राहुल गांधी: काँग्रेसचे एक जीवघेणे दुखणे
Max Maharashtra | 19 May 2017 12:27 AM IST
X
X
दिल्लीतील उन्हाळा अपेक्षेप्रमाणे वाढतच चालला आहे. हवेतील जीवघेण्या उष्म्याबरोबरच राजकीय हवामानही तापलेलेच आहे. त्याचे चटके सर्वांनाच जाणवू लागले आहेत. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने वाजत-गाजत सत्ताग्रहण केले, त्या ऐतिहासिक घटनेला येत्या आठवड्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त लवकरच या सरकारच्या तीन वर्षांच्या जमा-खर्चाबद्दल लिहिणार आहेच. पण त्यापूर्वी भारतावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या गेल्या तीन वर्षांतील विरोधी पक्ष म्हणून केलेल्या कामगिरीबाबतही चर्चा करणे प्रस्तृत ठरते. अर्थात या तीन वर्षांतील काँग्रेसच्या कामगिरीवर नजर टाकली, तर त्या जमा-खर्चाच्या विवरणात नफा नाहीच उलट सर्वत्र खर्चच खर्च असे चित्र दिसते. श्रीमंतीत संसार करणाऱ्या कुटुंबावर अचानक दारिद्र्याची कुऱ्हाड कोसळली की, खर्चाची तोंडमेळ करताना घरच्या गृहिणीची जी अवस्था होते, तशीच काहीशी परिस्थिती अध्यक्ष सोनिया गांधी यांची झालेली असणार. घरात आमदानी नाही आणि खर्च मात्र सवयीनुसार महाप्रचंड. तो कमी करायचा, तर गावात आब्रूचे धिंडवडे निघणार आणि त्यातच ज्याच्यावर सारी मदार तो घरातला तरूण कर्ता पुरुषही 'नाकर्ता'च ठरलेला. अशा वेळी फाटक्या लुगड्याला ठिगळे लावून फुकाचा आब आणताना व गरीबी लपवण्यासाठी चेहऱ्यावर उसने हसू आणत आसू डोळ्यातच साठवताना स्वाभिमानी गृहिणीची जी तारांबळ उडते, तशीची परिस्थिती सोनियाजींची झालेली आहे, असे दिसते. मात्र आपल्या जुन्या राजेशाही दिवसांच्या स्वप्नांतून अद्यापही बाहेर न पडलेल्या 'युवराज' राहुल गांधींना यापैकी कशाचीही फिकीर नाही. त्यांचे दिवास्वप्नरंजन आजही तसेच चालू आहे. त्यांच्या अवती-भवती घुटमळणाऱ्या हवशा-गवशा-चमच्यांची गर्दीही कमी झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या एकेकाळच्या चिरेबंदी वाड्याच्या एकेक चिरा आता ढासळू लागल्या आहेत आणि तुळयाही कोसळू लागल्या आहेत.
भारतातील सर्वात जुन्या व एके काळच्या जगातील सर्वात शिक्तमान राजकीय शक्तीचे असे दिवसागणिक पतन होत चाले आहे. 2013मध्ये काँग्रेसने कर्नाटक राज्य विधानसभेच्या निवडणुकांत विजय मिळवला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच्या पंजाब विधानसभेतील विजय वगळता काँग्रेसचे गड एकामागून एक असे कोसळतच राहिले. नजिकच्या भविष्यकाळात यातून सावरण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. आणि पक्षाच्या उपाध्यक्षपदी बसलेल्या राहुल गांधींना त्याची फिकीर नाही, ही पक्षाची मोठी शोकांतिका आहे. राजीव गांधी यांच्या अकाली दुर्दैवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा आपल्या खंद्यावर घेऊन लागोपाठ दोन वेळा केंद्रात व अनेक राज्यांतही सत्ता जिंकणाऱ्या सोनिया गांधी आता वार्धक्याकडे झुकू लागल्या आहेत. त्यातच त्यांची प्रकृतीही अलिकडे ठीक नसते. त्यामुळेच पक्षात 'उपाध्यक्ष' हे पद निर्माण करून त्यावर राहुलना बसवण्यात आले. हेतू हाच की, ते राजकारणाचे मंत्र व तंत्र शिकतील. पण हा अंदाज व विश्वास व्यर्थ ठरला, असेच आता म्हणावे लागते. या संपूर्ण काळात 2012च्या उत्तर प्रदेश विधानसभेत मिळवलेले यश वगळता राहुल यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे केवळ पतन होत राहिले. 2011मध्ये आलेले अण्णा हजारे नावाचे वादळ व त्याच्या आधी व नंतर सत्ता आणि पक्षात झालेली भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे पक्षाच्या यशाला ग्रहण लागले हे खरे. पण नरेंद्र मोदी नावाचा नवा 'नेता' राष्ट्रीय पातळीवर उदयाला येण्याच्या आगोदरच पक्षाला घरघर लागलेली होती, हेही खरेच.
