अमर्यादशील पुरुषोत्तम!
X
भारताच्या धर्मनिरपेक्ष ढाच्यावरच घाव घालणाऱ्या बाबरी मशीद प्रकरणात 25 वर्षांनंतर का होईना, न्यायालयाला जाग आली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसेच केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यावर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवून खटला चालवण्यात यावा आणि त्याची रोज सुनावणी होऊन, तो दोन वर्षांत निकालात काढावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही सद्बुद्धी सुचण्यासाठी इतका काळ जायला लागावा? सीबीआयने या प्रकरणाचा योग्य रीतीने पाठपुरावा न केल्याने आरोपींना शिक्षा होऊ शकली नाही. खटल्यातील कच्चे दुवे दूर करणे उत्तर प्रदेश सरकारला शक्य होते; पण ते काम त्यांनी केले नाही, अशी खरडपट्टीही न्यायालयाने काढली आहे. आता बाबरी पतनाच्या वेळचे उ.प्र.चे मुख्यमंत्री कल्याणसिंग यांना राजस्थानच्या राज्यपाल पदावरून हाकलावे, अशी मागणी केली जात आहे. पण मुळात त्यांची या पदावर नेमणूक झालीच कशी? कारण मशिदीचे रक्षण करण्याची हमी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या नात्याने न्यायालयात शपथेवर दिली होती. तरीही त्यांच्या छत्रछायेखाली मशीद पाडली गेली. ज्या व्यक्तीने घटना, कायदा गुंडाळून ठेवला होता त्याची मानगूट पकडून प्रथम तुरुंगात रवानगी करणे जरूरीचे होते. परंतु ते झाले नाही. बाबरीकांडाबद्दल अटलबिहारी वाजपेयी यांनी खेद व्यक्त केला होता. मात्र त्यांनी अडवाणींना गृहमंत्री व उपपंतप्रधान केले आणि मुरली मनोहर जोशींना केंद्रात मंत्रिपद दिले! अर्थात वाजपेयींना पंतप्रधानपद अडवाणींमुळेच मिळाले, हेही खरेच आहे. गुजरात दंगलीनंतर राजधर्म न पाळणाऱ्या नरेंद्र मोदींची मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, असे वाजपेयी-जसवंतसिंग-अरुण शौरींचे मत होते. पण अडवाणींनी मोदींना संरक्षण दिले. या मुद्द्यावर आपले चालत नाही, असे पाहून वाजपेयींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा होता; पण ते घडले नाही.
भाजप नेते सुंदरसिंग भंडारींनी मशीद पाडण्याच्या घटनेशी कारसेवकांचा संबंध नसल्याचे वक्तव्य केले. म्हणजे संघ-भाजपची मंडळी इतकी ढोंगी आहेत, की केलेल्या ‘पराक्रमा’ची कबुलीही देण्याची त्यांची हिंमत नाही. ‘बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल, तर त्या सैनिकांचा मला अभिमान आहे’, असे उद्गार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते. बाबरीनंतरच्या देशभरच्या दंग्यात 2000 लोक मेले, निष्पाप लोकांच्या जिवांची बाळासाहेबांना चिंता नव्हती. तरीदेखील लोकशाहीविरोधी कृत्याचे समर्थन करणाऱ्या बाळासाहेबांचे स्मारक महाराष्ट्रात सरकारच्याच आशीर्वादाने होणार आहे! गंमत अशी की, अयोध्याकांड घडून गेल्यावरच मनोहर जोशी यांच्या नेतृत्वखालील शिवसैनिक तेथे जाऊन पोहोचले होते! तरीही मशीद आपणच पाडल्याचे फुकाचे ‘श्रेय’ शिवसेनेने घेतले. असो! 1998 साली वाजपेयींनी सुंदरसिंह भंडारींना बिहारचे राज्यपाल केले.
