खासगी डॉक्टरांना 15 दिवस करावी लागणार कोरोनाच्या रुग्णांची सेवा...
X
राज्य सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांनी १५ दिवस सरकारी आणि महापालिका रुग्णालयात कोव्हिड-१९ रुग्णांची सेवा करावी असे आदेश जारी केलं आहेत.
५५ वर्षाखालील डॉक्टरांना यात सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी हे आदेश जारी केले आहेत.
सरकारच्या आदेशानुसार...
१५ दिवस कोव्हिड-१९ रुग्णालयात सेवा बंधनकारक
डॉक्टरांनी त्यांना काम करण्याच्या ठिकाणाची माहिती द्यावी
आदेश न पाळल्यास मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाच्या कोडचं उल्लंघन मानलं जाणार
एपिडेमिक कायद्यांतर्गत डॉक्टरांवर होणार कारवाई
डॉक्टरांचं लायसन्स होणार रद्द
याबाबत बोलताना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संचालनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले,
“५५ वर्षाखालील आणि जुने आजार नसलेल्या डॉक्टरांनी कोव्हिड रुग्णालयात सेवा द्यावी. यासाठी पत्र जारी करण्यात आलं आहे. डॉक्टरांना १५ दिवस सरकारी किंवा मुंबई महापालिका रुग्णालयात सेवा द्यावी लागेल. बुधवारपासून (आजपासून) खासगी डॉक्टर स्वत: पुढे येवून कोव्हिड-१९ रुग्णालयात सेवा देवू शकतात."
मुंबईत पहाणीसाठी आलेल्या केंद्रीय टीम ने कोरोनाबाधितांची संख्या ७५ हजारावर पोहोचू शकते. असा अंदाज वर्तवला होता. मुंबई महापालिकेने त्या दृष्टीने तयारी करण्यास सुरूवात केली आहे. खासगी डॉक्टरांना बंधनकारक करण्यात येणारी सेवा ही याच उपाययोजनांचा भाग मानली जात आहे.
खासगी डॉक्टरांना सरकारचं पत्र महाराष्ट्र मेडिकल काउंसिलतर्फे पाठवण्यात आलं आहे.
याबाबत बोलताना महाराष्ट्र मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले,
“आम्हाला सरकारकडून ४ मे ला हे पत्र आलं आहे. आम्ही, हे पत्र मंगळवारी मुंबई परिसरातील २५००० खासगी डॉक्टरांना पाठवलं आहे”