नरेंद्र मोदी नावाचे वादळ 2013मध्ये जन्माला आले व त्यांच्या रौद्र रुपामुळे बाकी सारेच पक्ष वाळलेल्या पाचोळ्यासारखे सैरत्रैर उडून गेले हे खरे. पण 2013च्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकांतही काँग्रेसचा दारुण पराभव झाला होताच. त्याच काळात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या 'आम आदमी पार्टी'ने (आप) जन्म घेतला. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकांत शीला दीक्षित यांचे सरकार सत्ताभ्रष्ट झालेच, शिवाय काँग्रेसला केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, पण राहुल यांनी मोठी 'चाल' खेळून भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी 'आप'ला बाहेरुन व बिनशर्त पाठिंबा दिला व अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री केले. परिणाम हा झाला की, 2015 मध्ये दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्या, त्यात भाजप हरली पण काँग्रेस भोपळाही फोडू शकली नाही. अलिकडेच दिल्लीतील तीनही महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या, त्यात 'आप'चा पुरता 'निकाल' लागून भाजपने 75 टक्के जागा मिळवल्याच, पण काँग्रेसचेही दिवाळे निघाले. त्यापूर्वी 2014च्या लोकसभेच्या निवडणुकांत दिल्लीतील सर्वाच्या सर्व सात जागा काँग्रेसने गमावल्या होत्याच.
तेव्हापासून काँग्रेसच्या पराभवांची मालिका चालूच राहिली. अर्थात दोन-चार पराभवांनी कोणताही राजकीय प्रवाह वा विचार संपत नाही. त्यामुळे काँग्रेस संपली किंवा संपेल, असे मानण्याचे कारण नाही. पण काँग्रेसमध्ये वानवा आहे ती नेतृत्त्वाची. राहुल यांच्या हाती पक्ष सुरक्षित नाही, हे आता उघड गुपीत आहे. जहाज बुडू लागले की आधी ते उंदिरांना उमजते व ते बुडत्या जहाजातून बाहेर उड्या मारू लागतात. काँग्रेसचेही तसेच झाले. बुडत्या काँग्रेसमधून उड्या मारून सोयीच्या व सुरक्षित भाजपच्या जहाजात उड्या मारणाऱ्यांची संख्या कमी नाही, अर्थात अशा उंदिरांना आश्रय देऊन पक्षाला काय फायदा? याचा विचार आता भाजपनेही करायला हवा. कारण ही मंडळी भाजपला आधार न बनता डोकेदुखी ठरण्याची शक्यताच अधिक. असो. असे असले तरी आजही काँग्रेसमध्ये गुणी व उत्साही लोक आहेतच. प्रश्न असा आहे की, त्यांना कार्यरत करायचे, तर राहुलना आधी स्वत:च्या मनावर व जिभेवर ताबा ठेवून या नेत्यांना संधी द्यायला हवी. पण तसे होत नाही. गोव्याच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी वयोवृद्ध दिग्विजय सिंह यांच्याकडे धुरा देण्यात आली. त्यासाठी निकष एकच; ते राहुल यांचे एकनिष्ठ पाठिराखे. त्यांच्यामुळेच काँग्रेस पक्षाला विधानसभेत सर्वाधिक जागा मिळूनही सत्तास्थापनेचा साधा दावाही करता आला नाही. या उलट पंजाबमध्ये अमरिंद्र सिंह यांनी राहुलना निक्षून सांगितले की, तुम्ही पंजाबकडे पाहायचेही नाही. परिणाम हा झाला की, 'आप' व भाजपचे आव्हान मोडीत काढून तिथे काँग्रेसची सत्ता आली. आज स्थिती अशी आहे की, पंजाब वगळता केवळ कर्नाटक या एकाच मोठ्या राज्यात काँग्रेस सत्तेवर आहे. बाकी ठिकाणी एक तर भाजप वा स्थानिक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला सत्तेपासून कैक योजने दूर ठेवले आहे. याचा परिणाम काँग्रेसच्या प्रसारावर नक्की होणार.
