देशातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १७ हजार ६५६
X
देशभरात गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढून आता ती १७ हजार ६५६वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ५५९ झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी २ हजार ८४२ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला तरी सध्याकोरोना रुग्णांची दुप्पट वाढ होण्याचा वेग मंदावला आहे. सुरूवातीच्या टप्प्यात दर साडे तीन दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होत होती आता ही संख्या ७.५ दिवसात दुप्पट होत आहे.
रुग्णसंख्या दुपटीनं वाढीचा वेग कमी करण्यावर सरकारचा भर आहे. पुद्दूचेरीमधील मेह, कर्नाटकातील कोडागू आणि उत्तराखंडमधील पुरी गढवाल या जिल्ह्यांमध्ये गेल्या २८ दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. देशातील ५९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सध्या नाहीयेत ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान देशात महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश इथं कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.