Home > हेल्थ > रक्तदानात मुंबईसह महाराष्ट्रात लक्षणीय वाढ

रक्तदानात मुंबईसह महाराष्ट्रात लक्षणीय वाढ

रक्तदानात मुंबईसह महाराष्ट्रात लक्षणीय वाढ
X

महाराष्ट्र शासनाने मागील काही वर्षात ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं मात्र, आपल्या आरोग्यसेवा व्यवस्थेसाठी एक मूलभूत घटक असणारा, सुरक्षित आणि पुरेसा रक्ताचा पुरवठा होईल याची निश्चिती करणे हे अजूनही एक प्रचंड मोठे आव्हान होतं आणि ते आव्हान पेलत सद्यस्थितीला महाराष्ट्र रक्ताचा पुरवठा करण्यात देशात नंबर एक आहे.

१९९८ मध्ये ऐच्छिक रक्तदान ४७% होतं. २०१८-१९ या वर्षात तब्बल ९९% ऐच्छिक रक्तदान झालं आहे. विशेषतः मुंबईत गेल्या २ दशकात ऐच्छिक रक्तदानात लक्षणीय वाढ झाल्याची माहिती मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेने दिली आहे. मुंबईत २०१८-१९ या वर्षात १८५० ऐच्छिक रक्तदान शिबिरांमधून ३.१२ लाख पिशव्या रक्त संग्रहित करण्यात आले. ऐच्छिक रक्तदानासंबंधी जनजागृतीमुळे त्याचं प्रमाणात १९९८ मधील ४७ टक्क्यांवरून २०१८-१९ मध्ये ९९ टक्क्यांपर्यंत वाढलं. विशेष म्हणजे रक्तातून पसरणाऱ्या संसर्गांमध्येही लक्षणीय घट झाली आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे प्रमुख डॉ. अरुण थोरात यांनी ‘मॅक्स महाराष्ट्र’ला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहराकरीता दरवर्षी अंदाजे ३ लाख रक्त युनिटची गरज असते. पण त्यापेक्षा जास्त युनिट रक्त हे रक्तदात्यांच्या माध्यमातून उपलब्ध होते. मुंबईत ६० सरकारमान्य रक्तपेढय़ांच्या माध्यमातून रक्तदानशबिरे आयोजित करण्यात येतात. २०१६-१७ या वर्षात एकूण ३,९०६ रक्तदान शिबिरे घेण्यात आली. वर्षभरात ३ लाख १ हजार ३०६ दात्यांनी रक्तदान केलं. २०१६ मध्ये रक्तदानाची टक्केवारी ९८ टक्के इतकी होती. २०१९ मध्ये ती १ टक्क्याने वाढली.

सात जिल्ह्यांनी केले १०० टक्के रक्त संकलन

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात २७ हजार रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून १६ लाख रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून रक्त संकलनात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. राज्यात ९७.५४ टक्के एवढ्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदान झाले आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये ३३२ रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्त संकलन आणि त्याची साठवणूक केली जाते. त्यापैकी गडचिरोली, हिंगोली, जालना, रत्नागिरी, सातारा, सिंधुदूर्ग आणि वाशिम या जिल्ह्यांनी १०० टक्के रक्त संकलन करून महत्वाचे योगदान दिले आहे.

राज्यात ३५२ परवानाधारक रक्तपेढ्या कार्यरत असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषाप्रमाणे लोकसंख्येच्या एक टक्के रक्त संकलन असणे आवश्यक आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी ८ लाख असून लोकसंख्येच्या प्रमाणात १२ लाख रक्त पिशव्यांचे संकलन आवश्यक आहे. मात्र, गेल्या वर्षात १६ लाख रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन करुन महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरला आहे. स्वैच्छिक रक्तदानामार्फत मिळालेले हे रक्त अशक्त माता, बालके, अपघातग्रस्त रुग्ण, कर्करुग्ण, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताच्या अन्य आजारांसाठी वापरले जाते.

एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो, कारण या महिन्यात महाविद्यालय, विद्यापीठ यांना सुट्या असतात. त्यामुळे तरूणाईचं रक्तदान कमी होतं. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या, सोसायटी, रेल्वे स्टेशन, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा अशा ठिकाणी जाऊन रक्तसाठा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे रक्तदान करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहतो असं राज्य रक्त संक्रमण परिषद (SBTC) संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं.

Updated : 21 Nov 2019 7:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top