कोरोनाचे संकट: यमुनेचे पाणी झाले स्वच्छ!
X
कोरोनामुळे जगभरात दीड लाखांच्यावर लोक मृत्यूमुखी पडले आहेत तर लाखो लोक कोरोनाने बाधीत झाले आहेत. तर जागतिक अर्थव्यवस्थादेखील या संकटामुळे विस्कळीत झाली आहे. पण पर्यावरणीयदृष्ट्या या संकटाचा विचार करायचा तर ही आपत्ती इष्टापत्ती ठरली आहे. लॉकडाऊनमुळे देशातील उद्योग आणि कारखाने बंद आहेत, तर नागरिकांच्या फिरण्यावरही बंधने असल्याने नद्यांमधले प्रदुषण कमी होत असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे. दिल्लीत यमुना नदीचे पाणी स्वच्छ झाले आहे. कारखान्यांमधला औद्योगिक आणि रासायनिककचरा बंद झाला आहे, लोकांना नदीमध्ये जात येत नाहीये त्यामुळे प्रदुषण कमी झाले असून पाणीही स्वच्छ दिसत आहे.
दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने यमुना देखरेख समितीला यासंदर्भातला अहवाल सादर केला आहे. त्याचबरोबर पाण्याचा उपसा कमी झाल्याने पाण्याचा प्रवाहदेखील ४ पटींनी वाढल्याने हे पाणी स्वच्छ झाल्याने निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. गंगा नदीची पाण्यातील प्रदुषण कमी होऊन पाणी स्वच्छ झाल्याचा अहवालसुद्धा याआधीच आला आहे. तर अनेक शहरांमधील प्रदुषणाची पातळीही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे निरीक्षणही मांडण्यात आले आहे.