उत्तर प्रदेशात राहुलनी आणखीच घोळ घातला. कौटुंबिक कलहात अडकलेल्या अखिलेश सिंह यांच्याबरोबर सलगी करण्याची घाई राहुलना व काँग्रेसलाही भोवली; इतकी की, सोनिया व राहुल यांचे रायबरेली व आमेठी मतदारसंघ ज्या जिल्ह्यात आहेत, तिथेही भाजपच्याच सर्वात जास्त जागा जिंकून आल्या. सिनेमामध्ये गेस्ट आर्टिस्ट असतात. ते दोन-चार सीनपुरते येतात व भाव खाऊन जातात. त्यांचा बोलबालाही होतो. काँग्रेसमध्ये प्रियांका वढेरा अशाच अधून मधून गेस्ट आर्टिस्ट सारख्या येतात व जातात. त्यांना मोठी राष्ट्रव्यापी प्रसिद्धीही मिळते. पुन्हा निवडणुका संपल्यावर त्या जिन्स व टी-शर्ट घालुन वावरायला मोकळ्या. याही वेळी त्या उत्तर प्रदेशच्या प्रचारात आल्या, बरेच काही बोलल्या व गेल्या. परिणाम काहीच झाला नाही.
आता निवडणुका संपल्या. पुढील काही महिने अंतर्मुख होऊन विचार करण्यासाठी आता उसंत आहे. पण तसे न करता राहुल मात्र आजही भाजपवर दुगाण्या झाडण्यातच मश्गुल आहेत. आतापर्यंत जिथे जिथे काँग्रेसचा पराभव होत राहिला, तिथे तिथे स्थानिक पक्ष प्रमुख संजय निरुपम, राज बब्बर, अजय माखन यांनी आपल्या जबाबदारीचा स्वीकार करत आपल्या पदांचे राजीनामे सादर केले. राहुल यांना मात्र हा नियम लागू नाही. ते उपाध्यक्ष पदावर कायम आहेत व त्यांची थोरवी गाण्यात त्यांचे भाट आजही तितक्याच उत्साहात आहेत. पक्ष नेतृत्त्वाबद्दल क्रांतिकारी विचार व्हायला हवा, असे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते व नेते खाजगीत बोलतात. पण माझी खात्री आहे की, पक्षाच्या महासभेत हा विषय आलाच, तरी सर्वजण उच्चारवात राहुल यांचेच गोडवे गातील व त्याना पक्षाध्यक्षपदी बढती मिळावी, अशी मागणी करतील. तसे होईलही. मात्र त्यानंतर काँग्रेसचे काय होईल? सध्या प्रकृती ठीक नसतानाही सोनियांना विरोधी नेत्यांना एकत्र आणून राष्ट्रपतीपदासाठी सामायिक उमेदवार उभा करण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. अशी एकजूट झालीच, तर 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी ती उपयुक्त ठरेल, असा त्यांचा कयास आहे व तो योग्यही आहे. पण यासाठी राहुल काय करतात?
एकूण काय? तर काँग्रेसचे खरे दुखणे बाहेर कुठेही नसून त्याच्याच शीर्षभागी असलेले उपाध्यक्ष राहुल हेच आहे. पण तसे बोलणार कोण? आणि इलाज तरी कशावर व कोण करणार?
-भारतकुमार राऊत
Twitter: @BharatkumarRaut
Updated : 19 May 2017 12:27 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire