प्रोस्टेट (Prostate) कॅन्सर
X
प्रोस्टेट ग्रंथी पुरुषातील प्रोजोत्पादन संस्थेची भाग असून स्पर्म वाहून नेण्यासाठी लागणारे सिमेन या ग्रंथित बनविले जाते. प्रोस्टेट ग्रंथीचे साधारणपणे ४x३x२ सेमी आकारमान व१५ ते २० ग्रॅम वजन असते. मूत्राशयाच्या खालच्या अंगाला, रेक्टमच्या समोर व पुबिक हाडाच्या पाठीमागे ती वसलेली असते. प्रोस्टेट ग्रंथी बाहेरून आवरणाने (capsule) सुरक्षित केलेली असून कॅन्सर रोग वाढण्यास हे आवरण सुरुवातीच्या काळात मज्जाव करते तसेच रोग बाहेर पसरला असल्यास उपचार पद्धती सुद्धा बदलावी लागते. त्यामुळे या आवरणाचे महत्व अधिक आहे.
प्रोस्टेट कॅन्सर
जगामध्ये फुफ्पुसाच्या कॅन्सरनंतर हा रोग दुसऱ्या क्रमांकावर असून दर वर्षी ११ लाख रुग्ण नव्याने प्रोस्टेट कॅन्सरने पिडीत होतात तर ३ लाखाच्या वर रुग्ण दगावतात. कुठल्याही क्षणी जवळपास ४० लाख लोक या रोगाने पिडीत आढळतील इतके याचे प्रमाण जास्त आहे. भारतामध्ये मात्र जगाच्या तुलनेत या रोगाचे प्रमाण कमी असून साधारणपणे असून दर वर्षी २० हजार रुग्ण नव्याने प्रोस्टेट कॅन्सरने पिडीत होतात तर २ हजारवर रुग्ण दगावतात. मुळात हा रोग ६५ वर्षानंतर होणारा असून भारतात सरासरी वयोमान ६८ वर्ष आहे. भारतात हा रोग नोटीफायबल नसल्या कारणाने केवळ कॅन्सर रजीस्ट्री मध्ये नोंद होणारी संख्याच इथे उपलब्ध आहे. त्यामुळे हा रोग आपल्याकडे कमी प्रमाणत नोंद होतो.
प्रोस्टेट कॅन्सर होण्याची काय कारणे आहेत ?
वैद्यकीय शास्त्रामध्ये कमालीची प्रगती झालेली असताना देखील प्रोस्टेट कॅन्सर नेमका कश्यामुळे होतो याचा अजूनतरी उलगडा झालेला नाही. शास्त्रज्ञांनी काही रिस्क फॅकटर जे या रोग करू शकतात खाली दिले आहेत.१. वाढते वय (१० मध्ये ६ कॅन्सर ६५ वर्षानंतर आढळतात)२. स्थूलपणा३. स्मोकिंग४. भोगोलिक (अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया इत्यादी मध्ये अधिक तर आशियाई देशामध्ये कमी)५. अनुवांशिक, BRCA जनुकीय बदल, लिंच सिन्ड्रोम यांच्यामध्ये कॅन्स चे प्रमाण जास्त आढळून आले आहे. (सोया, सोलेनियम, ग्रीन टी, विटामिन E, योगा, व्यायाम, फळे, पालेभाज्या तसेच रेड मिट वर्ज्य करणे इत्यादी मुळे कॅन्सर चे प्रमाण कमी होते)
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-
कॅन्सरच्या सुरुवातीच्या काळात खालील लक्षणे असू शकतात.
- लघवी सारखी येणे.
- लघवी साठी झोपेतून उठावे लागणे.
- लघवी करताना त्रास होणे.
- लघवीतून रक्त येणे.
- लघवीला जळजळ करणे.
कॅन्सर पसरलेला असल्यास
- तोल जाणे / पक्षघाताचा झटका येणे.
- शरीरावरील नियंत्रण सुटणे.
- पाठीत दुखणे.
- हाड मोडणे.
तपासणी:- डीजीटल रेक्टल तपासणी (DRE), रक्त तपासणी, PSA, लघवी तपासणी, छातीचा एक्सरे, एम.आर.आय. स्कॅन व स्पेक्ट्रोस्कोपी करावी किंवा आर्थिकदृष्टया परवडत नसेल तर कमीत कमी सोनोग्राफी करावी. TURP किंवा ट्रान्सरेक्टल बायोप्सी करून कॅन्सर असल्याची पुष्टी करावी. रोग अडव्हांस असल्यास बोन स्कॅन किंवा स्पायनल कॉर्डचा एम.आर.आय. स्कॅन करून हाडांची तपासणी करावी.
प्रोस्टेट कॅन्सरचे उपचार कसे करावे?
प्रोस्टेट कॅन्सर अतिशय धीम्या गतीने वाढणारा रोग असून सुरुवातीच्या काळात त्याची लक्षणे लवकर समजत नाहीत. तसेच सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेटचे आकारमान वाढलेले दिसणे म्हणजे कॅन्सर झाला असे समजू नये. इन्फेक्शन, बी.पी.एच (bening prostate hyperplasia) व कॅन्सर ही प्रोस्टेट मोठी होण्याची करणे होत.
बी.पी.एच ( bening prostate hyperplasia ):
एकूणच हा कॅन्सरचा प्रकार नसून वाढत्या वयोमानामुळे तसेच बदलणाऱ्या हार्मोन्सनुसार प्रोस्टेट ग्रंथी अतिशय संथपणे वाढत जाते. प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढत्या आकारमानामुळे आत असणारी मुत्रानालिका दाबल्यामुळे लघवी करण्यास अडचण होते. प्रोस्टेट ग्रंथीचे आकारमान छोटे असल्यास किंवा काही त्रास नसल्यास केवळ निरीक्षण केले जाते, गरज भासल्यास हार्मोन्सचे उपचार केले जातात किंवा शस्त्रक्रिया करून मुत्रानालिकेचा आकार मोठा केला जातो. बी.पी.एच कॅन्सरमध्ये परावर्तीत होत नसल्यामुळे तसी चिंता करण्याची गरज नसते.
प्रोस्टेट कॅन्सर:
प्रोस्टेट कॅन्सरचे उपचार रुग्णाचे वय व शारीरिक क्षमता, रोगाची आक्रमकता, रोगाचा टप्पा (localised vs locally advanced vs metastatic), रुग्णाची प्राधान्य व उपचारांचे दुष्परिणाम इत्यादी गोष्टी वर अवलंबून असते. यामध्ये केवळ निगारणी करणे, शत्रक्रिया करणे, रेडीओथेरपी व हार्मोन्स थेरपी इत्यादी उपचार पद्धती उपलब्ध आहेत.रोगाची आक्रमकताही रक्तातील PSA लेवल व पाथोलोजीच्या ग्रेड (gleson score) नुसार ठरवली जाते.
निरिक्षण करणे (active survillance):
रोग सुरुवातीच्या टप्प्यात असणे, रुग्णास त्रास नसणे, अतिशय धीम्या गतीने रोग वाढणे, रोग आकारमानाने कमी असल्यास रुग्णास कुठलेही उपचार न करता केवळ ठराविक अंतराने तपासणी साठी बोलावून निरिक्षणाखाली ठेवले जाते. यास्तही रुग्णाची मानसिक तयारी मात्र करून घ्यावी लागते. रोग आक्रमक झाल्यास किंवा रुग्णाला त्रास होत असल्यास वेळीच आक्रमक उपचार करता येतात.
शत्रक्रिया करणे:
रोग प्रोस्टेट ग्रंथी मधेच असल्यास शत्रक्रिया करून संपूर्ण रोग, बाजूच्या लीम्फ नोड गाठी काढल्या जातात. शत्रक्रिया पारंपारिक पद्धतीने पोट फाडून किंवा लाप्रोस्कॉपी करून किवा अत्याधुनिक अश्या रोबोटिक पद्धतीने केले जाते. शत्रक्रिये नंतर लघवीवरती कंट्रोल जाणे किंवा शारीरिक संबंध ठेवण्यास अडचण येवू शकते त्यामुळे उपचार पध्दती नक्की करण्या पूर्वी डॉक्टरशी सखोल चर्चा करावी.
रेडीओथेरपी:
रेडीओथेरपी देण्याच्या पद्धतीवरून ई.बी.आर.टी. (EBRT) व ब्राकीथेरपी (Brachytherapy) असे दोन प्रकार पडतात.
- ई. बी.आर. टी (EBRT):
रेडीओथेरपी मध्ये जास्तीत जास्त रेडीएशन रोगास व कमीत कमी रेडीएशन बाजूंच्या महत्वाच्या अवयवांना ठेवून त्यांच्याशी संबंधित दुष्परिणाम कमी ठेवण्या साठीकिमान ३डी- सी.आर.टी किंवा आ.एम.आर.टी. उपचार पध्दती अनुसरावी. रेडीओथेरपी साधारणपणे दररोज, आठवड्यातून पाच वेळा असे दीड महिन्यापर्यंत दिली जाते. लघवीस जळजळने, जुलाब होणे इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात.
- ब्राकीथेरपी (Brachytherapy):
तांदळाच्या आकाराचे रेडीओथेरपीचे सिड्स प्रोस्टेट मध्ये ठेवले जातात व रुग्णास घरी पाठविले जाते. हे रेडीओथेरपीचे सिड्स प्रोस्टेट ला कमी शक्तीचे रेडीएशन हळू हळू देत राहतात. यामुळे ई.बी.आर.टी. संबंधित दुष्परिणाम तसेच उपचार कालावधी कमी ठेवता येतो.
हार्मोन्स थेरपी:
प्रोस्टेट ग्रंथीची वाढ टेस्टोस्टेरोन हार्मोन्सवर अवलंबून असते. त्यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरोन कमी करणे यासाठी हार्मोन्स थेरपीचा वापर केला जातो. किंवा टेस्टोस्टेरोन बनविणारे अंडाशय शत्रक्रिया करून काढले जाते.
डॉ. दिलीप निकम,
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई