काश्मिर – सर्वात आधी भारतीयत्व
X
काश्मिरमधील वास्तव हे नेहमीच वेड्यासारखे गुंतागुंतीचे राहीले आहेः हा काही नायक विरुद्ध खलनायक असा गल्लेभरु पाश्चिमात्य सिनेमा नाही, जिथे बंदुका घेतलेले लोक हे चांगले आहेत तर दगड घेतलेले वाईट… दल लेकचे पाणी हे बऱ्याच काळापासून रक्तरंजितच आहे आणि या काळोखात आशेला कुठे स्थान आहे हे आपल्याला माहीत नाही. भरकटलेले तरुण जे लष्कराच्या जीपपुढे उभे रहाण्यापूर्वी कोणताही विचार करणार नाहीत, फुटीरतावादी जे स्वतःला असलेला पाठिंबा निवडणूकांच्या माध्यमातून जोखून बघणार नाहीत, पण सीमेपलीकडील धोकादायक शेजाऱ्याकडून आदेश स्वीकारतील. सैन्यातील जवान जे स्थानिकांकडे प्रजा म्हणून पहातात नागरिक म्हणून नाही. राजकारणी जे खोरे जळत असताना काहीच करत नाहीत, नोकरशाही जिचा कल हा परिस्थिती जैसे थे ठेवण्याकडेच असतो, माध्यमे ज्यांचे भितीदायकरीत्या ध्रुवीकरण झालेले आहे, राष्ट्रवादाच्या नावाखाली द्वेषाचे झेंडे फडकावणारे लोक, असे लोक जे चकमकीत मारल्या गेलेल्या नागरिकांचा हिशेब ठेवतात, पण जवानांचा मात्र नाही, अतिरेकी जे मृत्यूला एखाद्या खेळाप्रमाणे वागवितातः काश्मिरमध्ये किंवा काश्मिरबाहेर आज कोणीतरी व्यक्ती अशी आहे का, जी शुद्ध विवेकाला धरुन ताठ मानेने उभी राहू शकेल?
आपल्यासमोर नैतिक आणि राजकीय पोकळी आ वासून उभी आहे आणि अजूनही परिस्थितीचे गांभीर्य आणि नाविन्यपूर्ण उपाययोजन करण्याची तातडीची गरज आपल्या लक्षातच येत नाही. राजकीय संवाद पुन्हा सुरु करा, ओमर अब्दुल्ला माझ्या टीव्ही शोमध्ये मला म्हणतात. बरोबर आहे, पण मी म्हणतो कोणाबरोबर संवाद? डोक्याला बंदूक लावलेली असताना संवाद होणे शक्य आहे का? किंवा पाकिस्तानचीच री ओढणाऱ्या फुटीरतावाद्यांबरोबर संवाद शक्य आहे का? टुरिझम आणि टेररिझमपैकी एकाची निवड करा, पंतप्रधान आपल्याला सांगतात. पण हे इतके सोपे आहे का, मि. मोदी? केवळ दहशतवादाचा अंत हा सत्तर वर्षांचा रक्तरंजित इतिहास असलेल्या या वादावरचा राजकीय उपाय ठरु शकतो का? आम्हाला चांगले शासन द्यायचे आहे, मेहबूबा मुफ्ती मला सांगतात. हो अर्थातच तुम्हाला द्यायचे आहे, पण हे तुमचे सरकार आहे त्यामुळे तुमचे वडील ज्याबद्दल बोलायचे तो हिलिंग टच कुठे आहे? काश्मिर आपल्या हातून निसटून जात आहे, फारुख अब्दुल्ला इशारा देतात, दगडफेक करणारे या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी लढत आहेत. हो डॉ. अब्दुल्ला, पण मग माझा प्रश्न आहे की काश्मिर आपल्या हातून का निसटून जात आहेः याचे कारण हे तर नाही की जेंव्हा अनेक वर्षे तुम्ही सत्तेत होतात, तेंव्हा तुम्ही ही समस्या सोडविण्यासाठी फारसे प्रयत्नच केले नाहीत. या सगळ्याला जिथून सुरुवात झाली, त्या १९८७ सालच्या निवडणूकांमध्ये गडबड करणाऱ्या काँग्रेसबरोबर जोडीने काम करणारे तुम्हीच होतात ना? काश्मिर हीच मुख्य समस्या असल्याचे पाकिस्तान सातत्याने ओरडूनओरडून सांगत असतोः ती आहे, पण तुम्ही ही मुख्य समस्या कशी हाताळालः धर्माच्या