आधी भाजपवाले म्हणत होते की, मशीद पाडण्याची कृती ‘उत्स्फूर्त’ होती. ‘कुणी गाय मारली, तर त्याच्या तंगड्या तोडू’ अशी धमकी मध्यंतरी एका भाजप नेत्याने दिली. पण मशीद पाडणे हे हातपाय तोडण्यापेक्षा खूप मेहनतीचे काम आहे. त्यासाठी हत्यारे लागणार. प्रशिक्षण, नियोजन लागणार. त्यामुळे ‘उत्स्फूर्त’ युक्तिवाद बोगस आहे. तो सुनियोजित कटच होता. बाबरी पतनाबद्दल संघपरिवाराला ना खेद वाटतो, ना खंत. मात्र ‘तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात दुःखद दिवस होता’ असे अडवाणी म्हणाले. त्यांना शोक अनावर झाला असेल, तर त्यांनी कसले प्रायश्चित्त करून घेतले? दंगलपीडित हिंदू-मुसलमानांचे अश्रू पुसले? त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन व्हावे म्हणून प्रयत्न केले? उलट पुढे ज्यांच्या राजवटीत गुजरात दंगली झाल्या, त्या मोदींमागे अडवाणी ठामपणे उभे राहिले...
त्यानंतर ‘द टेलिग्राफ’ साठी लिहिलेल्या लेखात अडवणींनी असे सूचित केले की, मशिदीच्या विध्वंसामुळे मी हादरून गेलो नाही, तर त्यामुळे ‘शिस्तबद्ध पक्ष’ या भाजपच्या प्रतिमेचे नुकसान झाले, त्याचेच खरे मला वाईट वाटले. ‘कारसेवकांनी माझ्या चळवळीची हानी केली’ असे उद्गार अडवाणींनी आपल्याजवळ काढल्याचे दिवंगत प्रमोद महाजनांनी म्हटले होते. म्हणजे राम मंदिरासाठी आंदोलन करावे, एवढेच आपले उद्दिष्ट होते, असे सांगून व त्यासाठी ‘लक्ष्मणा’ची साक्ष काढून (लक्ष्मण ऊर्फ महाजन रथयात्रेचे सूत्रधार होते), भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने आंदोलकांपासून पद्धतशीरपणे अंतर ठेवले. ‘मशीद तोडू नका’ असे राजमाता विजयाराजे शिंदे, मुरली मनोहर जोशी, अडवाणी प्रभृती नेते सांगत होते, असा दावा केला जात आहे. समजा हे खरे मानले, तरी लाखो कारसेवक तेथे भजनपूजन करण्यासाठी जमले होते, असे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वास वाटत होते का?
शिवाय काहींनी खेद-पश्चात्ताप व्यक्त करायचा व हजारो भाजप कार्यकर्त्यांनी मिठाई वाटायची, हे चित्र लोकांनी पाहिले आहे. कारसेवकांनी आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार काही वार्ताहरांनी पत्रकार परिषदेत केली, तेव्हा राजमाता विजयाराजे शिंदे त्यांच्यवरच बरसल्या...
अंजू गुप्ता नामक नेक पोलीस अधिकारी घटनास्थळी होते. भाजप नेते आपल्या भाषणांतून कारसेवकांना चेतवत होते, मशीद पाडली गेल्यावर जणू स्वर्गप्राप्ती झाल्याच्या थाटात परस्परांना आलिंगन देऊन त्यांनी आनंद व्यक्त केला, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते. तेव्हा मशिदीच्या पतनाबद्दल नक्राश्रू ढाळणारे काही भाजप नेते आज त्याबद्दल जाहीरपणे जनतेची माफी मागायला तयार नाहीत. उमा भारती तर राममंदिरासाठी फासावर जायला तयार आहेत आणि शिवसेनाप्रमुखपद हे पंतप्रधानपदापेक्षा मोठे असणारे ‘सामना’कार म्हणतात की, अयोध्येत राम मंदिर होण्यासाठीची चळवळ हे राष्ट्र उभारणीचे कार्य आहे. आता दोन वर्षांनी सीबीआयच्या हाती कोणताही पुरावा लागणार नाही. हा कट नव्हताच, असे भाजपवाले सिद्ध करतील. आरोपी सुटतील. आणि मग महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या घटनात्मक लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या रस्त्यावर आपण मार्गक्रमण करून विकास करूया, अशी हाक देण्यास हेच अमर्यादशील पुरुषोत्तम मोकळे असतील...
हेमंत देसाई