Home > News Update > चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे

चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे

चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे
X

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा आजवरच्या बखरकारांना,इतिहासाच्या अभ्यासकांना, ललित लेखकांना, चित्रपट व नाट्य निर्माता-दिग्दर्शकांना आणि अभिनय करणाऱ्या कलाकांराना सतत प्रेरणादायी ठरला आहे, देशातील अनेक जण या अद्वितीय पराक्रमी सामर्थ्यवान पुरुषोत्तमाचे चरित्र अभ्यासून भारावले गेले आहेत, आणि ह्या वीरपुरुषाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले आहेत, यापुढेही ते मांडत राहाणार आहेत, कारण शिवचरित्र अखंड 'प्रेरणादायी' तर शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे प्रसंगी बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा 'गनिमी कावा' अवलंबणारे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान ! नरव्याघ्र नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान !

येत्या माघ वद्य नवमीला म्हणजे १७ फेब्रुवारीला सिंहगडावरील तानाजीरावांनी घडविलेल्या देदीप्यमान शौर्यदिनाला इंग्रजी ताररखेप्रमाणे ३५० वर्षे होत आहेत. छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी आपली निष्ठा ठेवण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा एक रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो काय अन त्यांच्याशी इतका समरस होतो काय, की स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून जातो अन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अमोल देह स्वामीनिष्ठेचरणी अर्पण करीत धारातीर्थी पडतो काय. म्हणून तानाजी मालुसऱ्यांसारखे वीरपुरुष आपली जीवनगाथा लिहून अजरामर झाले ! युगानुयुगे येतील पण तानाजी मालुसरे यांचा इतिहास सातत्याने नवीन पिढीला प्रेरणादायी ठरत राहणार आहे.

चलतचित्रपटातील पडद्यावरील एखादी कलाकृती श्रेष्ठ ठरते ती दिग्दर्शकामुळे. हल्ली चित्रपटसृष्टीला ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची भुरळ पडलेली आहे. बाजीराव मस्तानी , पद्मावत ,झाशीची राणी, आणि आता येत असलेला तानाजी ,पानिपत यांसारखे चित्रपट इतिहासावर प्रकाश टाकण्याचा किंवा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि नकळत इतिहासाची हानी करतात.आजपर्यंत तानाजीरावांच्या पराक्रमी इतिहासाची भुरळ कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी व्ही शांताराम, ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाळे आणि आता ओम राऊत यांना पडल्याने ही ऐत्याहासिक कलाकृती भव्य स्वरूपात मांडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापूर्वीच्या या चार चित्रपटांचा सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा आढावा....

अजय देवगण-ओम राऊत यांचा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ (२०२०) -

'हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का' अशा दमदार डायलॉगसह 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’, असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींच्या शौर्याची गाथा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.

तान्हाजी मालुसरे यांना भारतीय इतिहासातील सर्वोत्तम योद्धा मानले जाते. त्यांचे आयुष्य म्हणजे यश आणि त्यागाचा अद्वितीय प्रवास म्हणता येईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडील अनेक रत्नांपैकी एक असलेल्या या शूरवीराचा जीवनपट अजय देवगन याने साकार केला आहे. आपल्या मातृभूमीच्या प्रेमापोटी जीवाची बाजी लावणारा जिगरबाज मराठा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या अविस्मरणीय कलाकृतीतून मराठ्यांनी झुंजवलेले जिगरबाज युद्ध आणि देशाचा नकाशा पालटण्यास भाग पाडणारे तान्हाजीचे जीवन उलडणार आहे.

पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाणापण होता. या कोंढाण्यावर पुन्हा भगवा फडकवण्याचे स्वप्न शिवरायांसह स्वराज्यातील प्रत्येकानं पाहिलं आणि पराक्रमी सरदार तानाजी मालुसरे यांच्यासह मावळ्यांनी कोंढाणा जिंकलाच. या लढाईत तानाजींना वीरमरण आले. तान्हाजी तल्लख बुद्धीचा योद्धा असला तरी एक पिता, पति, बंधू आणि भूमिपुत्र देखील होता. तानाजींचे शौर्य, पराक्रम, जिद्द आणि नेतृत्व हा प्रत्येक पैलू तसेच त्यांच्या बलिदानाची साक्ष या चित्रपटातून उलगडत जाणार आहे.

लढवय्या तानाजींची ही वीरगाथा आधुनिक तंत्रज्ञान वापरुन बनवली आहे. त्यामुळे भव्य स्वरूपात पडद्यावर पाहणं हा नक्कीच विलक्षण अनुभव असेल. अंगावर शहारे आणणारी दृश्ये ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मध्ये साकारण्यात आली असून तान्हाजींचे जीवन आणि त्यांनी मुघलांवर मिळवलेला विजय 3 डी प्रसंगांतून ७० एमएम पडद्यावर जिवंत होत आहे. अभिनेत्री काजोल तानाजीच्या पत्नीची सावित्रीबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. कपाळी ठसठशीत कुंकू, नाकात नथ, डोक्यावर पदर आणि करारी नजर अशा तिच्या मराठमोळ्या लुकचं तुफान कौतुक होत आहे. तसेच अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे तर कोंढाण्याचा अधिकारी असणाऱ्या उदयभानू राठोड या अधिकाऱ्याच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. पद्मावती राव, अजिंक्य देव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत. तानाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले आहे. १५० कोटी रुपयांचा बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सिनेमाविषयी बोलताना अजय देवगन म्हणाले की, “भारताच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या तान्हाजीसारख्या शूरवीराची कहाणी सादर करताना मला अतिशय आनंद वाटतो आहे. मला ही कथा आपल्या देशाच्या नव्हे तर जगाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली पहायची आहे.”

कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा 'सिंहगड'(१९२२) –

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंनी आपल्या देशात चित्रपट युगाला सुरुवात केली तेव्हा ते मुकपट होते. परंतु त्यांचा चेहरा प्रामुख्याने पौराणिक होता, तर कलामहर्षी बाबूराव पेंटरानी आपल्या सिंहगड चित्रपटाद्वारे १९२२ ला ऐतिहासिक चेहरा दिला.तानाजी या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना मला कलामहर्षी बाबुराव पेंटरांची आठवण आली. मराठी चित्रपटसृष्टी यांच्यामुळे वाढली आणि बहरली. बाबूराव पेंटर यांना शिवचरित्रावरील चित्रपटांचे जनक म्हणावे लागेल, शिवरायांवर नाटके खूप झाली पण चित्रपट करणारे पहिले बाबूराव पेंटरच.

आता येत असलेला नरवीर तानाजी वरील चित्रपट आपल्यासाठी नवीन असेल, पण बाबूराव पेंटर यांनी १९२२ साली 'सिंहगड' हा पहिला शिवचरित्रपर चित्रपट बनवला. त्यानंतर १९३३ साली व्ही शांताराम यांनी 'सिंहगड' तर १९५२ मध्ये राम गबाले यांनी 'नरवीर तानाजी" हा चित्रपट काढला होता. चित्रपट मूक असल्यामुळे कथाविषय सर्वाना माहिती असेल असाच हवा म्हणून कादंबरीकार ह. ना. आपटे यांची २००३ साली लिहिलेली 'गड आला पण सिंह गेला' ही सुप्रसिद्ध ऐत्याहासिक कादंबरी निवडली. बाबुरावांच्या या चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य केले. हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरल्याने या चित्रपटाला तुफान गर्दी होऊ लागली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्यात आली. चित्रपटाच्या उत्पन्नाचे आकडे प्रसिद्ध होत असल्यामुळे यावर सरकारचेही लक्ष गेले आणि या चित्रपटाला पहिल्यांदा 'करमणूक कर' बसवला व या चित्रपटापासून हिंदुस्थानात तो कायम झाला. पुढे काही वर्षांनी लंडन येथे जागतिक प्रदर्शनात 'सिंहगड' हा चित्रपट दाखवला गेला, त्यावेळी परीक्षकांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रावर पुढील वाक्य आहे- *This picture is an out standing example of sincerity of direction.*

