Home > नॉन स्टॉप लता > लता मंगेशकर आणि अनिल विश्वास

लता मंगेशकर आणि अनिल विश्वास

लता मंगेशकर आणि अनिल विश्वास
X

" सिने में सुलगते है अरमान

आंखो में उदासी छाई

ऐ प्यार तेरी दुनिया से हमे

तकदीर कहा ले आई है "

काही गाणी ही एखाद्याची identity बनतात ..... वरच गाणं ऐकताना जरी डोळ्यासमोर मधुबाला आणि दिलीप कुमार आले तरी, हे गाणं सर्वार्थाने अनिल विश्वास यांची ओळख आहे असं मला तरी वाटत .....

या एका गाण्यावरून ह्या संवेदनशील माणसाचं विलक्षण सामर्थ्य सहज लक्षात येतं .... पण फक्त वरचं गाणं म्हणजेच अनिल विश्वास नव्हेत. अनिल विश्वास ही माझ्या मते एक व्यक्ती नसून एक संस्था आहे .... जिने अनेक दिग्गजांना पुढे आणलं, या चंदेरी दुनियेत आपला जम बसवायला लागणारा तो सुरुवातीचा अत्यावश्यक असलेला push दिला ....

आज बांग्लादेशात असणाऱ्या बारिसाल ह्या छोट्याश्या खेड्यात १९१४ रोजी अनिल बिस्वास यांचा जन्म झाला ....

वडिलांना असलेलं नाच-गाण्याचं वेड आणि आईकडून मिळालेली शास्त्रीय संगीताची पक्की बैठक यामुळे बालपणापासून अनिलदा संगीतमय वातावरणात वाढले आणि त्यांच्या संगीतात एक नैसर्गिक सहजता आली.

संगीत, गायन, अभिनय, कथा, पटकथा, दिग्दर्शन, निर्मिती अशा सिनेसृष्टीतील जवळ जवळ सर्वच क्षेत्रातील त्यांच्या चौफेर कामगिरीमुळे भारतीय चित्रपटाच्या इतिहासाचा ते एक भक्कम आधारस्तंभ आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत हा अनिलदांच्या संगीताचा पाया होता .... त्यांच्या संगीतात तबला, ढोलकं, सितार, बासरी आणि पियानोवर विशेष भर असे .... प्रत्येक गाण्यात ते भारतीय वाद्यांचा अत्यंत नजाकतीने, वैशिष्ट्यपूर्ण वापर करत असत ....

सी रामचंद्र, मदन मोहन, रोशन यांच्या सारख्या यशस्वी, दिग्गज संगीतकारांना आणि लता मंगेशकर, तलत महमूद आणि मुकेशसारख्या गायकांना प्रकाशात आणण्याचे श्रेयही अनिलदांकडेच जाते. अनिल विश्वास एकदा अभिमानाने म्हणालेले की "लताचा शोध गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश आणि मी लावला", आणि त्यांच्या ह्या विधानाचा लतालाही अभिमान आहे. यातच अनिलदांचं विलक्षण वेगळेपण दिसून येतं.

१९४६/४७ साली गुलाम हैदर यांनी अनिल विश्वास आणि लताची पहिल्यांदाच ओळख करून दिली ... लता त्यावेळी जेमतेम १६/१७ वर्षांची होती. तिच्या आवाजावर "मल्लिका ए तरन्नुम" नूरजहाँचा प्रचंड पगडा होता. आणि नूरजहाँची त्या काळची लोकप्रियता लक्षात घेता लताच्या ह्या अनुकरणाचेही काही प्रमाणात कौतुक होत असे. पण अनिलदा हे एकमेव संगीतकार होते ज्यांनी लताला नूरजहाँच्या प्रभावातून जाणीवपूर्वक बाहेर काढलं.

आज लताच्या ज्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे, नितळ, पारदर्शी, स्वच्छ आवाजामुळे तिला गानकोकिळा हा किताब मिळाला आहे, माझ्या मते तरी याचे पूर्ण श्रेय अनिलदांकडेच जातं.

बापावेगळी पोर, वयाच्या १२/१३ व्या वर्षी कुटुंबाचा भार वहाते म्हणून लताबद्दल अनिलदांना खूपच आत्मीयता होती, अभिमान होता आणि म्हणूनच असेल त्यांनी तिच्यावर धाकट्या बहिणीसारखी माया केली, तिच्या आवाजावर खूप मेहनत घेतली.

त्यांनी लताला गाण्यात, शब्दांच्या स्पष्ट उच्चारांचं किती महत्त्व असतं, गातांना ताल आणि लय तोडल्याशिवाय श्वास कसा घ्यायचा अशा अनेक लहान-सहान पण महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या.

त्यांनी तिला सांगितलं की तू कोणत्याही सप्तकात गायलीस तरी तुझा आवाज मात्र कायम लता मंगेशकरचाच राहिला पाहिजे ही खबरदारी घे.

लता अनिलदांकडे सर्वप्रथम "अनोखा प्यार " या चित्रपटात गायली आणि ह्या चित्रपटापासूनच दोघांची एक अनोखी, अद्वितीय संगीत सफर सुरू झाली. पण "अनोखा प्यार" चित्रपटात जी मुख्य अभिनेत्री नर्गिस होती तिची गाणी मीना कपूरने म्हटली आहेत तर लताने नलिनी जयवंतची गाणी गायली ... ह्या नंतर मात्र अनिलदांनी आपली प्रत्येक उत्कृष्ट रचना लता आणि फक्त लतासाठीच राखून ठेवली ....

दोघांनी हिंदी सिनेसंगीत क्षेत्रात अशी काही बहार आणली की क्या कहने ..... शिकवणारा गुरु जर अनिल विश्वास आणि शिकणारी शिष्या जर लता मंगेशकर असली तर मग जे निर्माण होणार होतं ते केवळ दिव्य स्वर्गीयच असणार होतं .... गजरे, तराना, बेकसूर, जलती निशानी, आरजू, बडी बहू, फरेब, लाडली, नाझ, मेहमान, सौतेला भाई आणि इतर अनेक चित्रपटात या जोडीने जी सुरांची लयलूट केली ती ऐकल्यावर तुम्हाला माझं म्हणणं नक्कीच पटेल ....

तुम्हाला अनिलदा आणि लता या जोडीची माझी सर्वात आवडती ५ गाणी देईन असं म्हटलं खरं, पण गाणी निवडताना मात्र माझी तारांबळ उडाली .....

तराना मधलं "मोसे रूठ गयो मोरा सावरिया" घ्यायचं की "बईमान तोरे नैनवा" घ्यायचं की "तुम्हारे बुलाने को जी चाहता है" , आराम मधलं "मन में किसीकी प्रीत बसाले" घ्यायचं की "बलमा जा जा जा" घ्यायचं इथेच कितीतरी तास मी अडून बसले होते ... शिवाय "जा मै तोसे नाही बोलॉ", "आंखो में चितचोर समाये" आणि "पायल मोरी बाजे रे" यांना तर दुसरा पर्यायच नव्हता ... गजरे मधली "प्रीतम तेरा मेरा प्यार" आणि "बरस बरस बदली भी बरस गयी" वर अडून बसले .... मग शेवटी अत्यंत कठोरपणे काही गाण्यांवर काट मारावी लागली.

माफ करा पण आज मी तुम्हाला ५ नाही १० गाणी देणार आहे .... ही देखील कमीच आहेत खरतर पण त्याशिवाय अनिलदांच्या गाण्यांना योग्य न्याय मी देवू शकले नाही असच मला वाटत राहील ...

१ ) प्रेम गुपचूप करायचीच गोष्ट असते ....... ते वयच असत चोरून छपून प्रेम करायचं .... जगाला बाहेरून कधीच काहीच कळू न देता .... सारं काही आलबेल आहे, असंच भासवायचं असत इतरांना पण वर-वर शांत दिसणाऱ्या हृदयाच्या आत मात्र प्रेमाचा अंगार धुमसत असतो ...... दोन हृदयांना जाळत असतो ..... अख्खं जग झोपत तेव्हा प्रेमी मात्र जागेच असतात ...... रात्रभर जागून त्याच्या नावाचा जप करणं, साज शृंगार करून त्याच्या वाटेकडे डोळे लावून खिडकीत हळूच उभं राहाणं. जरासं जरी खुट्ट झालं तरी तोच आला असं समजून लगबगीने दरवाजा उघडणं ..... सारंच किती गोड, त्या कोवळ्या वयात एक हुरहूर लावणारं

"गजरे" मधलं लताने त्या अबोध वयाला साजेश्याच अल्लड, गोड आवाजात म्हटलेलं हे गीत .... गाण्याचं संगीतही अगदी साधं सरळ पण ह्या गीतात असा काही गोडवा आहे की, तासनतास आपण हे गीत गुणगुणत राहतो .....

" प्रियतमा , प्रियतमा हो प्रियतमा

प्रीतम तेरा मेरा प्यार गुपचूप

क्या जाने संसार

प्रीतम तेरा मेरा प्यार .....

राखों के परदे के अंदर

जलता है अंगार चूप चूप

क्या जाने , क्या जाने संसार

प्रीतम तेरा मेरा प्यार " .....

2 ) प्रेमीजनांची सर्वात आवडीची वेळ म्हणजे रात्रीची .... जेव्हा सगळीकडे नीजानीज होवून सामसूम होते तेव्हाच प्रेमिकांच्या जगात हालचाल सुरु होते आणि मग अशाच एका रात्री घरच्यांची नजर चुकवून, साऱ्या जगापासून स्वतःला लपवत छपवत पियाला भेटायला ती जाते ..... त्याच्यासाठी साजशृंगारही केला आहे..... पण कितीही प्रयत्न केला तरी नेमक्या त्यावेळी साज शृंगारच दगा देतात .... सगळे झोपलेले असताना ऐनवेळी पायातील पैंजण झनक झनक झन करून सार गुपितच फोडतात .... बिंदियादेखील अंधारात अचानक चमकते ..... आणि कुणाला दिसू नये म्हणून घेतलेली चेहरा झाकणारी चुनरिया वारंवार खाली ढळते, जणू ती देखील पियाला भेटायला उत्सुक आहे ..... पण अशावेळी तक्रार तरी कुणाची आणि कुणाजवळ करायची?

" पायल मोरी बाजे बाजे मेरी सखी

पिया मिलन को जाऊ साजनिया

जागे ननदिया और जेठनिया

हेरी पायल मोरी बाजे

झनक झनक झन बाजे झनक झनक झन .... हाय ......

कहो कैसे मिलन हो रे छलिया

ओ बाजे निगोडी पायलिया

काली रतिया बिंदिया चमके

मर गयी रे मै तो मारे शरम के

हो सारी दुनिया के मो पे नजरिया

ओ बाजे निगोडी पायलिया

झनक झनक झन बाजे झनक झनक झन .... हाय " .....

" पैसा ही पैसा " मधलं ढोलकीच्या ठेक्यावरच हे एक अफलातून गीत ... ह्या गीताच वैशिष्ठ्य म्हणजे शास्त्रीय संगीताने सुरु झालेलं हे गाणं कधी लोकगीताकडे झुकतं कळतही नाही ..... आणि झनक झनक झननंतर लताने अत्यंत हळुवारपणे म्हटलेला तो " हाय " ....

त्या एका "हाय" ने गाण्याची लज्जतच वाढवली आहे.

ह्या गीतावरून अनिलदांची प्रतिभाशक्ती लक्षात येते .....

३) गच्च चांदण्यांनी भरलेली रात्र, चहूकडे वसंत फुलला आहे आणि प्रणयोत्सुक प्रेयसी आपल्या प्रियकराला बोलावते आहे ....

" झिल-मिल सितारों के तले,

आ मेरा दामन थाम ले " .......

का बोलावते आहे काय विचारताय? कारण त्याचीच तर ती कल्पना आहे. अहो, त्याला आपल्या प्रेमात चिंब भिजवून तृप्त करायचं आहे तिला ...... म्हणूनच त्याच्यासाठी आतुरतेने वाट पाहणारी बरसात झाली आहे ती .....त्याच्या आयुष्यात चांदणं फुलवणारा प्रकाश आणणारी सुहानी रात तीच तर आहे ....

" मैं तेरे दिल की बात हूँ ,

ठहरी हुई बरसात हूँ

कदमों पे जिसके चाँदनी ,

मैं वो सुहानी रात हूँ

झिल-मिल सितारों के तले

आ मेरा दामन थाम ले " .......

एखाद्या मीलनोत्सुक प्रेयसीने आपल्या प्रियकराला बोलवावं तरी किती आर्जवाने

यातील "खामोश" शब्दावर लताने दिलेलं ताण आणि "मै हुं सराफा इंतेजार" मधल्या इंतजार मधला लांबलेला "जा" एवढा गोड आहे की, हा इंतजार असाच रहावा, संपूच नये असंच वाटतं. गाणं ऐकताना "नाझ" मधलं हे माझ खूप आवडतं हलकं फुलकं प्रणयगीत .... अनिलदांनी संगीतही अगदी साजेसं दिलंय आणि लतानेही त्या षोडश वयाला साजेशा लाडीकपणे ते गायलंय ....

४) प्रेमिकांना रात्र सर्वात जास्त प्रिय असते ....... त्यांना एकमेकांना भेटताना माणसांची जागा नको असते, पण निसर्गातील चंद्र तारांकांची सोबत मात्र हवीहवीशी असते ..... साहजिकच नाही का ते? कारण ह्या चंद्र ताऱ्यांच्या साक्षीनेच त्याचं प्रेम बहरलेलं असतं. त्यांची पहिली लाजरी बुजरी भेट, त्यांच्या शपथा, त्यांचे रुसवे फुगवे ..... साऱ्या साऱ्यांचे तेच तर मूक साक्षीदार असतात .... आणि म्हणूनच ती चंद्र ताऱ्याना सांगतेय .......

" याद रखना चाँद तारों इस सुहानी रात को

दो दिलों में चुपके चुपके जो हुई सो बात को

आसमाँ पर आसमान के प्रेमियों का मेल है

ज़िन्दगी के कॉंने कॉंने में खुशी का खेल है

आरज़ू मचली हुई ये ज़िन्दगी हँसती हुई " .....

हो लता "कॉंने कॉंने" असंच म्हणते आणि ते "कॉंने कॉंने" ऐकायला इतकं गोड वाटतं की, फक्त त्या एका शब्दासाठी मी हे गाणं हज्जारदा ऐकलं असेन ..... आज जवळजवळ ७ दशके व्हायला आलियेत पण तरीही ही चांद ताऱ्यांची सुहानी रात आजही तुम्हा आम्हा सर्व गानरसिकांना भुरळ घालते. यातच या संगीताचं वेगळेपण आहे. "अनोखा प्यार" मधलं हे लताच्या आवाजातलं गाणं ... हे गीत मीना कपूर आणि मुकेशच्या आवाजात पण आहे.

५) असा कसा हा बलमा? समोर सौंदर्याचा अमूल्य खजिना आहे आणि याचं लक्षही नाही? खरंच किती हा नादानपणा ..... त्या मदभऱ्या नजरेतील जादूची काहीच किंमत नाही का? औटघटकेच्या ह्या आयुष्यातले हे मोहरले क्षण असे वाया घालवणं चांगलं का?

कुणावर तरी जीव देणं म्हणजेच आयुष्य खऱ्या अर्थाने जगणं हे कोण शिकवणार याला?

" बालमवा नादान

समझाये न समझे दिल की बतियाँ

बालमवा नादान

बालमवा नादान हो नादान ..... हो नादान ...... हो नादान .....

बलमा जा जा जा

अब कौन तुझे समझाये

बलमा जा " .......

"आराम" मधल्या अत्यंत आगळ्या आणि अवघड चालीच्या ह्या गाण्याला हलकं फुलकं फक्त अनिलदाच करू शकतात आणि लताच त्या चालीला, बोलांना पूर्ण न्याय देवू शकते ....

6) एक मुजरा गीत .... पडद्यावर साकारलेल्या नायिकाही अनोळखी ..... पण सुरवातच अशी भन्नाट की हे गाणं लागलं की फक्त डोळे बंद करून ऐकावं.

" जा मै तोसे नाही बोलू

जा मै तोसे नाही बोलू

लाख जतन करले साजन

घुंघटा नाही खोलू

जा मै तोसे नाही बोलू " .....

अवघड आणि अफलातून शास्त्रीय संगीत असलेल्या ह्या कोठ्यावरच्या गीताला अनिलदांनी एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवलं.

