धनंजय मुंडेसारख्या नेत्यास अपेक्षेप्रणाने महत्वाकांक्षा पूर्ण होणे कधीच शक्य नाही, अगदीच छगन भुजबळ यांच्यासारखा धनंजय मुंडे यांचा वापर केला जाईल हे सर्वसृत आहे. आणि पुन्हा त्यांनी पक्ष बदलणे हे त्यांच्या प्रातिमेसाठी कधीच योग्य ठरणार नाही. म्हणून त्यांचं नेतृत्व हे जवळपास संपुष्टात आलेले आहे, हे कुणी मान्य करो अथवा ना करो. पंकजा मुंडे पडणार किंवा धोक्यात या पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा गौप्यस्फोट पक्षाने जाणून बुजून केला. याची कल्पना दोघा बहीण भावंडांना असूनही दोघे सोयीचे राजकारण करू शकत नाहीत, हे मोठे दुर्दैव आहे. दोघांनीही एक पाऊल मागे घेऊन काही ठोस पाऊल उचलले असते तर दोघांच्याही भविष्याचा सुकाळ आला असता. आता भगवानगड आणि सावरगाव येथील नेतृत्व कोण करेल हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु सद्यस्थतीत या दोघांना शहरात मर्यादित ठेवून राज्यात येऊ न देण्याची खेळी करण्यास पवार आणि फडणवीस यशस्वी झाले हे मात्र खरं.

उरला प्रश्न पंकजा मुंडे यांचा, तर त्यांची सर्वात मोठी चूक ही की मतदारांना ग्राह्य धरले. त्या स्व गोपीनाथ मुंडे यांचा वारसा समर्थपणे पुढे नेऊ शकल्या नाहीत हेच यातून दिसून आले आहे. स्व गोपीनाथ मुंडे हे ग्रामीण भागातून आलेले नेतृत्व होते ज्यांनी ते स्वबळावर प्रस्थापित केलेले लोकनेते ठरले होते, त्यामुळे त्यांची मतदारसंघातील पकड ही फार मजबूत होती. मंत्री असताना पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक इतके काही गुर्मीत होते की, सामान्यांना असे वाटायचे की तेच मंत्रालय सांभाळत आहेत, एक स्वीय सहायक (नाव घेत नाही, कदाचित बऱ्याच लोकांना महितही असेल) तर बऱ्याच अधिकाऱ्यांच्या बदल्या फक्त या कारणांवरून करत होते जे त्यांच्या नाहक मागण्या पूर्ण करण्यास सहकार्य करत नव्हते. या गोष्टी पंकजा मुंडे यांच्या कानावर जाऊनही त्यांनी स्वीय सहाय्यकाला सांगूनही जर स्वीय सहाय्यक ऐकत नसतील हे फार दुर्दैवी, फार अशोभनीय आणि भयानक वाईट आहे. पंकजा मुंडे यांनी स्वीय सहाय्यक पदी ठेवलेले व्यक्ती हे फक्त त्यांच्या ऐकण्यातलेच असावेत याची काळजी घ्यायला हवी होती, याने त्यांची जनसामान्यातली आणि अधिकाऱ्यातील प्रतिमा मलिन झाली हे विसरून चालणार नाही. त्यामुळे यापुढे पंकजा मुंडे यांना आपली टीम बदलावी लागेल, जी फक्त त्यांच्या सूचनांचे पालन करेल. यासाठी त्यांना काळजी घेण्यास आणि निवडी करण्यास आता अवकाश मिळणार आहे, ज्याचा त्यांनी जनसंपर्क वाढवण्यास आणि स्वतःच वलय वाढवण्यास प्रयत्न करावे. महत्वाचं म्हणजे सद्यस्थितीत पंकजा मुंडे यांना पक्षातून अर्थातच मुख्यमंत्री महोदयाकडून आणि मतदारसंघातून शह देण्यात आला याकडे लक्ष द्यावे लागेल. आणि हे बिलकुल नाकारून चालणार नाही, आणि यावर आत्मपरीक्षण करणे गरजेचे ठरेल. जर लातूर मध्ये देशमुख बंधू निवडून येऊ शकतात तर बीड मध्ये वेगवेगळ्या मतदारसंघातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे का निवडून येऊ शकत नाहीत?? हे कळायला ते काही लहान नाहीत. याच आत्मपरीक्षण त्यांनी दोघांनी करणे फार गरजेचे आहे. भविष्यात त्याचा दोघांनाही फायदा होईल यात काही शंका नाही, यातून दोघांनीही शिकणे फार महत्वाचे आहे. जसे धनंजय मुंडे गंगाखेड मधून उमेदवार होऊन जाऊ शकतात आणि परभणी जिल्ह्याच्या राजकारणात येऊ शकतात. तसेच जर धनंजय जर परळीत स्थिरावले तर पंकजा मुंडे या पाथर्डी मधून उमेदवार होऊन नगर च्या राजकारणात येऊ शकतात. राजकारणात काहीही शक्य आहे, आणि तेच या दोघांनी दाखवून दिले तरंच यांचं काही भविष्य ठरेल.

हे दोघे एकत्र येवो न येवो पण बाकीचे नेते जसे सोयीचे राजकारण करत आहेत, ते पाहता यांनी सुद्धा सुडाचे राजकारण सोडून सोयीचे राजकारण करणे त्यांच्यासाठी योग्य ठरेल. ठाकरे घराण्यात भांडणे असूनही ते एकमेकांविरोधात उमेदवार देत नाहीत, हे राजकारण हे भाऊ बहीण कधी ठरवतील?? जर मुंडे बंधू भगिनीस त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर त्यांनी या निवडणुकीत फार मोठा धडा घ्यायला हवा, अन्यथा येत्या दशकात यांच्या महत्वाकांक्षा संपुष्टात येऊन त्यांचं अस्तित्व धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व लिहिण्यास कारण की ज्या अनुषंगाने परळीची निवडणूक माध्यमांनी गाजवली त्यातून फार मोठा संदेश दिला गेलाय. धनंजय मुंडे यांना विजयाच्या शुभेच्छा, आणि पंकजा मुंडे यांना यातून काहीतरी धडा घ्यावा या सदिच्छा...

मतदार राजा जागा झाला आहे, NOTA ची टक्केवारी वाढली यातून दिसून येते की राजकीय भंपकगिरी जनतेने नाकारली आहे. यापुढे राजकीय पक्ष उमेदवार देताना नक्कीच विचार करतील यात शंका नाही, घोडेबाजारास काही प्रमाणात आळा बसेल. कार्यकर्त्यांना न्याय मिळायला मदत होईल, आयुष्यभर ज्यांच्या चटया उचलल्या तेच विरोधी पक्षात जाऊन आपला स्वार्थ साधत आहेत. याला कुठेतरी आळा बसायला हवा, जो बसण्यास यापुढे मदत होईल अशी आशा बाळगू.

- चैतन्य सुनंदा शिवलाल

Updated : 24 Oct 2019 3:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top