मोदींनी फुंकले 2019 च्या लढाईचे रणशिंग!
X
ते दिवस आठवतात? 2011 चा सप्टेंबर महिना होता आणि गुजरातेत गांधीनगरमध्ये तेव्हाचे राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसांचे सद्भावना उपोषण सुरू केले. तीन दिवसांत, त्यापूर्वी व नंतर सारा देश ढवळून निघाला. देशातील विविध धर्म, भाषा व प्रांत यामध्ये परस्पर सद्भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने आपण हे उपोषण आत्मशुद्धीसाठी करत असल्याचे मोदी वारंवार सांगत होते. वास्तविक तेव्हा निवडणुकांचे वारे वाहात नव्हते. कारण लोकसभेच्या निवडणुका आणखी पावणे तीन वर्षांनी जुलै, ऑगस्ट 2014 मध्ये होणार होत्या. अण्णा हजारे नावाचे वादळही निर्माण झालेले नव्हते. सत्ताधारी काँग्रेस व त्याच्या साथीने चालणारे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (युपीए) विविध घोटाळ्यात सापडत होते, हे खरे. पण सत्तेला धोका निर्माण होईल, असे काही घडत नव्हते. पण अशा अस्वस्थ शांततेच्या काळातच मोदींनी हे अनोखे सद्भावना उपोषण करून संथ पाण्याच्या तलावात धोंडा टाकला. त्यामुळे ज्या लहरी तयार झाल्या, त्यांचेच रुपांतर नंतर मोठाल्या लाटांमध्ये होऊन 2014 च्या ऑगस्टमध्ये आलेल्या त्सुनामीत काँग्रेस पार वाहून गेली. त्या धक्क्यातून हा पक्ष व त्याचे साजिंदे अद्याप सावरलेले नाहीत. एखाद्या पंजाबचा अपवाद वगळता काँग्रेसपासून यश दूर दूर पळू लागले. कुस्तीच्या आखाड्यात कोणता मल्ल किती धिप्पाड आहे, यापेक्षा पहिली चाल कोण करतो यावर कुस्तीचा निकाल बराच अवलंबून असतो. 2011 मध्ये मोदींनी असेच पहिल्यांदा चाल करण्याचे व ती जिंकण्याचे धाडस दाखवले व अंतीमत: त्यांनीच काँग्रेसला धोबीपछाड टाकून चीत केले.
गेल्या आठवड्यातही मोदींनी अशीच चाल रचून एका बाजूला काँग्रेस व अन्य विरोधकांना खुले आव्हान तर दिलेच, शिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधील सर्व 32 पक्षांना पुन्हा एकदा आपल्या दावणीला बांधले. अशा चाली रचण्यात कल्पकता तर हवीच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे की, तसे साहसी डाव खेळण्यासाठी ऊरात धमक व मनगटात शक्तीही हवी. हे सर्व गुण मोदींमध्ये असल्याने आता पुन्हा त्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग तब्बल दोन वर्षे आगोदरच फुंकले आहे. या खेळीचा फायदा त्यांना प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीच्या वेळी व त्यापूर्वी होऊ घातलेल्या गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतही होईलच. एका बाजूला काँग्रेस 2014 व उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या दारुण पराभवातून अद्याप सावरलेली नसताना व पक्षात समर्थ नेतृत्वाचा कमालीचा अभाव असताना हा आणखी एक धक्का सोसणे त्या पक्षाला कठीण जाणार, हे निश्चित.
गेल्या आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यापूर्वी मोदींनी एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांचे 'स्नेह भोजन' दिल्लीत आयोजित केले. हे स्नेह भोजन अनौपचारिक असले, तरी त्यात एक ठराव सर्वसंमतीने मंजूर करून घेण्यातही मोदींना यश आले. या ठरावाप्रमाणे मोदींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास तर व्यक्त झालाच, शिवाय 2019च्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निश्चयही व्यक्त करण्यात आला. पुढील आठवड्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ओडिशातील भुवनेश्वरला झाली. त्यामध्ये पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी 'पंचायत ते पार्लमेंट' भाजपचीच सत्ता असावी, असा मनोदय व्यक्त करुन या पुढील काळात सर्व नेते व कार्यकर्त्यांनी त्याच दिशेने व दृष्टीने काम करावे, असे आवाहन केले. 'शत प्रतिशत भाजप' हा भाजपचा निश्चत यापूर्वीच व्यक्त झालेला आहे. आता शहांनी त्याचाच पुनरुच्चार केल्याने यापुढील काळात राज्याराज्यात स्थानिक गरजेनुसार भाजप अन्य पक्षांची मदत व साथ घेणार असला, तरी मुख्य उदि्दष्ट संपूर्ण भारतात सर्व स्तरांवर भाजपचीच सत्ता आण्याचे असणार, हेही उघड झाले. अर्थात यात वावगे असे काहीच नाही. बहुपक्षीय लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याचा अधिकार आहेच. स्वातंत्र्यानंतरची पहिली अनेक वर्षे देशात सर्व पातळ्यांवर काँग्रेसचीच सत्ता होती. आता भाजपने तसाच निश्चय केल्यास 'तोब तोबा.. लोकशाही बुडाली!' असा आक्रोश कुणी करण्याचे कारण नाही. 1971ची 'गरीबी हटाव' निवडणुक जिंकल्यानंतर तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 'विकास को साथ - काँग्रेस को हात' अशी काव्यत्मक घोषणा देऊन राज्याराज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या. काँग्रेसजन व त्यांना साथ देणाऱ्या माध्यमांना याचे विस्मरण न झालेले बरे असो.
स्नेहभोजन व नंतरची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक यातील मोदी व शहा यांची भाषणे वेगवेगळ्या शैलींची व पातळ्यांवरील असली, तरी त्यांचे वक्तव्य तालबद्ध होते हे नक्की. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, तर शहा पक्षाचे प्रमुख. त्यामुळे साहजिकच मोदी राष्ट्रीय पातळीवर व सर्व समाजाला उद्देशून बोलले तर शहा यांचा भर पक्षाच्या प्रगतीवर व कल्याणावरच होता. पण त्यातील समान सूत्र 2019 च्या लोकसभा निवडणुका हेच होते. एका बाजूला 'सर्वत्र भाजप'चा नारा शहा भुवनेश्वरला देत असताना दुसऱ्या बाजूला मोदींनी मात्र समाजातील दुबळ्या वर्गाच्या विशेषत: मुस्लिम समाजातील गांजलेल्या व पीडित वर्गाच्या उद्धाराची आवश्यकता प्रतिपादन करून त्रिवार तलाकच्या अशास्त्रीय दुष्ट रुढीच्या विरुद्ध आवाज उठवला. मोदींच्या या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवार तलाकच्या रुढीविरुद्ध आवाज न उठवणारे महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी चूप बसलेल्यांसारखे आहेत, असे ठणकावले. उत्तर प्रदेशच्या गेल्या विधानसभा निवडणुकांत अनेक मुस्लिमांनी भाजपच्या बाजूने मतदान केले होते, असे नंतरच्या विश्लेषणात स्पष्ट झाले. आता मोदी व योगींनी मुस्लिम महिलांना आपल्या बाजूने ओढले, तर त्याचा परिणाम केवळ उत्तर प्रदेश नव्हे, तर इतर अनेक राज्यांत - विशेषत: मुस्लिम मतदारांची संख्या अधिक असलेल्या जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांतही जाणवेल. आतापर्यंत मुसलमान मते एकगठ्ठा काँग्रेस व त्याच्या सहकारी पक्षांकडे जात होती. या एकाधिकारशाहीला खिंडार पडल्यास त्याचा मोठा परिणाम निवडणुकांच्या निकालावर होईल. मोदी व योगीची चाल त्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक भुवनेश्वरमध्ये घेण्याची चालही अशीच योजनाबद्ध व दूरगामी विचार करून खेळलेली आहे. ओडिशात गेली तीन टर्म्स बिजू जनता दलाच्या नवीनबाबू पटनाईक यांची राजवट आहे. नवीनबाबू भाजपच्या छावणीत येण्यास तयार नाहीत. वारंवार प्रयत्न करूनही ते साध्य झालेले नाही. ओडिशा विधानसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या निवडणुकांबरोबरच होणार आहेत. अशा वेळी ही बैठक भुवनेश्वरला झाली. त्याच्या बातम्या राज्यभर टीव्ही व वर्तमानपत्रांतून झळकत राहिल्या. त्यातच मोदी बैठकीसाठी भुवनेश्वरला आले, तेव्हा बंद गाडीतून न येता त्यांनी 'रोड शो' केला. हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा मोदींना पाहायला जमले. स्वत: मोदी गाडीतून उतरून पायी चालले व त्यांनी जनतेच्या अभिवादनाचा स्वीकार केला. या साऱ्याचा परिणाम उडीया जनतेवर होणारच. जर नवीनबाबूंच्या अभेद्य गडाला खिंडार पाडण्यात मोदी व शहा यशस्वी झाले, तर 'शत प्रतिशत भाजप'च्या दिशेने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल.
असो. मोदींनी 2019च्या लोकसभा निवडणुकांचे रणशिंग तर फुंकले आहे. अशा युद्धाच्या नौबती झडू लागतात, तेव्हा सैनिक वीर कामे बाजूला सारून शस्त्रे पारजतात व अंगावर चिलखत चढवतात. झाडांवर निवान्त बसलेले पक्षी मात्र घाबरून कलकलाट करत सैरावैरा उडू लागतात व गावातली भटकणारी कुत्री शेपुट पायात घालून आसरा शोधू लागतात. येणाऱ्या दोन वर्षांत शूर सैनिक कोण व भित्रे पक्षी व कुत्रे कोण तेही उघड होईलच.
-भारतकुमार राऊत
Twitter: @BharatkumarRaut