राज्यात कोरोना निर्बंध कमी होणार? आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान
X
राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सध्या लागू केलेले निर्बंध कमी केले जातील का अशी चर्चा आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. " मुंबई-पुण्यातही संख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल, त्यामुळे आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे", अशी माहीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे, ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते. पाच फिरत्या दवाखान्यांचे टोपे यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले.
सध्या राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्या-टप्प्याने कमी केले जातील असंही टोपे यांनी सांगितले. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल, असा अंदाज देखील त्यांनी वर्तवला आहे. राज्यात पहिल्या डोसचं 92 टक्के लसीकरण झालं असून 55 ते 60 टक्के लोकांना दुसरा डोस दिला गेल्यातीही माहिती त्यांनी दिली. पण कोव्हॅक्सीनचा राज्यात काही प्रमाणात तुटवडा आहे आहे, याबाबत केंद्राने काळजी घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण कधी केले जाईल याबाबत माहिती देतांना त्यांनी सांगितले की, ICMR च्या सूचनेनुसार लसीकरण सुरू केले जाणार आहे. जगात लहान मुलांपासून सर्वांना लसीकरण करण्यात येतंय या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करेल असंही टोपे यांनी सांगितले.