लिव्हर (Liver) कॅन्सर
X
लिव्हर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून साधारणपणे त्याचे १.३ ते १.६ किलो इतके वजन असते. याची पोटामध्ये वरच्या भागात उजव्या अंगाला ठेवण केलेली असून ते चोहोबाजूंनी फासळ्यानी संरक्षित केलेले असते. लिव्हरचे उजवा व डावा असे दोन मोठे भाग (लोब) असतात. कॉडेट व कॉड्रेट असे दोन छोटे भाग (लोब) असतात. लिव्हरमध्ये बाईल व प्रथिने बनवली जातात. तसेच डीटोक्षीफीकेशन करणे व मेटाबोलिक प्रक्रियेत मदत करणे, अ, ड, क, बि१२, इत्यादी अत्यावशक जीवनसत्व व मिनरल्स यांचा साठा करणे, इत्यादी कार्य असतात.
लिव्हर कॅन्सर
दरवर्षी जगामध्ये ८ लाख रुग्ण लिव्हर कॅन्सरने पिडीत होतात. तसेच जवळपास ७.५ लाख रुग्णांचा या कॅन्सरमुळे मृत्यु होतो. या रोगाचे प्रमाण भारतामध्ये १० हजार रुग्ण पिडीत होतात अशी नोंद आढळते. तर जवळपास तितकेच रुग्ण दर वर्षी मृत पावतात. वरील आकडेवारी पाहता या कॅन्सरने होणाऱ्या मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याची मुख्य कारणे रोगाची नंतरच्या टप्प्यात माहिती पडणे. त्यासोबतच याच्या उपचारामध्ये म्हणावी तशी प्रगती झालेली नाही. मद्यपान करणे, हिप्याटायटीस इन्फेक्शन या कारणांमुळे भारतामध्ये या रोगाचे प्रमाण वाढत असून सिक्कीम व मिझोरोम या राज्यात जास्त रुग्ण आढळतात. महाराष्ट्राचा विचार केल्यास बार्शी येथे सर्वात जास्त रुग्णांची नोंद आढळते.
लिव्हर कॅन्सर होण्याची करणे काय आहेत ?
जवळपास ८० टक्के लिव्हर कॅन्सर हा लिव्हर सिरोसीसने बाधीत असणाऱ्या रुग्णांमध्ये होतो. लिव्हर सिरोसीस होण्याची अनेक करणे असून हिप्याटायटीस बी किंवा सी इन्फेक्शन, अल्कोहोल तसेच नॉन अल्कोहोल लिव्हर डीसीज ही मुख्य करणे आहेत. साधारणपणे लिव्हरचा कॅन्सर ४० ते ७० वर्ष या वयामध्ये आढळतो. तसेच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये याचे प्रमाण कमी म्हणजे चारास एक असे आहे.
लिव्हर कॅन्सरची लक्षणे व तपासणी:-
कावीळ होणे
पोटात दुखणे
पोट सुमारणे व पोटात पाणी होणे
श्वास घेण्यास त्रास होणे
भूक न लागणे
वजन कमी होणे
तपासणी :- रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, ट्रायफेजिक सी.टी. स्कॅन, व AFP, LDH इत्यादी रक्त तपासणी कराव्यात. सी.टी. स्कॅन किंवा सोनोग्राफीच्या मार्गदर्शनखाली तुकडा काढून रोग असल्याची खात्री करावी.
लिव्हर कॅन्सर कसा टाळल?
वर उल्लेख केल्याप्रमाणे जवळपास ८० टक्के लिव्हर कॅन्सर लिव्हर सिरोसीस मुळे होतो. लिव्हर सिरोसीस होण्याची हिप्याटायटीस बी किंवा सी इन्फेक्शन व अल्कोहोल ही दोन मुख्य करणे आहेत. अल्कोहोल वर्ज्य करणे तसेच हिप्याटायटीस बी किंवा सी इन्फेक्शन ही इन्फेक्शन रक्तातून संक्रमण होतात. त्यामुळे इन्फेक्शन असणाऱ्या रुग्णांची सुई वापरणे, पिशवीतील रक्ताची तपासणी करणे इत्यादी काळजी घेतल्यास इन्फेक्शन कमी होऊ शकते.
लिव्हर कॅन्सरचे उपचार कसे करावे?
शरीरातील इतर अवयवांपेक्षा लिव्हरचे वेगळेपण म्हणजे लिव्हरचा काही भाग कापल्यास ते पुन्हा रिजनरेट म्हणजेच अगदी तसाच नवीन भाग पुन्हा बनवते. दुसरे वेगळेपण म्हणजे लिव्हरची रिजर्व क्षमता अतिशय जास्त असून साधारण ७० टक्के भाग जरी शरीरातून काढल्यास उरलेला ३० टक्के लिव्हरचा भाग पूर्ण क्षमतेने कार्य करून शरीराच्या गरजा भागविते. त्यामुळे शस्त्रक्रिया करून रोगाने बाधीत झालेला भाग काढून कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. इतका सोपा उपाय असताना देखील या रोगामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण अधिक का? असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनामध्ये येत असेल आणि याचे कारण आहे हा रोग बहुतांश वेळा लेट स्टेजमध्ये माहिती पडतो. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करता येत नाही.
शस्त्रक्रिया
रोग आकाराने लहान असल्यास किंवा शस्त्रक्रिया करून रोग पूर्णपणे काढता येत असल्यास रोगाने बाधित झालेला लिव्हरचा भाग काढणे गरजेचे असते आणि या शस्त्रक्रियेला हिप्याटेकटोमी असे संबोधले जाते.
लिव्हर ट्रान्सप्लान्ट :
सर्वच रुग्णांमध्ये लिव्हर ट्रान्सप्लान्ट करता येत नाही. परंतु ज्या रुग्णांना सिरोसीस आहे अश्या रुग्णांना योग्य वेळी ट्रान्सप्लान्ट केल्यास त्या रुग्णांची सिरोसीस तसेच पुढे होणाऱ्या कॅन्सरपासून सुटका होऊ शकते. लिव्हर ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असून त्यासाठी तज्ञ डॉक्टर तसेच सर्व सोयींनी परिपूर्ण रुग्णालयाची गरज असते. भारतात अशी रुग्णालये केवळ हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच आहेत. तसेच ही शत्रक्रिया अतिशय खर्चिक देखील आहे.
आर. एफ. ए (RFA) :
रोगाचे आकारमान लहान असल्यास परंतु काही कारणांनी शस्त्रक्रिया करता येत नसल्यास असा रोग अल्कोहोलचे इंजेक्शन टोचून किंवा रेडीओ फ्रिकव्हेन्शी अब्लेशन करून म्हणजेच एक विशिष्ट प्रोब वापरून रोग नष्ट केला जातो.
केमोथेरपी :
रोग अॅडव्हांस असल्यास किंवा लिव्हरमध्ये पसरलेला असल्यास शस्त्रक्रिया करता येत नाही. अशा रोगास लिव्हरला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिनीद्वारे केमोथेरपीची औषधे दिली जातात. या उपचार पद्धतीला TACE असे संबोधतात. या पद्धतीमुळे केमोथेरपीची औषधे केवळ लिव्हर व रोगातच दिली जात असल्यामुळे इतर शरीरात केमोथेरपीचे दुष्परिणाम होत नाहीत किंवा कमी असतात. फारच अॅडव्हांस किंवा पसरलेल्या रोगात रक्त पुरवठा कमी करणारी sorafenib सारखी टार्गेट थेरपी वापरली जाते.
डॉ. दिलीप निकम,
विभाग प्रमुख, कॅन्सर विभाग.
कामा व अल्ब्लेस हॉस्पिटल, मुंबई