" सौतेला भाई " मधल्या या गीतात लताने जे आलाप आणि मुरक्या घेतल्या आहेत त्या केवळ अवर्णनीय .... ज्या सहजतेने तिचा आवाज क्षणात वर, तर क्षणात खाली, तर क्षणात गोल गिरक्या घेतो ते फक्त आपण थक्क होवून ऐकत राहतो .....

७) प्रेम म्हटलं की मिलनानंतर विरह अटळ असतो ..... प्रेमाची सत्व परीक्षाच असते ह्या काळात एकमेकांना जाणून घेताना, समजून घेताना कितीही काळजी घेतली तरी जे व्हायचं ते टळत नाहीच .... कधीतरी दुरावा येतोच ..... दोघं वेगळे होतातच ... त्याला विसरण्याशिवाय आता कोणताही पर्याय समोर नसतो ... पण ज्याला आपलं सर्वस्व मानलेलं होत त्याला असं सहजासहजी विसरणं शक्य आहे का? ....

जेवढा प्रयत्न करतो तेवढीच जास्त आठवण येते अशावेळी .... त्याच्याबरोबर घालवलेला तो धुंद काळ सारखा फेर धरतो. आपल्या भोवती आणि जिवंतपणी मरण म्हणजे काय ते कळत ... ते सोनेरी क्षण धूसर होऊन डोळ्यात साठतात आणि मन मग त्या क्षणातंच हरवून ते गेलेले दिवस शोधत राहतं .....

" उन्हें हम जो दिल से भुलाने लगे

वो कुछ और भी याद आने लगे

ज़माना हुआ जिनको बीते वो दिन

घटा बन के आँखों में छाने लगे

वो कुछ और भी याद आने लगे " .....

" आरजू " चित्रपटातलं हे कामिनी कौशलवर चित्रित एक आर्त विरहगीत ....

८) दोघांच्या प्रेमाला खरंच कुणाची तरी नजर लागली शेवटी ..... सावरिया नुसता दूर नाही गेला तर रुसला आहे तो तिच्यावर...... ते प्रेमाचे अनुभवलेले क्षण त्या आणाभाका सगळ्या खोट्या होत्या का? निदान रुसव्याचं कारण तरी सांगावं ... ती बिचारी प्रेमात असहाय्य होवून त्याला शोधात फिरते .... आजही त्या सावरियातच गुरफटलेल्या मनाला कसं समजवायचं ...... सावरिया रुसलाय खरा पण त्यात त्याचा दोष नाहीच आहे .... तिला वाटतंय की तिच्याकडूनच काहीतरी चूक झाली आहे किंवा कुणाची तरी नजर लागलीये त्यांच्या प्रेमाला .....

" मोसे रूठ गयो मोरा साँवरिया

किसकी लगी आय-हाय किसकी लगी जुल्मी नजरिया

काहे को रूठ गये क्या है कुसूर मेरा

किस बिध माने ना दिल मजबूर मेरा

इसे ले के चली आई पिया तेरी नगरिया

किसकी लगी आय-हाय किसकी लगी जुल्मी नजरिया " .....

यात मधुबाला एखाद्या लहान मुलीसारखी निरागस दिसते .... आणि लताचा "आय हाय" म्हणतानाचा सूर देखील भाबडा अगदी लहान मुलासारखा ......

"तराना" मधलं खूप आवडतं गाणं आहे हे माझं

९) कायम नजरेतच राहणारा आणि तरीही चुकूनही कधी दर्शन न देणारा तो चित्तचोर ..... कितीही प्रयत्न केले तरी प्रत्यक्ष येतही नाही आणि हृदयातून काही केल्या जातही नाही .... त्याची आठवण मनाचे तार छेडते ..... "सखे, मनाला तरसावणारा, तडपवणारा आणि तरीही मनमीत म्हणवणारा असा कसा गं हा चित्त चोर ? "

अनिलदांची एक अजरामर संगीतरचना .....

" आंखो में चितचोर समाये

आंखो को न दरस दिखाये

किये अनेक अनेक उपाये

न आये ना दिल से जाये " ......

सुरुवातीला येणारे अत्यंत मोहक बासरीचे सूर आणि मग हलकेच background ला सुरु होणारा ढोलकी सारखा आवाज .... आणि अचानक कीर्तन ऐकत असल्यासारखा फील येतो ....

त्याचं कारण म्हणजे ह्या गीतात, बंगाली लोकगीतांमध्ये वाजवले जाणारे एक "खोल" नावाचे (मृदंगासारखे) वाद्य वापरले आहे ....

" मन में बैठा ऐसे वो

जो दिल के तार हिलाये " ....

यातील "वो" वर लताचा आवाज असा काही फिरला आहे की क्या कहने ....

" जैसे भिगी रात में कोई

छुपकर बीन बजाये

सखी री " .....

आणि "सखी री" .... शब्दावरची ती लाजवाब मुरकी ....

" मन को तरपाये, तरसाये

फिर भी मन का मित कहाये

आंखो में चितचोर समाये " ......

ह्या गीताचा बाज "baul" ह्या प्रकारच्या बंगाली लोकगीताचा आहे ... ह्या गीताला एवढ्या आगळ्या प्रकारे संगीत दिलेलं आहे की माझ्यासारखी संगीतातले बारकावे फारसे न कळणारी फक्त ही रचना कानात साठवत राहते ...... आज एवढ्या वर्षानंतरसुद्धा हे गाणं ऐकताना दरवेळी गाण्यातील एखादी नवीन जागा कळते आणि थक्क व्हायला होतं ....

१०) पण खरं, प्रेम विरह, गैरसमज, ताटातूट या सर्वांना पुरून उरत आणि शेवटी दोन प्रेमी जिवांच मिलन कोणीही थांबवू नाही शकत .....

आज मिलनाची ती रात्री, तो क्षण जवळ आला आहे ....... ती सर्वांच्या नजरा चुकवुन कशीबशी येवुन पोहोचली एकदाची. आणि तो? तो तर कधीचा येवुन उभा होता आतुरतेने वाट पहात .....

" सितारो चांद से कहदो ये दिल की बात धीरेसे

मिलन की रात है गुज़रे मिलन की रात धीरे से "

रात्रीचा धुंद करणारा एकांत, आजुबाजुला कुण्णीकुण्णी नाही म्हणुन जरा कुठे आश्वस्त होतेय. तो काय पहाते!! चंद्र टक लावून अनिमिष नेत्रांनी त्यांनाच पहातोये. तिच्या मनीचं गुपीत कसं सांगणार ती तिच्या साजणाला ह्याच्या समोर? .... हार मानुन मग तिने आकाशात दाटुन आलेल्या मेघांना विनवलं .....

" अरी बदली छुपा ले दो घड़ी चंदा को दामन में

चंदा को दामन में

पिया से आज कहनी है मुझे एक बात धीरे से

मिलन की रात है " ...

पण तिला वाटत होतं तसं हे चाँद, सितारे, बदली काही नुसते त्यांचं मिलन पहायला जमले नव्हते, तर तिचं मनोगत जाणुन तिला मदतही करणार होते ...

आपल्या या लाजर्या बुजर्या सखीसाठी वातावरण जादुई करणार होते ... आणि म्हणुनंच हलकीच एक सर आली आणि दोघांनाही चिंब करुन त्या सुगंधी रात्रीने तृप्त केले ......

" अभी दिल ही में दिल कि बात थी पर जान ली तुमने

घटा छाने से पहले हो गयी बरसात धीरे से

मिलन की रात है गुजरे मिलन की रात धीरे से " ...

"बडी बहू" या चित्रपटातील लताने गायलेलं आणि अनिल विश्वास यांनी संगीतबद्ध केलेलं हे दुर्मिळ पण अत्यंत गोड असं माझ सर्वात आवडतं प्रणय गीत ....अनिलदांमुळे लता नावारूपाला आली की, लता मुळे अनिलदां आपली प्रतिभा उत्कृष्टपणे सर्वांसमोर आणू शकले हे कुणीच नाही ठरवू शकत ....

पण एक मात्र नक्की की ह्या दोन दिग्गजांच्या एकत्र येण्यामुळे हिंदी सिनेसंगीतात अमृतधारा बरसल्या ज्या अजूनही आपल्यासारख्या चातकांना तृप्त करत आहेत .....

नयना पिकळे

Updated : 3 March 2017 12:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top