ह्या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका बाबूराव पेंटर यांनी स्वतः केली. त्यांच्या बरोबर तानाजी मालुसरे ( बाळासाहेब यादव ), उदयभानू ( झुंजारराव पवार), शेलार मामा यांची भूमिका 23 वर्षीय व्ही. शांताराम यांनी, देवलदेवी ( गुलाबबाई ) कमल कुमारी ( द्वारकाबाई ) अशा प्रमुख भूमिका होत्या. या सर्व भुमिका इतिहासाच्या पानातून बाहेर आल्यासारख्या वाटत. कारण या व्यक्तिरेखा पेंटरांच्या नजरेतून प्रथम कागदावर उमटल्या आणि त्यानंतर त्यांना वास्तवात उतरले गेले. कल्ले, दाढ्या, पगडया, कमरची घोंगडी,मुंडासे, हातातल्या काठ्या, पहरेकऱ्यांच्या खाटा, पायातल्या जाड तळाच्या वहाणा, कानातले मोठे मोठे वाळे, हातातली कडी वैगरे सर्व अगदी हुबेहुब असे. हा चित्रपट सिंहगडावर चित्रित करण्याचा बाबुराव पेंटरांचा मानस होता पण पैशाअभावी तो फोल ठरला आणि पन्हाळगडावर चित्रीकरण करण्यात आले.

बाह्यचित्रीकरणाचा हिन्दुस्थानातला हा पहिलाच प्रयत्न. ऐत्याहासिक लढाया परिणामकारक दिसाव्यात यासाठी कोल्हापुरातील एक वस्ताद बाळासाहेब आणि झुंजारराव यानां शास्त्रोक्त शिक्षणासाठी दररोज येत असे. दांडपट्टा, घोडदौड, तलवार बाजींचा सराव चालू असताना एके दिवशी अचानक आग आग असा ओरडा ऐकू आला. बाबुरावांच्या स्टुडिओला आग लागली होती आणि ती चहूबाजूला पसरत जाऊन स्टुडिओ खाक झाला. यापूर्वी प्रदर्शित केलेले सैरंध्री, वत्सलाहरण, दामाजी या चित्रपटाच्या लोकमान्य टिळक आणि नटवर्य गणपतराव जोशी यांच्यावरील लघुपटाच्या निगेटिव्ह भक्ष्यस्थानी पडल्या. मात्र एका तगड्या तरुणाने धाडसाने त्या आगीत प्रवेश करीत मोठ्या कष्ठाने बाबुरावांनी स्वतः बनविलेला देशी कॅमेरा वाचविला. आगीची बातमी ऐकून छत्रपती शाहू महाराजही आपल्या खडखड्याचे घोडे दौडवत आले. तर कोल्हापूरचे श्रीमंत सरदार नेसरीकर यानी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भांडवल पुरवण्याचे कबूल केले. हे दु:ख विसरुन बाबुरावांनी पन्हाळा किल्ल्यांवर बाह्यचित्रण सुरु केले.

पन्हाळ्याच्या तीन दरवाज्यापाशी पाऊणशे मंडळींचा मुक्काम होता, चित्रपटात काम करणाऱ्या स्त्रिया पहाटे उठून नास्ता-जेवकरीत तर चित्रपटातले नायक-खलनायक पाणी भरण्याचे तसेच प्रसंगी जेवण वाढप्याचे सुध्दा काम करीत. शुटींग दरम्यानच्या काळात एकदा घोड्याला टाच मारताना घोडे बेफाम झाले आणी बाबुराव घोड्यावरुन खाली पडले. तानाजी कोंढाण्याचा डोणगिरी कडा चढतो आहे अश्या प्रसंगासाठी आजूबाजूच्या गावात सनदी पाठवून पिळदार दोनशे मावळ्यांना हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर मोहिमेवर निघतानाच्या दृश्यात एक वृध्द बाई तानाजीला आशिर्वाद देते हा प्रसंग हुबेहुब येण्यासाठी कुशिरे गावातील एका स्त्रीची निवड केली होती.

हातघाईच्या लढाईत तानाजी,सूर्याजी एकत्र दिसावेत यासाठी विशिष्ट् तंत्र वापरुन दिवाळीला लावण्यात येणाऱ्या चंद्राज्योतीच्या दारुचा उपयोग केला तसेच प्रथमच मस्किंगची पध्दत अमलात आणली. सिंहगड मधील शेवटचं लढाईचं दृश्य रात्रीच्या वेळी चित्रित करायचं होतं, तानाजी व शेलारमामा घोरपडीच्या आधाराने सिंहगडावर निवडक मावळ्यांसह चढून जातात व किल्ल्याचा दरवाजा उघडून मराठा सैन्याला आत घेताना रात्रीच्या गडद अंधारात लढाईची एकच धुमचक्री चालू होते, मशालीच्या उजेडात ही दृश्ये चित्रीत होऊ शकत नव्हती. शेवटी बाबुराव पेंटरानी एक युक्ती शोधून काढली, दिवाळीला चंद्रज्योत हा दारुकामाचा एक प्रकार पेटवण्यात येतो, या चंद्राज्योतीचा खुप लख्ख पांढरा प्रकाश पडतो, या चंद्राज्योतीतील दारु दृश्यांच्या आवश्यकतेप्रमाणे एका लांब रांगेत रांगोळी प्रमाणे ठेवून ती मशालीने पेटवून त्या उजेडात लढाईची दृश्ये चित्रीत केली जात. चंद्राज्योतीचा बराचसा धुर वाऱ्याने वाहून जात असे आणी थोडाफार धूर दृश्यावर आला तरी तो मशालीचा धूर आहे असे वाटत असे. रात्रीच्या दृश्यांचे चित्रण विजेच्या दिव्याशिवाय आपल्या देशात पहिल्यांदा हे असं पार पडलं. पेन्टरानी तयार केलेले भव्य ऐतिहासिक देखावे,पडद्यांवर आलेली रोमांचकारी दृश्ये, उत्कट देशप्रेमाने ओथंबलेले वीररसाचे प्रसंग, बाळासाहेब यादवांची नरवीर तानाजीची व झुंजारराव पवारांची उदयभानुची उत्कृष्ट दणदणीत भुमिका यामुळे पुर्वीच्या सर्व मुकपटापेक्षा सिंहगड जास्त लोकप्रिय व लाभदायक झाला.

चित्रपट पुर्ण झाल्यानंतर तो पाहण्यासाठी श्रीमंत नेसरीकर, श्रीमंत बापुसाहेब इंगळे, श्रीमंत कागलकर अशी राजघराण्यातील मान्यवर मंडळी उपस्थीत होती. तेव्हाच्या मुंबईतील नॉव्हेल्टी नाट्यगृहात बाबुरावांनी स्वत: रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराज,नरवीर तानाजी, उदयभानू, मावळे यांची भव्य पोस्टर्स लावली. गेटवर काही लाकडी ऐत्याहासिक प्रसंग उभे केले. त्यामूळे ती पाहाण्यास लोकांची एकच गर्दी उसळली. मुंबईला नॉव्हेल्टी सिनेमागृहात हा चित्रपट सलग सोळा आठवडे चालला होता, तो पडद्यावर आला तेव्हा पावसाचे दिवस होते, आणि पावसात या चित्रपटाने सोळा आठवड्याचा रन मिळवला होता हे या चित्रपटाच सर्वात मोठं यश होतं, आपल्या देशात चित्रपटांची सुरुवात झाल्यावर इतका लॉंग रन मिळवणारा हा पहिलाच चित्रपट, संपूर्ण मुंबईचे वातावरण शिवकालींन झाले होते.

नुकतीच हिंदू-मुस्लिम दंगल शमली होती त्या पार्श्वभुमिवर प्रख्यात म्यॅजेस्टिक टॉकिजने हा चित्रपट नाकारला होता. प्रचंड गर्दी पाहुन पहिल्या खेळाला पोलीसांना पाचारण केले होते, अखेर चित्रपट सुरु झाला, टायटल्स सुरु होत पडद्यांवर तानाजी आणि शिवाजी महाराजांचे दर्शन झाले, प्रेक्षकानी टाळ्या वाजवून हर हर महादेवसह दोघांच्या नावाच्या उस्फूर्त आरोळ्या सुरु झाल्या. उदयभानूच्या वाराने जेव्हा तानाजी कोसळतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. तर ऐंशी वर्षाच्या तडफडार म्हाताऱ्या शेलार मामाच्या जोराच्या घावाने उदयभानू गतप्राण होत धरणीवर पडल्यानंतर तर प्रेक्षकानी मोठ्यांदा टाळ्या वाजवून उस्फूर्त भावना व्यक्त केल्या. आणि भावाचे दु:ख न आवरणाऱ्या सूर्याजीला प्रेमाने जवळ घेत महाराज म्हणतात, 'सूर्याजी हा शिवाजी गेला आणि तानाजी राहिला ' ही पाटी अखेरीस पाहिल्या नंतर पुन्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावले.

प्रभातच्या चित्रपती व्ही शांताराम यांचा ' सिंहगड '(१९३३) –

स्वातंत्र्याचा मंत्र देणारा ऐत्याहासिक 'सिंहगड' हा बोलपट काढण्याचे प्रभात फिल्म कंपनीने ठरवले. सिंहगड किल्ला सर करण्याची शिवाजी महाराजांची इच्छा तानाजी मालुसरे या त्यांच्या शूर हिंदू-मराठा व विश्वासू सरदाराने स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून, स्वतःच्या हिमतीच्या आणि हुशारीच्या बळावर पूर्ण केली. पण यासाठी त्याला आपल्या प्राणांचे मोल द्यावे लागले.

१९२२ च्या बाबुराव पेंटरांच्या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी शेलारमामांची भूमिका केली होती. पण यावेळी त्यांनी स्वतःला पूर्णपणे पडद्याआड ठेवले. शंकराराव भोसले यांनी या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका तर कमलकुमारी (लीला चंद्रगिरी), देवलदेवीची (प्रभावती), छत्रपती शिवाजी महाराज (गणपत शिंदे) उदयभानू ( बाबुराव पेंढारकर ), बुवासाहेब (घेरेसरनाईक) मा. विनायक (जगतसिंह) केशवराव धायबर (शेलारमामा) यांनी भूमिका अविस्मरणीय केल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना शांताराम यांनी नेहमीच्या रुळलेल्या चाकोरीतून न जाता काहीतरी वेगळ्या पद्धतीने अनेक दृश्य चित्रित केली, रात्रीच्या लढाईचा प्रसंग चित्रित करताना त्यांनी अंधारात दोन्ही पक्षांचे तुंबळ युद्ध चालू असताना तोफा डागायचे ठरवले, तोफातून एका पाठोपाठ एक याप्रकारे गोळे बाहेर पडत असताना दारूचा जो प्रकाश पडेल, त्या प्रकाशात युद्धाचा प्रकाश व काळोख असा फार गमतीचा खेळ पडद्यावर दिसत होता. ही दृश्ये या चित्रपटाची प्रमुख आकर्षण ठरली.

पोवाडा हा संगीतप्रकार या चित्रपटातून प्रथमच पडद्यावर आला. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा जोरात सुरु होता. त्याचवेळी या चित्रपटातून लहरी हैदर यांनी रचलेला पोवाडा 'चल उठ गड्या, चल वीर गड्या, घेऊन भाला, ढाल गड्या, शूर शिपाई शिवाजीचा तू, मर्द मराठा मावळचा ' या वीरश्रीयुक्त पोवाड्याने जनक्षोभ अधिक उसळत असे. गोविंदराव टेबे यांनी अत्यंत जोशपूर्ण संवाद लिहून अभिनय व संगीताप्रमाणे चित्रपटासाठी लेखणीचं कसब सिद्ध केलं. बाबुराव पेंटरांचा तानाजीवरील चित्रपट मॅजेस्टिक मध्ये प्रदर्शित होऊ शकला नव्हता, मात्र व्ही शांतारामांचा चित्रपट त्याठिकाणी प्रदर्शित झाला आणि तुफान चालला. जुन्या जमान्यातील हा चित्रपट, त्यावेळी विजेच्या दिव्यावर किंवा बंदिस्त साउंड प्रूफ स्टुडिओत चित्रीकरण होत नसे. चित्रपट म्हणावा तेव्हढा गतिमान झाला नव्हता तरीही त्याकाळी 'सिंहगड' प्रचंड गाजला आणि त्यातुन प्रभातच्या चालकांना पुढचे रंगीत चित्रपट निर्माण करण्याची उमेद मिळाली.

ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाले यांचा ' नरवीर तानाजी ' ( १९५२ ) –

मुंबईच्या कोहिनूर टॉकीजचे मालक श्री कान्हेरे यांनी एक ऐत्याहासिक चित्रपट करायचे ठरवले. साहजिकच शिवरायांचा पराक्रमी शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे हा विषय त्यांनी निवडून बाबुराव पैलवान(तानाजी मालुसरे), मा. विठ्ठल (छत्रपती शिवाजी महाराज), दुर्गाबाई खोटे (जिजामाता), रायबा (मदनमोहन ) शेलारमामा (केशवराव धायबर ) यांच्याबरोबर नायिका सुलोचना, वसंतराव पैलवान असा कलाकारांचा संच निवडला. भगवानदादांच्या स्टन्ट चित्रपटांचा नायक म्हणून बाबुरावांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले होते. त्यांचे व्यक्तिमत्व रांगडे होते. त्यांची पैलवानी देहयष्टी तानाजीच्या भूमिकेला शोभून दिसणारी होती. पण मराठी संवाद बोलण्याची त्यांची बोंब होती. या चित्रपटातील त्यांचे सारे संवाद प्रख्यात गीतकार ग दि माडगूळकर यांच्या आवाजात डब केले गेले.

चित्रीकरणासाठी प्रभात स्टुडिओच्या आवारात मोठमोठे सेट्स उभारले. दिग्दर्शक म्हणून राम गबाले यांच्यासाठी हा चित्रपट वेगळा होता. यापूर्वी त्यांनी ऐत्याहासिक चित्रपट केला नव्हता. यात लढाया, कुस्त्या, वाघाशी झुंज, दांडपट्ट्याने हत्तीची सोंड छाटणे असे प्रसंग चित्रित करायचे होते. भगवानदादा यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीकरणाला सुरुवात झाली. हत्तीची सोंड कापण्याच्या प्रसंगासाठी हत्ती पाहिजे होता, ग दि माडगूळकर यांच्या ओळखीने औंध संस्थानाचा हत्ती मिळाला. हत्ती व्ही.आय.पी असल्याने त्याचं खाणं -पिणं, राहाणे आणि माहुताची बडदास्त ठेवली गेली होती.

स्टुडिओमध्येच उदयभानूच्या वाड्याचा मोठा सेट उभारला होता. रात्रीचा सीन होता. लढाई चालू असताना तानाजी दांडपट्टा चालवीत सपासप शत्रूसैन्य कापत हटवत येतो. लढाई अगदी निकारावर आल्यावर उदयभानु हत्तीवर स्वार होऊन तानाजीच्या दिशेने अंगावर येत असताना तानाजी हत्तीची सोंड हातात धरून कापतो, खरे तर तो प्रसंग अवघड होता. त्या काळात आतासारख्या स्पेशल इफेक्टच्या सोयीचा अभाव होता, ट्रकच्या टायरची ट्यूब कापून सोंडेसारखी हत्तीच्या सोंडेला दुमडून बांधली होती. सर्व तयारी झाली. माहूत त्याच्या भाषेत हत्तीला चुचकारत होता. हत्तीनं पळत येणं आणि तानाजीने सुरक्षित अंतरापर्यंत दांडपट्टा फिरवीत जाणे एव्हढाच शॉट हवा होता, सर्व तयारी झाली, तानाजी ठरलेल्या अंतरापर्यंत आला आणि हत्तीने एकदम रागावून ' हे काय बांधलय' या भावनेने पक्की बांधलेली इनर ट्यूब रागाने उडवून टाकली आणि नासधूस करू लागला.

दुसरा प्रसंग तानाजी जंगलात वाघाशी सामना करतो असा सीन होता. त्यासाठी शिकाऊ वाघ कुठे मिळेल तिथे जायचं ठरलं. पंढरपूरच्या सर्कशीत असा वाघ आहे असे समजल्यानंतर चित्रपटाचा चमू तिकडे गेला. एका बंदिस्त धर्मशाळेत झाडांच्या फांद्या, मोठमोठे दगड लावून जंगलाचा देखावा उभा करून सेट उभारला. वाघाच्या रिंगमास्टरला तानाजी सारखे केस, भरदार मिश्या, कपडे, डोक्यावर मराठेशाही पगडी, वैगरे वेशभूषा करून तयार ठेवला. वाघाचे स्वतंत्र आणि एकत्र शॉट्स घ्यायची योजना पक्की केली. कॅमेराच्या लेन्सपुरती मोकळी जागा ठेऊन डुप्लिकेट तानाजी आत सोडला. वाघाने रिंगमास्टरला आवाजावरून ओळखले परंतु आपला हा रोजचा भिडू आज हे काय करून आलाय म्हणून वाघाने डरकाळी फोडत त्याची पगडी आणि केसांचा विग उडवून दिला. मात्र पुढे बाबुराव पेहेलवानांच्या सोबत हवे तसे शॉट्स चित्रित झाले. चित्रीकरण संपल्यानंतर सर्कशीच्या चमूला एक ग्रुप फोटो काढायचा होता, वाघ मध्ये आणि त्याच्या बाजूला तो रिंगमास्टर उभा राहिला. नेहमी फोटोमध्ये मध्यभागी महत्वाच्या जागी उभे राहणारे मान्यवर यावेळी मात्र फोटोत दूर दूर उभे राहिले. हा चित्रपट सुद्धा भरपूर चालला.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/869932643457088/

रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

Updated : 10 Jan 2020 10:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top