नावाखाली अधिकाधिक बंदूका आणि दहशतवादी पाठवून तर नक्कीच नाही. देशाच्या एका सीमेवर दहशतवादाचे बळी ठरता तर दुसऱ्या सीमेवर दहशवाद्यांना पोसणारे असे तुम्ही कसे असू शकता? केवळ रोखथाम काही कामाची नाही, आता युद्धाची घडी आली आहे, एक निवृत्त जनरल मला सांगतात. खरंच सर? युद्ध कोणाबरोबर, खोऱ्यातील तुमच्या स्वतःच्या नागरिकांबरोबर का अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्याबरोबर? गेली दोन दशके आम्ही छळछावण्यांमध्ये रहात आहोत, एक काश्मिरी बुद्धिवादी मला सांगतात. खरं आहे तुमचे सरः पण हिंसेच्या या संस्कृतीविरोधात, ज्यामुळे एका नागरी समाजाला जबरदस्तीने कैदेच्या सावटाखाली जावे लागले, किती कश्मिरींनी आवाज उठवला आहे? आम्हा काश्मिरी पंडीतांना आणि आमच्या दुर्दैशेला विसरु नका, एक ओळखीचा आवाज मला सांगतो. नाही, ते आपण कधीच करता कामा नये, पण आपण हे विसरतो का, की या हिंसेमध्ये मोठ्या संख्येने बळी पडलेले निरपराध हे स्थानिक काश्मिरी मुसलमान आहेत? हे ‘धर्मयुद्ध’ असल्याचे एक जिहादी व्हिडीओ सांगतोः दयाळू अल्लाच्या नावाखाली ‘धर्म’ युद्धात निरपराधांची हत्या होते काय?
वरीलपैकी बऱ्याच प्रश्नांवर कदाचित उत्तरे नाहीत. कदाचित यापुढे ही उत्तरे शोधण्याची आपली इच्छाच नाही, कारण त्यातून आपला वैयक्तिक किंवा एकत्रित ढोंगीपण उघड होण्याची भीती आहे. कदाचित टोकाचीच भूमिका घेण्याची आपली इच्छा आहे कारण राखाडी रंगछटांपेक्षा काळे आणि पांढरे चित्र बघण्यातच आपल्याला समाधान मिळते, किंवा सत्यशोधक म्हणवून घेण्यापेक्षा उदारमतवादी किंवा राष्ट्रवादी म्हणवून घेण्यातच समाधान वाटते? शिवाय, गोंगाट आणि स्टुडीओमधील लढवय्यांच्या या युगात संवाद हवाच कोणाला आहे, जेंव्हा शीरा ताणून आवेशयुक्त भाषणानेच टीआरपी आणि ट्विटर ट्रेंडस् दोन्ही मिळते? त्यामुळे, नागरिकांकडून जवानांना लक्ष्य केल्याचा व्हिडीओ पाहून आपल्या शूर जवानांच्या पाठीशी निःसंशय अनेक जण उभे रहातात. मात्र काश्मिरी व्यक्तिला मानवी ढाल बनवून जीपला बांधून फिरविल्याच्या घटनेवर टीका करणारा त्यापैकी क्वचितच एखादा असेल. तुम्हाला ते जुने हिंदी सिनेमे आठवतात का, ज्यामध्ये खलनायक गावकऱ्यांना दोरीने ओढत नेत असे? तेंव्हा आपण दचकत असू. आता मात्र जयघोष करुः अरे, शेवटी ते भारतीय लष्कर आहे, आणि खाकीतील माणसांना आपण प्रश्न विचारु शकत नाही. आणि जेंव्हा काश्मिरी लोक जवानांना पाणी देतात किंवा त्यांना अपघातात मदत करतात किंवा जवान पुरात अडकलेल्या काश्मिरींची सुटका करतात तेंव्हा आपण त्यावर मोठ्या आवाजात चर्चाही करु? देश विरुद्ध नागरिक ही गोष्ट एवढी वरचढ आहे की बाकी सगळे बाजूला रहाते. उदारमतवादी आवाज हा काश्मिरी बलिदानाबद्दल बोलत न्यायाची मागणी करतो तर राष्ट्रवादी इंडीया फर्स्टच्या नावाखाली शुद्धीकरणाची मागणी करतात. दूरगामी उपाययोजना राहू दे, पण किमान जैसे थे स्थिती बदलू शकेल या दृष्टीने आवश्यक अर्थपूर्ण संवादासाठी अवकाश शोधण्याची दोन्ही बाजूंची इच्छा दिसत नाही.
हो, मीदेखील इंडीया फर्स्ट मानतो. मात्र माझ्या इंडीया फर्स्टच्या संकल्पनेत देशाकडे केवळ भौगोलिक सीमांनी निश्चित केलेला एक जमिनीचा तुकडा याच दृष्टीने पहाणे अंतर्भूत नाही किंवा प्रत्येक समस्येकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पहाणेही.. माझ्या इंडीया फर्स्टमध्ये मी इंडीयन्स फर्स्ट मानतो, मग ते काश्मिरी असोत किंवा जवान किंवा कायद्याचे पालन करणारा कोणीही नागरिक. बंदुका कडवट राजकीय संघर्ष सोडवू शकत नाहीत किंवा आझादीच्या रोमॅंटीक कल्पनाही साकारू शकत नाहीत. यावर तेंव्हाच उपाय मिळेल जेंव्हा तुम्ही लोकांची मने जिंकून घ्याल, माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी सांगितल्याप्रमाणे ‘इन्सानियत’ हाच भविष्यातील उपाययोजनांचा निकष असला पाहिजे. पण इन्सानियतमध्ये काही धोके पत्करावे लागतात, जसे वाजपेयी यांनी लाहेर बस यात्रा करुन पत्करला किंवा मनमोहन सिंग यांनी श्रीनगर- मुझ्झफराबाद बस सेवेद्वारे पत्करला. पंतप्रधान मोदी यांनी देखील पीडीपी बरोबर युती केली तेंव्हा हा धोका पत्करला, मात्र त्यानंतर त्यांनी माघार घेतली. त्यांचा सहकारी सुचवित आहे, त्यानुसार विश्वास निर्माण करण्याचा उपाय म्हणून पंतप्रधान खोऱ्यातील काही भागांतून अफ्सा का मागे घेत नाहीत आणि त्यानंतर त्यांच्या सुशानच्या वचनावर का काम करत नाहीत? तुम्ही लष्करी बळाने मने जिंकून घेऊ शकत नाही, अगदी तसेच जसे सीमापार दहशतवादाचा वापर करुन पाकिस्तान काश्मिर मिळवू शकत नाही.
जेंव्हा मी टीव्ही आणि नंतर समाजमाध्यमांवरुन काश्मीरबाबतची माझी तीव्र चिंता आणि अस्वस्थता व्यक्त केली, तेंव्हा सायबरविश्वातील स्युडो राष्ट्रवाद्यांची फौज माझ्या मागे लागली. हिटलरच्या जर्मनीत ज्यू हक्कांविषयी बोलणाऱ्या ‘राष्ट्रविरोधकाप्रमाणेच’ मी असल्याचे मला क्षणभर वाटले. काश्मिरी भारतीय आहेत, चिरडून टाकावेत किंवा हाकलून द्यावेत असे किडे नाहीत. जवान आणि नागरिक दोघांनाही त्यांचे हक्क आहेत, ज्यांचे रक्षण झालेच पाहिजे, पण विश्वासाची तूट भरुन काढल्याशिवाय आपण हे करु शकत नाही. आपण दहशतवाद आणि त्याच्या लक्षणांशी लढले पाहिजे, आपल्या भारतीय बांधवांशी आपण लढू शकत नाही. दगडाला उत्तर म्हणून पेलेट गन (छऱ्यांची बंदूक) वापरल्यास द्वेष आणि हिंसेचे चक्र सुरु होईल, ज्यामुळे माणूसकीच हिरावली जाईल. बंदूक आणि दगडफेक करणाऱ्यांमध्ये महात्मा गांधी जाऊन उभे राहीले असतेः तसे नैतिक बळ असलेले कोणी आपल्याकडे आहे का?
ता.कः शुक्रवारी रात्री या व्हिडीओ युद्धामुळे उदास झालो असताना, मी माझा स्वतःचा एक व्हिडीओ लावला. काश्मिर की कली या सिनेमाचा युट्यूब व्हिडीओ आणि त्यातील माझ्या अतिशय आवडत्या गाण्याचा व्हिडीओः दिवाना हुआ बादल. शर्मिला टोगोरची प्रेमाराधना करणारा शम्मी कपूर पाहून मन शांत झालेः काश्मिर कधीतरी पुन्हा यासारखी धून गुणगुणेल का?
- राजदीप सरदेसाई
अनुवाद – सुप्रिया पटवर्धन